ना घर का ना घाट का झालेला मुख्यमंत्री

काँग्रेसने केलेले कमबॅक हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. गेल्या कित्येक निवडणुकांमधला दुष्काळ संपवून काँग्रेस सरकार मध्ये आले आहे. काँग्रेसचा मोरल बुस्ट करणारा हा रिझल्ट आहे. बऱ्याच ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष साजरे करताना दिसत आहेत. पण हे यश काही निर्भेळ नाही.

या आनंदात एक मिठाचा खडा पडला आहे. तो म्हणजे मिझोरम.


गेली दहा वर्षे मिझोरममध्ये काँग्रेस सरकार होते. तिथे त्यांचा पराभव तर झालाच शिवाय काँग्रेसला जिव्हारी लागणारी गोष्ट म्हणजे त्यांचा गेली दहा वर्षे असलेला मुख्यमंत्री निवडणुकीत पडला आहे तेही दोन जागावरून.


७६ वर्षाचे लाल थनहवला हे या पूर्वीसुद्धा मिझोरमचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. सेरछिप हा विधानसभा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. तिथे आता पर्यंत सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकली आहे. एकोणसाठ वर्षे काँग्रेसमध्ये असणाऱ्या लाल थनहवला यांनी राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले आहे. यामुळेच की काय या निवडणुकीवेळी त्यांना आपल्या पराभवाची कुणकुण लागली होती. म्हणून त्यांनी आपल्या हक्काचा “सेरछिप” मतदारसंघ सोबतच साउथ चंपई या मतदारसंघातूनही फॉर्म भरला .


जेष्ठ डाकू गब्बरसिंग म्हणून गेले आहेत “जो डर गया समझो मर गया.”


घाबरलेल्या मुख्यमंत्र्यांना मिझोरमच्या जनतेने घरी पाठवलेच. फक्त साउथ चंपईमध्येच नाही पण गेली ७ निवडणुका जिंकलेला सेरछिप मतदारसंघातही त्यांना पराभव स्विकारावा लागला. अगदी थोडक्या मतांनी झालेला हा पराभव लालथनहवला यांच्यासाठी “ना घर का ना घाट का” अशी वेळ आणणारा ठरला.


 या पराभवासोबतच दहा वर्षाची काँग्रेस राजवट ही ढासळली आहे. 


लाल थनहवला यांचे परंपरागत विरोधक मिझोरम नॅशनल फ्रंटचे ८४ वर्षांचे झोरामथंगा हे परत मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार झाले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपाने पहिल्यांदाच पूर्वोत्तरच्या या राज्यात चंचूप्रवेश केला आहे. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा समजली जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.