घरच्यांना वाटत होतं मुलीने डॉक्टर इंजिनियर व्हावं, पण ती बनली देशाची पहिली “मिसाईल वूमन”

टेसी थॉमस या भारताच्या पहिल्या मिसाईल वुमेन म्हणून ओळखल्या जातात.

अग्निपुत्री म्हणून जगभर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारताचं नाव जगभरात पसरवलं. १९८८ साली डीआरडीओ [ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ] मध्ये सहभागी होऊन डॉ. अब्दुल कलाम याना आदर्श मानून अग्नी मिसाईल सिरीजला आपल्या कौशल्याच्या जोरावर हाताळून त्यांनी यशस्वी केली आणि भारताचा झेंडा जगभरात उंचावला.

महिलांचं सायन्स क्षेत्रात असलेलं योगदान बोटावर मोजण्याइतकं आहे मात्र टेसी थॉमस यांनी यशस्वी केलेल्या चाचण्या अवाक करणाऱ्या आहेत. एप्रिल १९६३ साली त्यांचा जन्म केरळातील अलपुझ्झा या गावी एका रोमन कॅथलिक परिवारात झाला. मिसाईल वुमेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस यांचं पाळण्यातील नाव मदर टेरेसा यांच्या नावावरून टेसी असं ठेवण्यात आलं.

टेसी थॉमस यांच्या गावाजवळ थुम्बा रॉकेट लॉन्चिंग स्टेशन होतं, त्यामुळे त्यांचं लहानपण हे आकाशात उंच उंच जाणाऱ्या रॉकेटस आणि मिसाईल बघण्यात गेलं. त्यामुळे लहानपणापासून त्यांना या गोष्टींचं आकर्षण होतं. चार बहिणी आणि एक भाऊ अशी भावंड त्यांना होती. वडील आयएफएस ऑफिसर आणि आई शिक्षिका होत्या. वडीलांना पॅरॅलिसीसने घेतल्यावर घरातल्या भावंडानी आपापली जबाबदारी वाटून घेतली आणि शिक्षणावर पैसे खर्च केले.

आईवडिलांच्या इच्छेमुळे आणि शिक्षणामुळे त्यांच्या घरातील सगळेच उच्चशिक्षित होते. आईची इच्छा होती कि टेसी थॉमस यांनी डॉक्टर व्हावं पण टेसी याना त्यांच्या लहानपणीच वाटलं होतं कि आपण रॉकेट बनवून आपल्या देशाला मदत करू. शाळेत त्या हुशार होत्या. शाळेत गणित आणि भौतिकशास्रात त्यांना दरवेळी १०० पैकी १०० मार्क मिळत गेले.

उच्चशिक्षणासाठी पैसे नसल्याने त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून १०० रुपयांचं कर्ज घेतलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं.

बॅडमिंटन खेळायची त्यांची आवड विलक्षण होती, बॅडमिंटन प्लेयर बनाव अशी इच्छाही त्यांची झाली होती.शाळेत आणि महाविद्यालयात पुष्कळ मेडल त्यांना मिळाली होती. पुढे एम टेक इन गाईडेड मिसाईलच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. याच क्षेत्रात त्यांनी पुढे पीएचडी केली.

पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी येथे एम टेक करत असतानाच टेसीचे सरोजकुमार पटेल ह्या आपल्या सहकारी मित्राशी भावबंध जुळले आणि दोघे लग्नगाठीने बांधले गेले. हे आंतरधर्मीय लग्न दोन्ही कडच्या आईबाबांनी चांगल्या पध्दतीने स्वीकारले. सरोजकुमार भारतीय नेव्हीत कमोडोर आहेत.

डीआरडीओ जॉईन केल्यानंतर तिथे त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हाताखाली काम करण्याचा योग आला. त्यांच्यातल्या सुप्त गुणांना ओळखून डॉ. कलामांनी त्यांना हैद्राबादच्या डीआरडीओ लॅबमध्ये त्यांचा प्रोजेक्ट पुढे चालू ठेवण्यासाठी पाठवले. अग्नी मिसाईलच्या प्रोजेक्टमध्ये अगदी महत्वाच्या पदावर टेसी थॉमस कार्यरत होत्या.

अग्नी ३ या ३००० किमी रेंजच्या मिसाईल प्रोजेक्टच्या त्या असोसिएट डिरेक्टर होत्या. पुढे त्या प्रोजेक्ट डिरेक्टर असणाऱ्या अग्नी ४ या मिसाईलची त्यांनी यशस्वी उड्डाणे केली होती. नुक्लिअर वेपन बनवण्याची सुरवात केली ती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आणि या मोहिमेला शेवटपर्यंत पोहचवलं ते टेसी थॉमस यांनी. अग्नी १,२,३,४,५ या प्रोजेक्टच्या सगळ्या चाचण्यांच्या त्या प्रमुख होत्या. अग्नी ५ या ५००० किमी रेंज असणाऱ्या मिसाईलचं यशस्वी उड्डाण देखील टेसी थॉमस यांनी पार केलं होतं.

दिवसरात्र या कामात झोकून दिल्याने हे सगळं यश आहे असं त्या सांगतात. परिवार आणि देश यांचा ताळमेळ साधून त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली.

पुरस्कार , पदकं मिळाले. त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना आनंद महिंद्रा म्हणतात कि,

टेसी थॉमस यांचं योगदान बॉलिवूडच्या सेलिब्रिटी लोकांपेक्षा मोठं आहे. भारतातल्या प्रत्येक शाळेत त्यांचं पोस्टर असायला हवं.

टेसी थॉमस यांनी महिलांना या क्षेत्रात येऊन काम करावं आणि देशाचं नाव उज्वल करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. देशासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या टेसी थॉमस यांचं काम खूप महत्वाचं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.