धर्मांतरीत करत असल्याच्या संशयावरून त्याला त्याच्या मुलांसह जिवंत जाळण्यात आलं.

ग्रॅहम स्टेन्स मुळचा ऑस्ट्रेलियाचा. पत्राद्वारे मैत्री झालेल्या शंतनू सत्पथी या भारतीय इंजिनियरच्या आग्रहामुळे तो भारत पाहायला आला. सालं होत १९६५. 

वयाच्या चोविसाव्या वर्षी ओरिसाच्या बारीपाडा मध्ये आल्यावर इथली परिस्थिती बघून स्टेन्स हेलावून गेला. तेव्हाच त्यानं  ठरवलं आता भारतातच राहायचं, परत ऑस्ट्रेलियाला जायचं नाही.  तिथे धर्मप्रसार आणि कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या एव्हांजिकल  मिशनरी सोसायटी ऑफ मयूरभंज (EMSM)  या एनजीओ मध्ये त्यान काम सुरु केलं.

एव्हांजिकल मिशनरी सोसायटीची स्थापना १८९५ साली मयूरभंजचे राजे श्रीरामचंद्र भंजदेव यांच्या पुढाकाराने झाली होती.

त्याकाळात ओरिसाच्या या भागाला कुष्ठरोगाने ग्रासले होते. कोणीही वैद्य हकीम या रोग्यांवर उपचार करण्यास तयार नसे. समाजाने सुद्धा या रोग्यांना वाळीत टाकलेलं असायचं. अशावेळी मयूरभंजच्या राजांनी कुष्ठरोग्यावर उपचार करण्यासाठी या ऑस्ट्रेलियन मिशनला बारीपाडा मध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

तेव्हा केट अॅलन्बी आणि ग्रेस अॅलन्बी या बहिणींनी तिथे काम सुरु केले. ज्या रोग्यांना स्पर्श करायलाही बाकीचे घाबरायचे त्या रोग्यांच्या जखमा या बहिणींनी स्वतःच्या हातानी भरल्या.

१९०२साली या संघटनेला हॉस्पिटल उभे करण्यासाठी भंजदेव महाराजांनी ३६ एकर जागा दिली.  तेव्हा पासून हजारो कुष्ठरोग्यांची सेवा या मिशनच्या मार्फत चालायची. यासोबतच ख्रिश्चन धर्माच्या प्र्साराचेही काम या मिशनतर्फे चालायचं.

ग्रॅहम स्टेन्स जेव्हा येथे आला तेव्हा येथे साधारण शंभर कुष्ठरोगी उपचार घेत होते. इथे आल्यावर स्टेन्सच्या लक्षात आले की फक्त कुष्ठरोगावर उपचार करून उपयोग नाही तर या रोग्यांना समाजाच्या मुख्यधारेत सामील करून घेतलं तरच खरा फरक पडेल.

या मिशनच्या शेतात रोगी स्वतः राबून भाजीपाला पिकवायचे. स्टेनने तिथे गायींचा गोठा सुरु केला. पण कुष्ठरोग्यांच्या  हातचं धार काढलेले दुध कोणी विकत घ्यायला तयार नसायचं.

अखेर विनोद दास नावाचे डॉक्टर पुढे आले. त्यांनी हे दुध विकत घेण्यास सुरवात केली तेव्हा पासून गावातील इतर लोकांच्या मनातली भीती कमी झाली आणि हे दुध खपू लागले. अनेक वर्ष ओरिसामध्ये काम केल्यामुळे स्टेन्सला उडिया आणि स्थानिक आदिवासींची संथालीभाषा पक्की येत होती. तो या आदिवासींमध्ये बराच लोकप्रिय होता.

इथेच काम करत असताना त्याची भेट ग्लॅडीस नावाच्या मुलीशी झाली. ती सुद्धा मिशनचं काम करायला भारतात आली होती. दोघांनी १९८३साली लग्न केले. त्यांना तीन मुले झाली. मुलगी इस्थर ,फिलीप आणि टिमोथी नावाची मुलं. त्यांची मुले शिकायला उटीला असायची. हिवाळी सुट्टीसाठी ते मयूरगंजला आले होते. त्यांनी वडिलाना तिथला भाग फिरून दाखवण्याचा हट्टकेला.

