लडकी हूं लड सकती हूं म्हणणारी काँग्रेस अमेठी पाठोपाठ रायबरेलीमध्ये सुद्धा संकटात आलीय.

जसं २०१४ साल आलं, भाजप ची सत्ता स्थापन झाली अन कॉंग्रेस पक्षाचे वाईट दिवस सुरु झाले. गेल्या काही वर्षांत कित्येक दिग्गज अन गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय पक्षाला सोडून इतर पक्षात गेले.

त्यातलंच एक ताजं उदाहरण म्हणजे, कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंह !!! हो त्याच आमदार ज्या सोनिया अन प्रियांका गांधींच्या अगदी लाडक्या कार्यकर्त्या म्हणल्या जायच्या..त्याच अदिती सिंग ज्यांची राहुल गांधीं यांच्याशी लग्नाच्या अफवा मध्यंतरी पसरत होत्या.  

बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी अदिती सिंह यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. कारण सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ रायबरेलीसाठी अदिती सिंग यांचं जाणं मोठं नुकसानीचं ठरणारे.

गेल्या दिवसांमध्ये अदिती सिंह काँग्रेसविरोधात काही ना काही वक्तव्य करत आहेत. त्यात भर म्हणजे त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन करत आहेत. अदिती सिंग यांचे वडील अखिलेश सिंग यांची काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणना होते, जरी त्यांचे ऑगस्ट २०१९ मध्ये निधन झाले.

असो पण आत्ता युपीच्या निवडणुकीच्या तोंडावर अदिती सिंग यांचा भाजप प्रवेशाचा एक अर्थ म्हणजे अदिती सिंग या आगामी निवडणुकीत रायबरेलीमधून अदिती सिंह रायबरेलीत सोनिया गांधींना टक्कर देतील. 

आता हे बोलणं अतिशियोक्ती जरी वाटत असली तरी काही सांगता यायचं नाही.  भाजपची योजना जरा लांबचं पहायची असते, कारण अदिती सिंग यांच्या बरोबरच बसपा च्या वंदना सिंह  यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला, ज्या येत्या निवडणुकीत आझमगडमध्ये अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्या विरोधात टक्कर देतील.

आपण अदिती सिंग यांच्याकडे वळूया….

अदिती सिंग याचं बोलायचं तर त्यांना काँग्रेस पक्षात आणण्याचे श्रेय प्रियंका गांधी यांना जाते, मात्र गेल्या काही वर्षात अदिती सिंग यांनी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्याने प्रियांका गांधी यांच्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. कारण अलीकडेच उत्तर प्रदेशात महिलांसाठी ‘लडकी हूं, लढ सकती हूं’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने आवाज उठवला गेला.

प्रियांका गांधी आणि अदिती सिंग यांचे सबंध तसे सुरुवातीपासूनच चांगले होते मात्र गेल्या २ वर्षांपासून काहीतरी कुणकुण चालूच होती. त्यात गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाने रायबरेली सदरमधील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्या विरोधात मंगळवारी सभापतींकडे याचिका पाठवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती आणि मान्य देखील केली होती.. 

त्या दरम्यान कलम ३७० असो की तत्कालीन ऑक्टोबर महिन्यात योगी सरकारने आयोजित केलेले विधानसभेचे विशेष अधिवेशन असो, आमदार अदिती सिंह यांनी पक्षश्रेष्ठीबाहेरची वक्तव्ये करून, भाजपचे गोडवे गायले होते…सततपणे बंडखोर वृत्ती दाखवल्यामुळे पक्षाने सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली होती. 

आता तर अदिती सिंग या थेट पणे वाजत गाजत भाजप मध्ये गेल्या. पण रायबरेलीत काँग्रेसला नुकसान होऊ शकते, असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

अदिती यांनी पहिलीच निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती.

 

अदिती सिंह यांचे वडील अखिलेश प्रताप सिंह हे १९९३ पासून सलग पाच वेळा रायबरेली सदर मतदारसंघातून आमदार राहिलेत. त्यांनी दोन वेळा काँग्रेसच्या चिन्हावर तर तीनदा अपक्ष म्हणून  निवडणूक जिंकली. पण २०१७ च्या निवडणुकीत त्यांची मुलगी अदितीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. आदितीची ही पहिलीच निवडणूक होती, जी तिने ८९,१६३ मतांनी जिंकली होती.

आदिती सिंह यांचे गांधी कुटुंबाशी जवळचे नाते आहे…मध्यंतरी तर राहुल गांधी यांचा आणि अदिती सिंग यांच्या विवाहाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या ज्या निव्वळ अफवा होत्या. 

अदिती यांनी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांचा प्रचार केला.  त्याचा परिणाम निकालावरही दिसून आला. आदिती यांच्या विधानसभेतून सोनिया गांधींना सर्वाधिक मते मिळाली होती.

रायबरेली लोकसभेत विधानसभेच्या पाच जागा आहेत – रायबरेली सदर, बछरावन, हरचंदपूर, सरेनी. रायबरेली सदर मतदारसंघातून सोनिया गांधींना सर्वाधिक १,२३,०४३ मते मिळाली होती. 

पण आता त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे पुढील निवडणुकीत काँग्रेसचे नुकसान होऊ शकते, अशी चर्चा आहे.

कोणताही पक्ष तीन पातळ्यांवर काम करतो. ज्यामध्ये जिल्हा, राज्य आणि नंतर राष्ट्रीय स्तराचा समावेश आहे. राजकारणात छोट्या छोट्या जिल्ह्यांतून कोण कोणत्या कुटुंबातून येतो याला खूप महत्त्व असते. अदिती सिंग देखील अशाच कुटुंबातून येतात ज्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकणार आहे.  

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात अदितीची महत्त्वाची भूमिका होती. रायबरेलीमध्ये २०१७ मध्ये ६ विधानसभेच्या जागा २ काँग्रेस, १ सपा आणि ३ भाजपने जिंकल्या होत्या. आता काँग्रेसने जिंकलेल्या एका जागेवर हरचंदपूरचे काँग्रेसचे आमदार राकेश सिंह आधीच बंडखोर झाले आहेत. त्यात आता आदिती सिंगने बंड करत पक्ष सोडला. त्याशिवाय रायबरेलीचे आमदार असलेले आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय असलेले दिनेश प्रताप सिंह यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधीच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता…त्यामुळे सगळीकडूनच कॉंग्रेस ची गोची झाली आहे.

पक्षाविरोधात अदिती सिंग यांनी केलेल्या कृतींमुळे कॉंग्रेस ने देखील याची मानसिक तयारी असणार आहे कि, अदिती सिंग जरी पक्ष सोडून गेल्या तरी पक्षाला फरक पडू द्यायचा नाही. आणि म्हणून पक्षाने  त्यांना निलंबित केले होते

अदिती या काँग्रेसच्या महिला शाखेच्या सरचिटणीसही होत्या. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविलाय..त्यामुळे अदिती सिंग यांनी कॉंग्रेस सोडली म्हणताच येणार नाही उलट त्यांना पक्षातून हाकललं गेलं परिणामाची जाणीव ठेवून त्यामुळे आगामी निवडणुकीत जरी नुकसान झाले तरी त्याचं फारसं वाईट न वाटलेलेच बरंय….!

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.