गुमनामी बाबा हेच सुभाषचंद्र बोस होते का..?

१६ सप्टेंबर १९८५ या दिवशी उत्तरप्रदेशातल्या फैजाबाद सिव्हिल लाईन्स एरियातल्या रामभवन येथे एका बाबांच निधन झालं. अंतिम संस्काराचे सोपस्कार पुर्ण केल्यानंतर ते बाबा रहात असलेल्या त्यांच्या खोलीची साफसफाई करण्याच्या निमित्ताने खोलीत प्रवेश करण्यात आला.  त्यानंतर तिथल्या लोकांना जे साहित्य मिळालं त्यामुळे फक्त फैजाबादमध्येच नाही तर संपुर्ण देशात चर्चा सुरू झाल्या.

त्या खोलीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा युनिफॉर्म होता. नेताजींच्या मृत्यूसंबधीत असणारे वर्तमानपत्रांची कात्रणे, सुभाषबाबूंच्या कुटूंबाचे फोटो, जर्मनी, जपानी आणि ब्रिटीश भाषेतील पुस्तके खोलीत होती. खोलीत असणारे सामान पाहून हे गुमनामी बाबा खुद्द सुभाषचंद्र बोस असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेला हवा मिळाली आणि गुमानामी बाबा हेच सुभाषबाबु म्हणणारा एक मोठ्ठा वर्ग निर्माण झाला.

लेखक अनुज धर यांच्या कन्ड्रम : सुभाष बोस लाईफ आफ्टर डेथ या पुस्तकावर आधारित सिनेमा येतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यात सुभाषबाबू हेच गुमनामी बाबा होते हे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमामुळे पुन्हा एकदा गुमनामी बाबा आणि सुभाषबाबू या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुळात या सर्व गोष्टींची सुरवात कुठून झाली हे पाहण गरजेचं ठरतं, चर्चेला महत्वाच कारण ठरतं ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत नसणारे ठोस पुरावे.

दिनांक १८ ऑगस्ट १९४५ रोजी सुभाषचंद्र बोस यांचा हवाईदुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी देण्यात आली. या बातमीवर संशय घेण्यात आला. त्याच मुख्य कारण म्हणजे दुर्घटनेत सुभाषबाबूंच शव मिळालं नाही. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा अपघात तैवान नजिक झाल्याच सांगण्यात आलं पण तैवान सरकारच्या कागदपत्रांमध्ये कुठेही त्या दिवशी हवाई अपघात झाल्याची नोंद नाही.

या घटनेचे एकमेव साक्षीदार होते कर्नल हबीबूर रेहमान.

ते या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत होते. अपघाताची बातमी समजताच ते अपघात झाल्याच्या ठिकाणी गेले. तिथे काढण्यात आलेले फोटो त्यांनी पुरावा म्हणून दाखल केले. एकूण सहा फोटो जमा करण्यात आले. ज्यामध्ये फक्त विमानाचा कचरा होता. जो भाग फोटोमध्ये होता तो डोंगराळ होतो व ज्या ठिकाणी अपघात झाल्याच सांगण्यात येत होतं तिथे डोंगराळ भाग नव्हता. एका फोटोत खुद्द कर्नल हबीबूर रेहमान खुर्चीवर बसल्याचं दिसत होतं. त्यांच्या शेजारी जे शव होतं ते सुभाषचंद्र बोस यांच असल्याचा दावा त्यांनी केला.

एकमेव साक्षिदार म्हणून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची माहिती आझाद हिंद सरकारचे सुचना मंत्री एस ए नायर, रशिया आणि अमेरिकेचा गुप्तचर विभाग आणि शाहनवाज समितीला दिले. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या साक्षी दिल्याने त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो.

नेमका काय संशय व्यक्त केला जातो.

नेताजींचा मृत्यू झाला नसेल तर त्यामागे ब्रिटीश गुप्तचर संस्थेचा हात असावा किंवा रशियाच्या मदतीने त्यांना रशियात नेवून फासी देण्यात आली असावी अशी थेअरी मांडण्यात येते. त्याचबरोबरीने कोणालाही कळून न देता तेच गुमनामी बाबा या नावाने फैजापूरला येवून राहिले होेते असही सांगण्यात येत. तांश्कद कराराच्या वेळी शास्त्रींसोबत खुद्द सुभाषचंद्र बोस उपस्थित होते आणि त्यांची माहिती शास्त्रींना झाल्यानंतर त्यांचा देखील रहस्यमय पद्धतीने खून झाल्याची थियरी मांडण्यात येते.