२२ जानेवारी १९९९ला स्टेन्स आपल्या जीपमध्ये दोन्ही मुलांना घेऊन जवळच्या एका छोट्या गावातल्या धार्मिक कार्यक्रमात भग घेण्यासाठी गेले. तिथून निघायला उशीर झाल्यामुळे रस्त्यात मनोहरपूर नावाच्या खेड्याच्या बाहेर असलेल्या चर्चसमोर गाडी उभी केली. घरातून बांधून आणलेला डब्बा वगैरे खाऊन गाडीतच तिघे झोपी गेले.

मध्यरात्री जोराच्या आवाजाने स्टेन्सला जाग आली. त्याच्या गाडीबाहेर मोठा जमाव गोळा झाला होता. ते सगळे त्याच्या विरुद्ध घोषणा देत होते. स्टेन्सची मुले भेदरून गेली होती. त्यांना कळेना आपली चूक काय आहे?

या जमावाच नेतृत्व करत होता दारासिंह. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. यापूर्वी गोरक्षक दलासाठी काम करत असताना गायींची वाहतूक केली म्हणून एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. 

स्टेन्स आणि त्याच्या मुलांना सर्वात आधी बेदम मारहाण करण्यात आली. नंतर तिघांना गाडीमध्ये घालून बाहेरून गाडीवर पेट्रोल रॉकेल ओतण्यात आले. पाषाण हृदयी जमावाला लहान मुलांच्या किंकाळ्यानी पाझर फुटला नाही. कोणालाही बाहेर येऊ दिल नाही.

सकाळपर्यंत गाडीमध्ये फक्त राख उरली होती. या घटनेवेळी स्टेन्स ५७ वर्षाचे तर त्यांची मुले १० आणि ७ वर्षाची होती.

या प्रकरणी बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सध्या केंद्रात राज्यमंत्री असलेले प्रतापचन्द्र सारंगी तेव्हा ओरीसा बजरंग दलाचे प्रमुख होते. त्यांच्यावर ही या घटनेत सहभागी असल्याचे आरोप करण्यात आले. ते त्यांनी फेटाळून लावले. ग्रॅहम स्टेन्स हे बळजबरीने आदिवासींचे धर्मांतर करत होते म्हणून त्यांना चिडलेल्या लोकांनी जिवंत जाळले असे बजरंग दलाचे म्हणणे होते.

जगभर या घटनेचे प्रतिसाद उमटले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी स्पष्ट शब्दात स्टेन्सला मारले याची निंदा केली. १९९९ मध्ये सीबीआयने दारासिंह सोबत अठरा जणांची अटक केली. पण बजरंग दलाची चौकशी केली गेली नाही.

गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी तपासासाठी तीन मंत्र्यांची कमिटी स्थापन केली.  खालच्या कोर्टात दारासिंह याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. स्टेन्स यांची पत्नी ग्लॅडिया स्टेन्स हिने त्याच्यासाठी माफीची विनंती केली.

सगळ्यांना वाटले होते की आपल्या पतीला आणि दोन मुलांना गमावल्यामुळे ग्लॅडियामध्ये टोकाचा द्वेष भरला असेल, ती सगळ सोडून परत ऑस्ट्रेलियाला जाईल.

पण तसे घडले नाही. ग्लॅडिया भारतातच राहिली. आपल्या पतीच अधूर राहिलेलं काम करत राहिली. तिने आपल्या पतीवरचे सगळे आरोप खोटे असल्याचे ठामपणे सांगितले पण याच बरोबर त्याच्या मारेकर्यांना सुधारण्याची आणखी एक संधी मिळायला हवी असे प्रतिपादन केले.

२०११मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दारासिंह याची फाशीची शिक्षा बदलून आजन्म कारावासामध्ये बदलली. ग्लाडिया स्टेन्सला तिने कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारने तिला पद्मश्री देऊन तिचा सन्मान केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.