गल्लीत कपडे शिवणाऱ्या शिंप्याकडून गाऊन बनवला, तो घालून मिस इंडिया मध्ये ऐश्वर्याला हरवलं..
१९९४ साली मिस युनिव्हर्स स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न झाली. या स्पर्धेची विजेती ठरली भारताची सुश्मिता सेन. या आधी भारतातून कोणीही हा पुरस्कार जिंकला नव्हता तो सुश्मिता सेनने विश्वसुंदरी बनून पटकावला. मिस युनिव्हर्स स्पर्धेत उतरण्याआधीच सुश्मिता सेनपुढे अनेक अडचणी होत्या इतकेच काय तर मिस इंडियाचा ‘किताब जिंकल्यावर तो स्वीकारायला जाण्यासाठी चांगले डिझाइनर कपडेही नव्हते.
मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या आधी मिस इंडिया स्पर्धा झालेली. या स्पर्धेत भारत भरातल्या सुंदर तरुण मुलींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभाग नोंदवल्या जवळपास २५ तरुणींनी आपला अर्ज मागे घेतला होता. सुश्मिता सेनला सुद्धा अर्ज मागे घेण्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर कारण विचारलं असता या मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या रायसुद्धा सहभागी झाली होती. तिच्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून इतर स्पर्धकांकडून पटपट फॉर्म मागे घेतले जात होते.
सुश्मिता सेनला जेव्हा कळलं कि ऐश्वर्या राय या वेळी मिस इंडिया स्पर्धेत आहे तेव्हा तिनेही आपली स्पर्धेतली एंट्री कॅन्सल केली. ऐश्वर्या राय मुळातच दिसायला सुंदर होती आणि तिच्यापुढे आपण काहीच नाही, ती जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे अशा विचाराने सुश्मिता सेनने माघार घेतली.
घरी आल्यावर सुश्मिता सेनने तिच्या आईला हा घडलेला प्रकार सगळा सांगितला. त्यावेळी तिच्या आईने तिला चांगलंच फैलावर घेतलं, हि काय पद्धत झाली फॉर्म मागे घेण्याची. लढण्याआधीच पराभव स्वीकारणं किती वाईट आहे हे कळतं का तुला. भले ती सगळ्यात सुंदर असेल पण जर तुला हरायचंच असेल तर ऐश्वर्या रायकडून हार, एंट्री कॅन्सल करू नकोस.
पुढच्या दिवशी लास्ट मिनिटाला सुश्मिता सेनने परत एंट्री नोंदवली आणि स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा संपन्न झाली आणि सगळ्यांना मागे टाकत सुश्मिता सेन मिस इंडिया १९९४ फेमिना स्पर्धेची विजेती ठरली. या स्पर्धेत ऐश्वर्या राय सुद्धा सहभागी होती तरीही सुश्मिता सेनने बाजी मारली होती.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारे डिझायनर कपडे सुश्मिता सेनकडे नव्हते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यामुळे घरच्या आर्थिक स्थितीविषयी तिला कल्पना होती. पण सुश्मिता सेनची आई म्हणाली या स्पर्धेत कपडे बघायला लोकं येणार नाहीत ते तुला बघायला येणार आहेत. त्यांनी डिझायनर कपड्यांची तयारी सुरु केली. सरोजिनी नगर मार्केटमधून कपडे आणण्यात आले.
सुश्मिता सेनचं कुटुंब ज्या सोसायटीत राहत होतं तिथे एका गॅरेजमध्ये एक पेटीकोट शिवणारा माणूस होता. त्याला त्यांनी सगळं मटेरियल दिलं आणि इतकंच सांगितलं कि टीव्हीवर दिसणार आहे त्यामुळे जरा व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे तयार करा.
त्या माणसाने दिलेल्या कापडामधून मिस इंडियाचा विनिंग गाऊन तयार केला. उरलेल्या कपड्यातून सुश्मिता सेनच्या आईने त्या गाउनवर एक मोठं गुलाब तयार केलं. आणि बाजारातून नवीन सॉक्स आणून त्यात इलॅस्टिक घालून त्याला कापून हातातले ग्लव्ज तयार केले.
मिस इंडियाचा पुरस्कार स्वीकारताना तो ड्रेस परिधान करून सुश्मिताने केला होता. केवळ परिस्थिती नाही म्हणून रडत न बसता जितकं शक्य होईल तितकं स्वतःच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. हे प्रयत्न थेट मिस इंडिया जिंकण्यापर्यंत घेऊन गेले.
या यशानंतर मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेतही सुश्मिता सेनची वर्णी लागली. इथे मात्र तिने सगळ्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. जगभरातून आलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सुश्मिता सेन विजयी ठरली. केवळ सौंदर्य नाही तर बुद्धिमत्तेच्या जोरावरही ती अव्वल होती.
१९९४ साली झालेल्या ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा ‘किताब पटकावला. हा ‘किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय होती.
हे हि वाच भिडू :
- तो सलमान आणि ऐश्वर्याचा पडद्यावरचा शेवटचा सिन ठरला!!
- वास्तवच्या चाळीवर खर्च केलेले पैसे वसूल व्हावेत म्हणून अजून एक सिनेमा बनवावा लागला.
- त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.
- कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..