मिथुनदाने शक्ती कपूरला पुण्यामध्ये कुत्र्यासारखा धुतला होता.

ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा शक्ती कपूर हा सुनील कपूर होता आणि मिथुनदा चं नाव गौरांग चक्रवर्ती होतं. तरी आपण वाचकांच्या सोयीसाठी शक्ती आणि मिथुनच म्हणू.

तर आपला शक्ती भाऊ राहायला दिल्लीला होता. बापाचा टेलरिंगचा बिझनेस होता. पोरग क्रिकेट खेळणे, पोरी फिरवणे असले उद्योग करायचं. चेंगट बापाला खड्ड्यात घालणे हा त्याचा आवडता शौक होता. त्यातून त्याला मॉडेलिंगचं खुळ शिरलं. गल्लीतल्या पानपट्टी वाल्याच्या दुकानांत याचा स्टायलिश फोटो लागला.

शक्तीचे मित्र सुद्धा असेच रिकामचोट होते. त्यांना कुठून तरी कळाल की पुण्यात एफटीआयआयमध्ये शिकलं की मोठा स्टार होता येत. पण तिथ अॅडमिशनसाठी परीक्षा असते. सगळ्यांनी फॉर्म भरला. कोणी तरी शक्तीचा पण फॉर्म भरला. पण योगायोगाने बाकीचे नापास झाले आणि नन्हा सा प्यारा सा शक्ती एफटीआयआय एन्ट्रस पास झाला.

खिशात सातशे रुपये घेऊन मुंबईच्या रेल्वेमध्ये बसला. तिथे योगायोगाने त्याची ओळख एका मुलाशी झाली. तो सुद्धा एफटीआयआयमध्ये सिलेक्ट झालेला. त्याच नाव अनिल वर्मन. तर ट्रेनमध्ये दोस्ती झालेले हे दोघे मुंबईला अनिलच्या बहिणीच्या घरी आले. तिथे आल्यावर शक्तीला धक्का बसला, अनिलच्या बहिणीच्या घरात विनोद खन्ना बसला होता.

अनिलचे जिजाजी म्हणजे विनोद खन्नाचा धाकटा भाऊ प्रमोद. विनोद खन्ना पुण्याला काही तरी कामाने जाणारच होता. तो अनिल आणि शक्ती कपूरला एफटीआयआय मध्ये सोडतो म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना न्यायला एक फोर्ड गाडी आली. त्यात फिल्मस्टार राकेश रोशन त्याचा भाऊ राजेश रोशन आणि विनोद खन्ना होते. पावसाचे दिवस होते. मुंबई ते पुणे प्रवासात मस्त पैकी बियर पीत मज्जा करत ही वरात फिल्म इन्स्टीट्युटला पोचली.

त्यांची फोर्ड कार गेटपाशी थांबली. एकदम स्टाईल मारत ते सगळे कार मधून उतरले. सगळ्यांच्या हातात बियर बॉट्ल्स होत्या.

ही फिल्मी गँग काय करतीय हे बघत गेटवर टिपिकल एफटीआयआय वाले शोभतील असे तरुण उभे होते. म्हणजेच वीतभर दाढीची खुंट वाढलेली, चार दिवस अंघोळ केले नाही असा चेहरा, अंगावर न धुतलेले कपडे तोंडात बिडी आणि चेहऱ्यावर बेदरकार भाव. एक सावळा लुंगी घातलेला मुलगा त्यांचा लीडर होता. 

सोबत आलेल्या फिल्मस्टार्स मुळे आपल्या शक्ती भाऊला भलताच कॉन्फीडन्स आला होता. आपण किती कुल आहे दाखवण्यासाठी त्याने त्या उभ्या असलेल्या मुलांच्या त्या लीडरला बियर ऑफर केली. त्या पोराने अतिशय तुच्छतापूर्वक त्याच्याकडे पाहिलं आणि तो तिथून निघून गेला. सोबत त्याची दोस्तमंडळीसुद्धा निघून गेली.

