धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मितालीवर पगाराच्या बाबतीत आजही अन्यायच होतोय.

मिताली राज ही भारतीय क्रिकेटची स्टार आहे. गेल्या २२ वर्षांपासून टीम इंडियाकडून खेळताना तिने  ज्या प्रकारे विक्रम केले आहेत ते एकदम लाजवाब आहेत. ती जेव्हा इंग्लंडच्या मैदानावर क्रिकेट खेळते ना तेव्हा इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होतो. ती इंग्लंडमध्ये एवढी फेमस  आहे, जेवढया तिथल्या क्रिकेटपटू पण नाहीत. पण दुसरीकडं भारतात तिला एवढा मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळताना दिसत नाही.

बीसीसीआयच्या पगारापासून ते लोकांच्या टाळ्यापर्यंत तिच्या प्रत्येक गोष्टीत घट झालेली दिसते.

सर्वाधिक ८४ सामने जिंकणारा कॅप्टन मिताली

अलीकडेच मिताली राजने ८३ सामने जिंकणाऱ्या बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडून आपल्या नावावर ८४ सामने जिंकण्याचा विक्रम केलाय. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी साकारत मितालीने भारतीय संघाला ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने जरी मालिका २-१ अशी गमावली असली तरी मितालीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर विक्रम केला. त्याचवेळी ३ जुलै २०२१ रोजी इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात मिताली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. यात तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्डसला मागे टाकले आहे.

मितालीने वयाच्या १६ व्या वर्षात २६ जून १९९९ रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिचा  पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होता. पदार्पणाच्या सामन्यातच तिने शतक झळकावले. त्या सामन्यात मितालीने शानदार फलंदाजी करताना नाबाद ११४ धावा केल्या.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकर आणि मिताली राज या दोघांनी वयाच्या १६ व्या वर्षीच क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जर सुरुवात विस्फोटक असेल तर शेवट अधिक मनोरंजक होतो असं म्हणतात.

अजूनही रन मशीनप्रमाणेच ती विक्रम करतेच आहे.

सध्या मितालीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,३३७ धावा आहेत. तिने ११ कसोटी सामन्यात ६६९ धावा,  २१७ एकदिवसीय सामन्यात ७३०४ आणि ८९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३६४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यातही तिने ८ बळी मिळवले आहेत.

टी -२० मध्ये १७ अर्धशतक झळकावणाऱ्या मितालीने एकदिवसीय मालिकेत ५८ तर कसोटीत ४ अर्धशतक ठोकली आहेत. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात तिच्या नावावर ८ शतके आहेत. कसोटीतही तिने द्विशतक झळकावल आहे.

मितालीने भारतीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे योगदान दिलं आहे, ते बघता  महिला क्रिकेट तिच्याविना अपूर्णच ठरेल. मिताली राज अशी क्रिकेटपटू आहे, जिने आपल्या खेळातून जगाला दाखवून दिलंय की क्रिकेट केवळ पुरुषांचाच नाही तर महिलांचा देखील खेळ आहे.

हे विक्रम देखील तिच्या यशस्वी कारकिर्दीची उदाहरण आहेत.

एकदिवसीय सामन्यात सलग सात अर्धशतके झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू. मितालीच्या पुढे पाकिस्तानचा जावेद मियांदाद हा एकमेव खेळाडू आहे ज्याने सलग ९ अर्धशतक ठोकली आहेत.

एकापेक्षा जास्त आयसीसी वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारी ती एकमेव क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आहे. सन २०१७ आणि २००५ मध्ये.

मिताली वयाच्या १९ व्य वर्षी डबल सेंचुरी मारणारी सर्वात कमी वयाची महिला क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर तिने केलेल्या २१४ रन्स सर्वाधिक वैयक्तिक रन्स आहेत.

मितालीने कसोटी क्रिकेटमधील सातव्या विकेटसाठी १५७ रन्सची भागीदारी केली जी महिला कसोटीतील विक्रम आहे.

महिला ODI मध्ये सर्वाधिक काळ कॅप्टन्सीचा विक्रम मितालीच्या नावावर आहे.

महिला एकदिवसीय सामन्यात मितालीने सर्वाधिक ७३०४ रन्स काढल्या आहेत.

मितालीने सर्वात कमी वयात (१६ वर्षे २०५ दिवस) वुमन्स वनडे मध्ये सेंचुरी मारली आहे.

एका डावात सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम.

दीर्घ कारकीर्दीचा रेकॉर्ड (२२ वर्षे आणि ७ दिवसांपेक्षा जास्त)

वुमन्स ODI नर्वस मध्ये ९० (५वेळा) मिताली आघाडीवर आहे.

टी -२० मध्ये बॅटिंग ऍव्हरेजच्या (३७.५२) बाबतीत मिताली टॉपला आहे.

