जगाच्या इतिहासात ती गोष्ट हिटलरची सर्वात मोठ्ठी चूक ठरली.

‘शांततेच्या मार्गाने जर्मनीचे अधिपत्य मान्य करा अथवा होणाऱ्या युद्धाला तुम्हीच जबाबदार असाल’

हे होते हिटलर च्या परदेश धोरणाचे सूत्र. 

ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया सारखे देश त्याने नुसते धमकीने खिशात घातले होते. आणि पुढे प्रत्यक्ष युद्ध सुरु झाल्यावर तर जर्मनीच्या ब्लिट्झक्रीग (Blitzkrieg) पुढे एकेक राष्ट्रे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पोलंड, डेन्मार्क, नेदर्लंड्स, बेल्जियम, ग्रीस, युगोस्लाव्हिया सारखे देश त्याने जाता जाता चिरडले होते. फ्रांससारख्या बलाढ्य युरोपीय राष्ट्राला त्याने अवघ्या सहा आठवड्यात नमविले होते. जमिनीवर जर्मन पँझर रणगाड्यांच्या तुकड्या आणि आकाशात लूफ्तवाफे (Luftwaffe) म्हणजेच जर्मन विमान दल या जगातील अत्याधुनिक लढाऊ दलांपुढे टिकणे मुश्किल झाले होते. 

थोडक्यात हिटलर ने फक्त बोलावे आणि त्याच्या सैन्याने करून दाखवावे असा तो काळ होता.

स्टॅलिन चा सोव्हिएत रशिया या हिटलर च्या काळ्या कर्मात भागीदार होता. हिटलर ने पोलंड रशिया बरोबर अर्धा वाटून घेतला होता. फिनलंड रशियाच्या वाट्याला सोडला होता. त्याबदल्यात जर्मनीने पूर्वेकडे काहीही करावे आणि रशियाने आपला वाटा घेऊन त्याकडे डोळेझाक करावी असाच तो करार होता. 

रशिया जरी जर्मनीला अनुकूल भूमिका घेत असला तरी हिटलरचा मात्र रशियावर नेहमीच डोळा होता. तो योग्य वेळेची वाट पाहत होता. जर्मनीला आपला साम्राज्यविस्तार राशीत जिंकूनच करावा लागेल असे हिटलर नेहमीच मनात आला होता. 

म्हणून त्याने एक अतिशय गुप्त योजना आखली होती. आणि तिच्या शुभारंभाचा तारीख सुद्धा ठरवली होती २२ जून १९४१.

ती योजना म्हणजे ‘ऑपरेशन बार्बारोसा’! 

हे सांकेतिक नाव होते हिटलरच्या सोव्हिएत रशिया जिंकण्याच्या मोहिमेचे.

जगाच्या इतिहासात झालेल्या काही सर्वात मोठ्या चुकांपैकी ही एक हिटलर ची घोडचूक!

इतिहासाकडून काहीतरी शिकावे हे हिटलर ला जणू मान्यच नव्हते. नाहीतर रशियाविरुद्ध लढण्याच्या हा अट्टाहास हिटलर अशा ऐनवेळी केला नसता. 

रशियाचा घास घेण्याचा प्रयत्न करताना यापूर्वी खुद्द नेपोलियनचे तोंड पोळले होते. जर्मन चॅन्सेलर बिस्मार्क म्हणायचा ‘रशिया बरोबरच्या युद्धात कधीच रशियाच्या मुख्य शक्तीचा पराभव कोणी करू शकत नाही, जी लाखो रशियन्स च्या रूपात वसते’ पण बिस्मार्क सारख्या महानेत्याचे बोल हिटलर विसरला आणि रशियाला डसायाला निघाला. 

तेव्हाचा रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन अगदी बेसावध होता. त्याला हिटलर च्या हल्ल्याची कल्पनाच नव्हती. आणि जरी असली तरी त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. हिटलर ने आपली पूर्ण ताकद रशियावर लावली. कारण रशियाचा पराभव केल्यावर पूर्वेकडची लढाई संपणार होती आणि मग तो ब्रिटनविरुद्ध तीच ताकद एकवटणार होता.

२२ जून १९४१ ला काही लाख जर्मन सेनेने रशियन सीमारेषेवर जोराचा हल्ला केला. ६ लाख वाहने, ६ ते ७ लाख घोडदळ (रसदपुरवठ्यासाठी), अडीच ते तीन हजार विमाने, आणि ३८ लाख जर्मन आणि अक्षराष्ट्रांचे सैन्य असे या लढाईचे स्वरूप असणार होते.

बेसावध रशियन सैन्याचा जर्मन पँझर तुकड्यांपुढे टिकाव लागणे शक्य नव्हते. चढाईचा जोर आणि जर्मन सैन्याचा आतापर्यंतचा इतर राष्ट्रातील युद्धाचा अनुभव असा होता कि कित्येक जर्मन सैनिकांना आपण ऑगस्ट १९४१ पर्यंत हे युद्ध संपवून सुट्टीसाठी घरी जाऊ असे वाटत होते. 

