मिथुनदाने दूर उटीच्या डोंगरात स्वतःची फिल्म इंडस्ट्री उभी केली होती

कोरोनाच्या महामारीचा फटका अनेक उद्योगांना बसलाय. येणाऱ्या महामंदीमध्ये बऱ्याचजणांचे रोजगार जातील अशी शक्यता आहे. असाच फटका भारतातील सर्वात ग्लॅमरस उद्योगालाही बसलाय.

बॉलिवूड उर्फ हिंदी फिल्म इंडस्ट्री.

मुंबई ही भारतीय फिल्म इंडस्ट्रीची राजधानी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी शेकडो सिनेमे इथे तयार होतात. त्याच्याशी जोडले गेलेल्या लाखो लोकांचे पोट या उद्योगावर अवलंबून आहे.

गेले दोन अडीच महिने झालं सगळे शूटिंग कोरोनामुळे बंद पडले आहेत. बऱ्याच मोठ्या सिनेमांची रिलीज अडकून पडली आहे. थिएटर कधी सुरू होतील माहीत नाही. सुरू झाले तरी लोक तिथे जाऊन सिनेमे पाहितील का हे देखील ठाऊक नाही. या सिनेमांमध्ये कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत.

मुंबईमधील कोरोनाचा कहर थांबण्याच नाव घेत नाही. सर्वात जास्त थैमान याच गावात होत आहे.

अशावेळी अनेक निर्माते दिग्दर्शक मुंबई बाहेर शूटिंग करता येईल का चाचपणी करत आहेत. कोल्हापूर, वाईसारख्या छोट्या गावात फिल्म इंडस्ट्री हलेल याची मोठी शक्यता आहे.

आज ज्याच्या फक्त चर्चा सुरू आहेत ते मिथुन चक्रवर्तीनी तीस वर्षांपूर्वी करून दाखवलेलं.

उटीच्या डोंगरात अख्खी फिल्म इंडस्ट्री वसवली होती.

मिथुन चक्रवर्ती उर्फ मिथुनदा. बंगालच्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. कॉलेज वयात नक्षलवादी बनला होता पण भावाच्या मृत्यू नंतर घरची जबाबदारी पडली व त्यातून बाहेर आला.

आवड होती म्हणून सिनेमा क्षेत्रात उडी घेतली. दिसायला सावळा काटक कोणताही वशिला नाही. पण नशिबाने एफटीआयआयची परीक्षा पास झाला आणि भारतातल्या सर्वोत्तम फिल्म स्कुलमध्ये शिकण्यासाठी पुण्यात आला.

पुढे मृगया या बंगाली आर्ट फिल्म मध्ये त्याला संधी मिळाली. त्याच त्यानं सोनं केलं. या सिनेमासाठी त्याला अभिनयाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.हिंदी इंडस्ट्री मध्ये देखील त्याच नाव झालं.

डिस्को डान्सरच्या यशामुळे फक्त भारतातच नाही तर रशियामध्ये देखील त्याची चर्चा सुरू झाली.

आपले भावूक डोळे आणि आगळ्यावेगळ्या डान्स शैली ने त्याने सगळ्या भारताला वेड लावलं. अग्निपथ मध्ये बच्चन साहेबांसमोर उभं राहायचं धाडस त्याने केलेलं.

एकाच वेळी मास आणि क्लास या दोन्ही पब्लिकला त्याने जिंकण्याची किमया मिथुनदाने साधली होती

पण नव्वदच्या दशकातील जागतिकीकरणामुळे भारतात खूप मोठा बदल घडून आला. केबल टीव्ही आले. संख्येने वाढलेल्या पांढरपेक्षा मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेऊन कौटुंबिक सिनेमे बनू लागले.

आमिर खान सलमान खान शाहरुख खान या चिकण्या हिरोच्या समोर मिथुन सारख्या रांगड्या हिरोंचे मारधाड वाले सिनेमे कमी पडू लागले.

मिथुनदा आता चाळीशीत पोहचले होते.

ही इंडस्ट्री कशी चालते याच भान त्यांना आलं होतं. इथल्या कमतरता काय आहेत हे त्यांनी बरोबर हेरलं.

आणि आपलं बस्तान मुंबईमधून दूर दक्षिणेत उटीला हलवलं.

उटी मध्ये मिथुनदाचे दोन मोठे हॉटेल्स होते. मैने प्यार किया वगैरे सिनेमाच्या शूटिंगमुळे उटीचं निसर्ग सौंदर्य प्रकाश झोतात आलेलं होत. मिथुननी आपल्या निर्मात्यांना सांगितलं की

माझ्या बरोबर काम करायचं असेल तर उटी मध्ये शूटिंग करावे लागेल आणि शूटिंग साठी येणाऱ्या क्रुने माझ्याच हॉटेल मध्ये राहावं लागेल.