The FTII campus d

शक्तीला कळेना काय झालं? बाकी प्रवेशाचे सोपस्कार झाले. हॉस्टेलमध्ये रूम मिळाली. तिथे सामान वगैरे टाकलं. सोबत आलेले विनोद खन्ना वगैरे मंडळी परत मुंबईला रवाना झाली. अचानक मध्यरात्री शक्तीच्या रूमची टकटक झाली. बाहेर तोच सावळा पोरगा उभा होता. आता पर्यंत तुम्ही ओळखलच असेल, तो लुंगी वाला म्हणजे आपला मिथुनदा होता.

मिथुनदा सोबत अजून दोन मूले होती. त्यात होता सहा सव्वा सहा फुट उंचीचा कागलचा विजयेंद्र घाटगे.(फिल्मस्टार आणि सागरिका घाटगेचा पावना) त्या तिघांनी शक्तीच्या रूमची लाईट बंद केली. त्याला बांधून जमिनीवर बसवलं. त्याच्या चेहऱ्यावर भरपूर पाणी मारल. एका साईडने फटके द्यायला सुरवात केली. दुसरीकडे मिथुनदा विचारत होता,

“क्यू? आगेसे कभी सिनियर को बियर पुछेगा?”

भेदरलेला शक्ती रडत रडत गयावया करत होता,

“नही नही”

विजयेंद्र घाटगेने शक्तीच्या वाढलेल्या केसातून हात फिरवला आणि म्हणाला,

“अरे तुम्हारे तो बाल बहोत सुंदर है.”

शक्तीला काही कळायच्या आत त्याचे केस वेड्यावाकड्या पद्धतीने कापले गेले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी त्याला उचललं आणि कम्पसमधल्या तळ्यात नेऊन फेकलं. आता मात्र शक्तीला सहन होईना. आधीच मार खाल्ल्यामुळे अंग दुखत होतं त्यात तिथलं थंड पाणी, तो जोरजोरात रडू ओरडू लागला. अखेर मिथुन आणि त्याचे दोस्त घाबरले आणि तिथून निघाले, पण जाता जाता देखील त्यांनी शक्तीला वॉर्निंग दिली,

” परत दारू पिताना दिसलास तर याद राख”

ते तिघेही तिथून निघून गेले. शक्ती आपली उरलेली इज्जत गोळा करून रूम वर आला. एवढ्यात परत त्याला मिथुन चक्रवर्ती आपल्या दारापाशी दिसला. आता मात्र शक्तीची फाटून हातात आली. पण मिथुनदा हळू आवाजात म्हणाला,

“डर मत. दरवाजा बाहर से बंद करता हु. अब कोई नही आयेगा.”

शक्तीच्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र होती. असं रॅगिंग त्याने कधी ऐकलं देखील नव्हतं. चार दिवस तो रूम मधून बाहेर देखील आला नाही. पण नंतर मिथुन स्वतः त्याला भेटायला आला. दोघांच्यात चांगली मैत्री झाली. शक्ती राहायला देखील मिथुनच्या रूमवर गेला.

maxresdefault 1
विजयेंद्र घाटगे, राकेश रोशन आणि मिथुन

पुढच्या वर्षभरात दोघांनी एफटीआयआयचा कम्पस गाजवला. रोशन तनेजाच्या कडक मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. दोघांच्या मैत्रीचे किस्से आजही फेमस आहेत. मिथुनच्या घरची परिस्थिती खूप गरीबीची होती. तरी कधी शक्तीला किंवा इतर कोणत्याही ज्युनिअरला पैशाची असली, जेवणाचे वंादे असले तर आपण उपाशी राहून त्यांना मदत करायचा. 

एक वर्षाने मिथुन एफटीआयआयमधून पासआउट झाला. त्याला मृगया नावाचा सिनेमा मिळाला ज्याच्यासाठी पुढे जाऊन त्याला नॅशनल अवार्ड देखील मिळाला.शक्ती कपूर पासआउट झाल्यावर मिथुनच्या खोलीतच राहायला आला. दोघांनी मिळून सुरवातीचा स्ट्रगल केला. शेकडो सिनेमात काम केलं. एकजण मोठा सुपरस्टार बनला तर दुसरा मोठा व्हिलन!

पण पुण्यात रॅॅगिंग मुळे सुरु झालेली मैत्री आयुष्यभर टिकली.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shirish says

    Great memories ! Thanks for sharing

Leave A Reply

Your email address will not be published.