पहिला प्रश्न हा निर्माण होतो की जर गुमनामी बाबा हेच सुभाषचंद्र बोस होते तर ते समोर का आले नाहीत…?

याबद्दल अस सांगण्यात येत की त्यांना जिवितेचा धोका होता. हा धोका दूसऱ्या तिसऱ्या कुणाकडून नाही तर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून होता. सुभाषचंद्र बोस जिवंत असतील तर ते आपल्या नेतृत्वाला स्पर्धक ठरू शकतात अशी भिती नेहरूंना असल्याने त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली होती. अस सांगितलं जातं पण याला कोणत्याच गोष्टींचा आधार नाही.

सरकारने आजवर नेताजींच्या संशयास्पद मृत्यूवर तीन समिती स्थापन केल्या.

या तिन समित्यांपैकी पहिली समिती १९५६ साली स्थापन करण्यात आली. शहनावाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीने नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४८ रोजी झालेल्या विमान अपघातातच झाल्याच स्पष्ट केलं. या समितीचे सदस्य असणारे नेताजींचे बंधु सुरेशचंद्र बोस यांनी मात्र समितीचा निर्णय अमान्य असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, समिती हि रहस्य शोधण्यासाठी नाही तर तो अपघातीच मृत्यू होता हे सांगण्यासाठी तयार झाली होती. अगोदरच निष्कर्ष काढून समितीने योग्य ते पुरावे गोळा केले.

त्याचप्रकारे १९७० साली न्यायाधिश जीडी खोसला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने देखील  नेताजींचा मृत्यू विमान अपघाताच झाल्याच स्पष्ट केलं.

२००६ साली मुखर्जी आयोगाने आपला अहवाल दिला. त्यामध्ये नेताजींचा मृत्यू झाल्याच स्पष्ट करण्यात आलं पण आयोगाच म्हणणं होत की हा मृत्यू विमानअपघातात झाला नव्हता. त्यांचा मृत्यू इतर दिवशी इतर कारणाने झाला होता.

त्यांची सखोल तपासणी करण्याची गरज आहे. सरकारने मुखर्जी आयोगाचा अहवाल फेटाळला.

२०१५ साली IB अर्थात इंटेलिजन्स ब्युरोच्या दोन फाईल सार्वजनिक झाल्या. यामध्ये IB मार्फत स्वातंत्र्यानंतर वीस वर्ष सुभाषचंद्र बोस यांच्या कुटूंबाची हेरगिरी केली होती हे स्पष्ट झालं. यानंतर मोठ्ठा वाद निर्माण झाला. नेताजींच्या कुटूंबाची हेरगिरी करण्याची गरज काय असा प्रश्न पडला.

याला आधार म्हणून नेहरूंना नेताजी परत येण्याची भिती होती म्हणून त्यांनीच नेताजींच्या कुटूंबावर पाळत ठेवली असल्याचं सांगण्यात आलं.

२०१५ सालच्या फेब्रुवारी मध्ये RTI कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी नेतांजीच्या मृत्यूसंबधित फायली सार्वजनिक करण्याची मागणी केली. त्यावर हे कागदपत्रे उघड झाल्यास दोन देशांमधील संबध ताणले जावू शकतात अस सरकारकडून सांगण्यात आलं. हा देश कोणता असेल?

याबद्दल सुब्रम्हण्यम स्वामी असा दावा करतात की,

आझाद हिंद सेनेच्या पराभवानंतर नेताजी रशियात गेले तेव्हा स्टॅलिनने त्यांना बंदी केलं. त्यांना अटक करण्यात आली. नेहरूंच्या सांगण्यावरुन स्टॅलिनमार्फत त्यांना रशियाच्या सायबेरिया प्रांतात फासी देण्यात आली. मात्र नेहरूंचा स्टॅलिनवर विश्वास नव्हता. स्टॅलिन सुभाषबाबूंना सोडून देईल अशी भिती वाटत असल्यानेच त्यांनी नेहरूंच्या घरावर पाळत ठेवल्याचा दावा सुब्रम्हण्यम स्वामी करतात.

२०१५ मध्ये केंद्र व २०१६ मध्ये पश्चिम बंगालच्या सरकाने नेताजींच्या मृत्यूसंबधित काही फाईल सार्वजनिक केल्या मात्र त्यामध्ये कोणताच असा संशयास्पद पुरावा नव्हता. २०१७ मध्ये एका RTI ला उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्ट केलं की नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला विमान अपघातातच झाल्याच स्पष्ट करण्यात आलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.