किती जरी झालं तरी मिथुनदाचे सिनेमे भक्ती भावाने पाहणारा एक वर्ग अजूनही अस्तित्वात होता.

कष्टकरी ब्ल्यू कॉलर समाज अजूनही मिथुनच्या सिनेमांना गर्दी करत होता. मिथुनदाच्या अटींपुढे निर्मात्यांनी मान तुकवली. दुसरा पर्याय देखील काही नव्हता. पण हा निर्णय त्यांच्यासाठी देखील मोठा फायद्याचा ठरला.

मुंबईमध्ये शूटिंग करण्यापेक्षा उटी मध्ये खर्च निम्म्याहून कमी येत होता.

या सिनेमांचा एक विशिष्ट पॅटर्न होता. ज्यात मिथुनदा ज्यांचं नाव मुख्यतः शंकर/ शिवा किंवा राजू असायचं.

हा एक गरीब तरुण असायचा. मिल कामगार किंवा रेल्वे स्टेशनवर हमाली करणाऱ्या या शंकरच्या घरी विधवा आई आणि बिन बिहाइ बहीण असायची. या बहिणीवर गावातल्या गुंडाने बलात्कार केल्यावर शंकरच आणि व्हिलनची दुष्मनी सुरू व्हायची.

कोणतेही लॉजिक नसलेली डायलॉगबाजी, फिजिक्सची आईबाप एक करणारी मारामारी असे चित्रविचित्र प्रकार यात असायचे. दरम्यानच्या काळात मिथुन दा प्रेमात देखील पडायचे पण हिरॉईनचा उपयोग मिथुन दा भोवती नाचणे आणि क्लायमॅक्सला किडनॅप होणे इत्यादी कामे त्यांना राखून ठेवलेली असायची.

त्यामुळे मिथुनदा बऱ्याचदा अनोळखी दाक्षिणात्य हिरॉइन्स घेऊन तिथे कॉस्ट कटिंग करायचे.

अशा सिनेमाचं परफेक्ट उदाहरण म्हणजे मिथुनदाचा गुंडा. यातले सायकलच्या चाका मागे लपून गोळ्या झाडणारे मिथुनदा सगळ्यांना आठवत असतील.

टीएलव्ही प्रसाद हे त्यांचे बऱ्याच सिनेमात दिग्दर्शक होते. आनंद मिलिंद यांचं संगीत. व्हिलनच्या यादीत मुकेश ऋषी, शक्ती कपूर अशांची गर्दी.

दलाल, फुल और अंगार, अंगारा, गुंडा, दादागिरी, लोहा, कालिया, सिकंदर सडक का, तबाही द डिस्ट्रॉयर असे भडकाऊ नावाचे मिथुनदाचे सिनेमे ढिगाने रिलीज होऊ लागले.

मिथुनज ड्रीम फॅक्टरी या नावाने ही फिल्म इंडस्ट्री ओळखू लागली.

कारखान्यातील प्रॉडक्ट्स प्रमाणे एका पाठोपाठ एक सिनेमांची रांग लागली. या सिनेमाची बी ग्रेड सिनेमे म्हणून हेटाळणी केली जात होती.

अतिशय रद्दड स्टोरी, कोणतीही कलात्मकता नाही, बऱ्याच जणांनी एका टेक मध्ये पाट्या टाकू काम केलेल असायचं. यामुळे उच्च मध्यमवर्गीय प्रेक्षकांना हे सिनेमे दर्जाहीन वाटणे सहाजिक होत.

मिथुनदाचे हे सिनेमे जोरात आपटू लागले पण त्यांचा ओघ काही थांबत नव्हता.

आणखी गमतीची गोष्ट म्हणजे १९९५ ते १९९९ या काळात मिथुन चक्रवर्ती हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणारे कलाकार ठरले होते.

रूढार्थाने मिथुनचे सिनेमे मोठ्या थिएटरमध्ये फ्लॉप होत होते पण कामगार वस्तीत असलेल्या अतिशय टुकार समजल्या जाणाऱ्या थिएटरमध्ये, झोपडपट्टीमधल्या व्हिडीओपार्लर मध्ये प्रचंड गर्दी होत होती.

मुंबई बाहेर सुद्धा छोट्या मोठ्या शहरात मिथुनची क्रेझ कमी होत नव्हती.

त्याच्या डायलॉगवर, कंबर हलवून केलेल्या डान्सवर त्याच्या अफलातून फायटींगवर पब्लिक शिट्या वाजवून वाजवून थिएटर डोक्यावर घेत होती.

