त्या दिवशी सिगारेट ओढणं मिथुनदा महागात पडलं, सेटवरच महिलांकडून शिव्या बसल्या होत्या…

मिथुन चक्रवर्ती हा एकेकाळचा सगळ्यात मोठा नायक होता. ज्यावेळी त्याचं करियर ऐन भरात होतं, कुठलाही सिनेमा त्याचा बॉक्स ऑफिसवर हिट होत होता तेव्हा अगदी खेडोपाड्यात मिथुन नावाचा स्टारडम तयार झालं होतं. त्याकाळचा टॉपचा नायक असलेल्या मिथुनला एकदा सेटवरच शिव्या पडल्या होत्या त्याबद्दलचा आजचा किस्सा.

१२ जून १९९८ रोजी स्वामी विवेकानंद हा सिनेमा रिलीज झाला. तब्बल ११ वर्ष या सिनेमावर काम सुरु होतं. या सिनेमात मिथुन चक्रवर्तीची भूमिका इतकी गाजली होती कि त्या भूमिकेला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. ज्यावेळी हा सिनेमा नॅशनल अवॉर्डला गेला तेव्हा ज्युरी होते ऋषिकेश मुखर्जी. त्यावेळी ते मिथुनचा अभिनय बघून उच्चारले होते कि,

हा सिनेमा पूर्णपणे दैवी आहे, या सिनेमात केलेला अभिनय अफलातून आहे. सिनेमातला टायटल रोल दुसर्याने केला आहे म्हणून नाहीतर मुख्य अभिनेत्याचा अवॉर्ड तुला मिळाला असता, म्हणून आम्ही सहायक अभिनेत्याचा अवॉर्ड तुला देत आहे.

मिथुन अनेकदा वेगळ्याच रोलमध्ये आपल्याला दिसून येतो. मिथुनने फुटपाथवरची गरिबीसुद्धा पाहिली आहे आणि सगळ्यात जास्त कर भरण्याची संपत्ती सुद्धा पाहिली आहे. त्यावेळी जी.व्ही.अय्यर यांनी स्वामी विवेकानंद सिनेमाची घोषणा केली आणि परमहंस यांच्या भूमिकेसाठी मिथुनची निवड व्हावी असं सगळ्यांनाच वाटत होतं. मिथुन या रोलसाठी बेस्ट आहे म्हणून मणिरत्नम यांनी सल्ला दिला होता. पण मिथुनने या भूमिकेला नकार कळवला.

या नकारामागे मिथुनने कारण सांगितलं कि रामकृष्ण परमहंस हे मोठे विद्वान व्यक्ती होते आणि मी एक व्यसन करणारा माणूस आहे. त्यांची भूमिका मला काय जमणार ? पण मणिरत्नम यांनी फक्त लूक टेस्ट साठी ये अशी थाप मारून मिथुनला बोलावून घेतलं. लूक टेस्ट वैगरे झाली. या लुक टेस्ट मध्ये मिथुन सेम टू सेम रामकृष्ण परमहंस यांच्यासारखा दिसत होता. शेवटी बऱ्याच चर्चांनंतर मिथुन या सिनेमात सहभागी झाला. 

हा सिनेमा करताना मिथुनने रामकृष्ण परमहंस यांचं पात्र अक्षरश जगलं होतं. पण याच सिनेमाच्या सेटवर एक किस्सा झाला. मिथुनला सिगारेटचं व्यसन होतं. शॉट झाल्यावर तो बाजूला गेला. व्हॅनिटीमध्ये सिगारेट पिण्यास परवानगी नव्हती म्हणून मिथुन बाजूलाच एका झाडाखाली सिगरेट पीत बसला. काही महिला मिथुनकडे निरखून पाहत होत्या आणि शिव्या देत होत्या.

शेवटी मिथुनने त्यांना शिव्या का देताय याचं कारण विचारलं तेव्हा त्या महिलांनी सांगितलं कि,

तू जे पात्र करतोय तो माणूस आमच्यासाठी देव आहे आणि देव कधी सिगारेट ओढत नाही. हे करताना तुला शरम वाटायला हवी.

मिथुनने लगेचच ती सिगारेट फेकली आणि पूर्ण शुटिंगभर त्याने सिगारेटला हात लावला नाही.

पुढे मिथुनला याच सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. मिथुनच्या कारकिर्दीतला हा तिसरा नॅशनल अवॉर्ड होता पण या सिनेमात हुबेहूब रामकृष्ण परमहंस वाटावे इतका उत्कृष्ट रोल मिथुनने केला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.