जर्मन सेनेने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारत शेकडो मैल चढाई केली, रशियन्स मागे हटत होते. वाटेत येणारी खेडी आग लावून द्यायची, शहरे वेढायाची, त्यातून हजारो किंवा लाखो युद्धकैदी ताब्यात घ्यायचे. मिन्स्क, स्मोलेन्स्क, उमान, किव्ह सारख्या शहरातून लाखो युद्धकैदी ताब्यात घेतले. 

प्रथम ज्यूंची कत्तल, आणि रशियन वंशाच्या लोकांना पिटाळून लावायचे, हे लोक पूर्वेकडे पळायचे. महालांच्यावरील अत्याचाराला तर पारावर नव्हता. जर्मनीचा रोख तीन शहरांवर होता. उत्तरेकडे लेनिनग्राड, मध्यावर मॉस्को, आणि दक्षिणेकडे स्टॅलिनग्राड. 

या तीन शहरांवर कब्जा म्हणजे रशियाचा शेवटच !

पण ते काही घडले नाही, छोटे छोटे देश पादाक्रांत करत आलेले जर्मन सैन्य हि रशियाची न संपणारी भूमी पाहून वैतागले, जमीन संपतच नव्हती. त्यातून रशियाचे छुपे हल्ले आणि रशियन थंडीचा कडाका ! 

नोव्हेंबर १९४१ अखेर जर्मन सैन्य मॉस्को पासून ५० मैल अंतरावर पोचलेले, लेनिनग्राड ला त्यांनी वेढा घातला, स्टॅलिनग्राड देशील त्यांच्या टप्प्यात आले होते. पण आता उणे २० अंश से. तापमानात जर्मन सैन्याला लढाई बिकट वाटू लागली. त्यात बर्फाची वादळे. आतापर्यंत ५० लाख रशियन सैन्य युद्धकैदी म्हणून पकडले गेले होते व मारले गेले होते. 

पण रशियन सैन्य संपताच नव्हते. मॉस्को च्या लढाईत रशियाच्या स्की बटालिअन्स नी जर्मन सैन्याला अस्मान दाखावले. ते मागे हटले ते कायमचेच. लेनिनग्राड ला ३ वर्षे जर्मनीने वेढा ठेवला पण शहरवासियांच्या जिद्दीसमोर ते हरले आणि शेवटी तसेच माघारी वळले. 

स्टॅलिनग्राड ला फ्रेडरिक पौलस ने २ लाख सैन्यानिशी वेढा दिला होता पण त्या दोन लाख सैन्याला १५ लाख सैन्यानिशी वेढून स्टॅलिन ने हिटलर ला जबरदस्त धक्का दिला. हे १५ लाख सैन्य अचानक आले कुठून हा प्रश्न सगळ्यांनाच पडला पण बिस्मार्क च्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले असते तर तो प्रश्न पडला नसता.

रशिया या युद्धातून तावून सुलाखून निघाला, आता माघार संपली होती. आता १९४४ मध्ये रशियन सैन्य आपला सर्व भूभाग परत मिळवून उलट जर्मनीवर चाल करून चालले होते, स्टालिन क्रूर होता, सूड तर तो घेणारच. 

तोही असा कि जर्मनी कधीच विसरणार नाही. ऑपरेशन बार्बारोसा चा परिणाम म्हणजे रशियाच्या हल्ल्यात हजारो जर्मन गावे बेचिराख केली गेली, लोकांच्या कत्तली केल्या गेल्या, २० लाख जर्मन स्त्रियांवर बलात्कार केले गेले, ३८ लाख जर्मन सैन्य ज्यांनी रशियन सीमेत पाऊल टाकले होते त्यातले फक्त ६००० लोक पुढे दहा वर्षानंतर परत जर्मनीला आले. आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे स्वतः हिटलर ने ३० एप्रिल १९४५ ला आत्महत्या करून आपले पराभूत आयुष्य संपवले त्या दिवशी रशियन सैन्य बर्लिनमध्ये होते. 

स्वतंत्र जर्मनीचे अस्तित्व स्टॅलिन ने नकाशातून पुसून टाकले.

  •  भिडू रणजित यादव. 

References-

  • ‘The second World War’ by Antony Beevor P-225.
  • wikipedia.org/wiki/Operation_Barbarossa
  • The Second World War’ by John Keegan p- 14
3 Comments
  1. Anonymous says

    Mast patil

  2. Swa_Tea says

    Khupch abhyaspurvak lekh .fct 1941 nantr 1944 paryant staline be kasa taba ghetala he kalal ast tr ajun mahiti milali asti

  3. devendra pandurang misal says

    nehmipramane chan ..pan jara lavkar sampvala asa vatla …

Leave A Reply

Your email address will not be published.