मिथुनला या धंद्यामागे असलेलं गणित सुटलं होतं. भलेभले चित्रपट पंडित, निर्माते डोक्याला हात लावून बसले होते पण मिथुन एवढा पैसा कमावणे कोणालाही जमत नव्हते.

सिनेमाच सायनिंग अमाउंटबरोबरच हॉटेलमध्ये राहणाऱ्या कलाकारांचं भाड, शूटिंगसाठी लागणारे साहित्य पुरवल्याच भाड यातून देखील मिथुन दाने प्रचंड पैसे कमवले.

शाहरुख अमीर सलमान यांचे सिनेमे थिएटर मधून खाली उतरत नव्हते, दक्षिणेत रजनीकांत, चिरंजीवी यांची धूम सुरू होती. आणि

या सगळ्या सुपरस्टार याना मागे टाकून मिथुनदा उटीत बसून पैसे छापयचा कारखाना लावून बसले होते.

एकदा तर मनिरत्नम यांनी आपल्या इरुवर या नितांत सुंदर स्टोरी असलेल्या सिनेमासाठी मिथुनला विचारलं पण मिथुनने नकार दिला. कारण काय तर या सिनेमासाठी केस कापावे लागणार होते आणि त्याचा परिणाम मिथुनच्या शूटिंग सुरू असलेल्या 15 सिनेमावर झाला असता.

फक्त एवढया कारणासाठी मिथुनदाने भारतातल्या सर्वोत्तम दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला.

गरिबांचा अमिताभ , कामगारांचा बादशहा म्हणून मिथुन चक्रवर्तीने आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

सर्वात जास्त सिनेमामध्ये हिरोच लीड रोल करण्याचा विक्रम मिथुनदाच्या नावे जोडला गेला. पण क्वांटिटीसाठी क्वालिटीला तडजोड करणाऱ्या मिथुनदा त्याच विश्वात अडकून पडला.

एकेकाळी तीन तीन नॅशनल अवॉर्ड मिळवणारा हा पट्टीचा अभिनय करणारा मिथुनदा पण त्याच्याबर बी ग्रेड हिरो म्हणून शिक्का बसला.

मिथुनदाच्या ड्रीम फॅक्टरी मुळे तो एक अट्टल बिजनेसमन आहे हे सिद्ध झालं पण दर्जेदार हिरोच्या अस्सल अभिनयाला भारतीय फिल्मइंडस्ट्री मुकली.

दोन हजार साला नंतर मात्र कॉम्पुटर मोबाईल फोनच युग आलं आणि मिथुनच्या सिनेमाची क्रेझ कमी होऊ लागली. मिथुनदांचं वय देखील झालं होतं.

हळूहळू त्यांनी चरित्र भूमिके कडे आपला मोर्चा वळवला.

अभिषेक बच्चन चा गुरू, सलमान खानचा लकी, परेश रावलचा ओह माय गॉड अशा सिनेमांमध्ये अगदी छोट्या रोलमध्ये देखील मिथुनदाने छाप पाडली.

आताही कुठे डान्स शो चा महागुरू बनून क्या बात क्या बात म्हणणे, रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज मध्ये फुटकळ भूमिका यामध्ये मिथुनदाना कुजवल आहे.

नाही म्हणायला ताष्कंद डायरीज सारख्या वेब फिल्ममधून मिथुनदाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केलेली आहे.

पण या अशा सिनेमांच्या ऐवजी आजही इंटरनेटवर मिथुनचे बिग्रेड सिनेमांची चर्चा असते, प्रभुजी म्हणून ते चेष्टेचा विषय बनलेले दिसून येतात.

आता मिथुनचे सिनेमे रिलीज होत होते असे थिएटर नष्ट होत आहेत. कुठे मंगल कार्यालय तर कुठे आणखी काही बनलंय. उटीची फिल्म इंडस्ट्री सुद्धा गायब झालीय.

पण एकेकाळी दिवसभर कारखान्यात घाम गाळणारा, ग्रीसमध्ये हात काळे करणारा कामगार संध्याकाळी सायकलवरून मिथुनचे उटीमधले सिनेमे  याच थिएटरमध्ये बघायचा, त्याच्यावर पैसे उधळायला.

तेव्हा त्याला हेच दर्जाहीन सिनेमे आपल्या आयुष्यातील सगळं दुःख विसरायला भाग पाडायचे त्याची सर कोणाही सुपरस्टार अभिनेत्याला देखील जमणार नाही.

संदर्भ- अमोल उदगीरकर यांनी लिहिलेला दिव्य मराठी मधला लेख.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.