१४ मार्च २०२१ रोजी मिताली महिला एकदिवसीय सामन्यात ७००० रन्स काढणारी पहिली महिला बॅट्समन आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० रन्स जमविणारी ती दुसरी महिला बॅट्समन ठरली.

धोनीची बरोबरी तर द्रविड, रोहित आणि कोहलीसारखे दिग्गज क्रिकेटपटू विक्रमाच्या बाबतीत मितालीच्या मागेच आहेत. 

१ जुलै २०२१ रोजी मिताली राजने विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविडचे रेकॉर्ड तोडले. त्यानंतर इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक ५०० किंवा त्याहून अधिक रन्स करण्याचा विक्रम तिने केला होता.

एवढं असूनही एका पत्रकाराने तर हाईटच केली.

महिला विश्वचषक २०१७ दरम्यान मिताली राज यांना एका पत्रकाराने विचारले होते की तिचा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण? हे ऐकताच मिताली म्हणाली,

“तुम्ही कधी एखाद्या पुरुष क्रिकेटपटूला विचारले आहे की, त्याची आवडती महिला क्रिकेटपटू कोण आहे?”

एवढंच बोलून मितालीने त्या रिपोर्टरची बोलती बंद केली.

महिला देशासाठी खेळतच नाहीत का?

बीसीसीआय वर वर्षानुवर्षे महिला क्रिकेटपटूंवर दुहेरी वागणुक दिल्याचा आरोप होतो. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंची वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. त्याला पाहिल्यावर, महिला खेळाडूंशी  बीसीसीआयची दुहेरी वागणूक दिसून येते.

महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या कराराच्या रकमेमध्ये खूप फरक आहे. बीसीसीआयने पुरुष क्रिकेटपटूंसोबत केलेला करार ४ श्रेणींमध्ये विभागलेला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांना A + ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे वार्षिक कॉन्ट्रॅक्ट ७ कोटी रुपयांच आहे. त्याचबरोबर ग्रेड ए च्या क्रिकेटर्सच कॉन्ट्रॅक्ट ५.५ कोटींच आहे. ग्रेड बी आणि ग्रेड सी क्रिकेटपटूंना १ ते ३ कोटी मिळतात.

महिला क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं तर हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि पूनम यादव यांना ग्रेड ए मध्ये स्थान मिळाले आहे. त्यांना वर्षाकाठी ५० लाख रुपये मिळतात. ग्रेड बी साठी वार्षिक ३० लाख आणि ग्रेड सी साठी १० लाख रुपये मिळतात.

आता एवढे विक्रम करून पण मिताली राज ग्रेड बीमध्ये आहे. मिताली व्यतिरिक्त ग्रेड बी मध्ये झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा रोड्रिग्ज यांचा समावेश आहे. दुसरीकडे मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, हर्लीन देओल, प्रिया पूनिया आणि रिचा घोष ग्रेड सी मध्ये आहेत.

आम्हाला पुरुषांचा खेळ आवडतो

काही वर्षांपूर्वी जेव्हा एका अँकरने स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात लोकांना विचारले की, ‘क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकणारा पहिला क्रिकेटर कोण होता?’ तेव्हा सर्वांनीच सचिन तेंडुलकरच नाव घेतलं. पण जेव्हा त्यांना सांगण्यात आले की योग्य उत्तर सचिन नसून तर ‘मिताली राज’. तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

तेव्हा एका प्रेक्षकाने त्या चॅनेलवरच कमेंट करत म्हंटल तुम्ही महिला क्रिकेट दाखवलं तरच आमची उत्तर बरोबर येतील ना?

बीबीसीने खेळाच्या जगाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्नांवर संशोधन केले. त्यात १४ राज्यांतील १०,००० लोकांच्या मुलाखतींवर आधारित संशोधनात बर्‍याच गोष्टी समोर आल्या. त्यात महिलांच्या एखाद्या गेम पेक्षा पुरुषांचा गेम जास्त पाहण्यात येतो. या संशोधनात सामील असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार पुरुषांचे गेम स्त्रियांच्या गेमपेक्षा अधिक मनोरंजक असतात.

कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अ‍ॅथलेटिक्स यासारखे गेम स्त्रियांसाठी योग्य नसल्याचे लोक म्हणतात हे बीबीसीच्या सर्वेक्षणात आढळले.

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू ईशा गुहा म्हणाल्या की, पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये अजूनही असमानता कायम आहे. पुरुषांच्या क्रिकेट इतकेच महिला क्रिकेटकडे लक्ष दिले तर भारतीय महिला संघ तितकीच दमदार कामगिरी करू शकेल.

आता आपल्या देशातल्या महिला आणि पुरुष खेळाडूंच्या तुलनेत महिला खेळाडूंना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ती कुणापासून लपलेली नाही. पगार आणि सुविधांपासून प्रोत्साहनपर्यत सर्वच ठिकाणी कमतरता आहे. मितालीच्या बाबतीतही असच काहीसं घडलंय.

 हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.