एक आमदार चक्क मेल्यावरही आमदार निवासात वर्षभर रहात होता.
राज्यभरातील आमदारांचे राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे आमदार निवास. मुंबईत चार आमदार निवास आहेत. मनोरा, आकाशवाणी, मॅजेस्टिक अशी त्यांची नावे आहेत.
यातील मॅजेस्टिक हे आमदार निवास तर १९०९ साली ब्रिटिशांनी बांधलय. गेली शंभर वर्षे ही व्हिक्टोरियन इमारत आजही थोड्या फार दुरुस्तीनंतर दिमाखात उभी आहे.
हे आमदार निवास मात्र अनेक गंमतीदार घटना कहाणी यांनी भरलेली आहे.
कधी भुताटकीचा बंगला म्हणत बेंगलोरचा तरुण घुसतो तर कधी कुठल्या आमदाराचा काही तरी किस्सा. कार्यकर्त्यांची लगबग, नको त्या व्यक्तीची ये जा त्यांची भांडणे हा तर रोजचा विषय. किती आमदार आले आणि गेले पण आमदार निवासचा थाट कमी झाला नाही.
शंभरच्या वर अनेक वर्षे आमदार निवास आपल्या पोटात अशा अनेक माणसांच्या अनेक गोष्टी घेऊन लपवून आहे.
गोष्ट आहे २००७ सालची. कुलाबा जवळच्या ओल्ड कौन्सिल आमदार निवासात बेकायदेशीर लोक राहत आहेत अशी मीडिया मध्ये चर्चा सुरू होती.
आमदार निवासात सध्याच्या आमदारांना राहण्यासाठी खोल्या दिलेल्या असतात मात्र जे आमदार आता निवृत्त झाले आहेत त्यांना मुंबईत काही कामानिमित्त आले तर राहण्यासाठी काही खोल्या वेगळ्या ठेवलेल्या असतात.
मीडियाच्या तपासात असे आढळले होते की काही जुन्या आमदारांनी आपली खोली सोडलेलीच नाही. विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आणि विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या पर्यंत तक्रारी देण्यात आल्या.
अखेर मीडियामधल्या दबावामुळे सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून चौकशी केली.
यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सगळ्यात चकित करणारी गोष्ट म्हणजे आमदार निवासाच्या रजिस्टरमध्ये एक एन्ट्री दिसत होती ज्यात माजी आमदार अब्दुल कादिर देशमुख हे गेले वर्षभर १८, जानेवारी ते २३ डिसेंबर २००६ च्या दरम्यान या आमदार निवासात राहत होते.
आश्चर्याची गोष्ट ही की अब्दुल कादिर देशमुख यांचा २७ जून २००६ रोजी मृत्यू झाला होता.
एक मृत आमदार हा आमदार निवासात वर्षभर राहतोय हे घडलेच कसे हा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला.
राज्यभर गडबड उडाली.
काँग्रेसचे अब्दुल कादिर देशमुख हे १९९५ ते १९९९ या काळात जालना जिल्ह्यातील परतूर येथे कादिर बापू नावाने लोकप्रिय आमदार होते. १९९९ साली बबनराव लोणीकर यांनी पराभव केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला खो बसला होता. २००६ साली त्यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांनी मृत्यू पूर्वी देखील आमदार निवासात जाऊन राहण्याचा प्रश्नच आला नव्हता.
मग हे घडलं कसं?
राज्यसरकारच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवले. सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले की आमदार निवासात असलेला स्टाफ आयडी कार्ड चेक करूनच प्रवेश देतो. कोणीतरी अब्दुल कादिर देशमुख यांचे फेक डॉक्युमेंट बनवले असेल.
नुसते तर्कवितर्क काढण्यात आले पण तिथं कोण राहत होतं याचं गूढ शेवटपर्यंत उलगडलं नाही.
मुंबई मिरर ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन नुसार त्यांचा एक पत्रकार आमदारांचा पीए असल्याचे नाटक करून मॅजेस्टिक आमदार निवासात 4 दिवस राहिला, त्याला कोणीही कोणतीही चौकशी केली नाही, ना त्याच्या कडे पैसे घेतले.
या सगळ्या गोष्टी त्यांनी रेकॉर्ड करून ठेवल्या.
त्या पत्रकाराने एकदा एक बॉक्स नेला, एकदा आपल्या एका महिला सहकारीला देखील तिथे घेऊन आला मात्र सिक्युरिटीनी साधी चौकशी देखील केली नाही. रिसेप्शनला असणाऱ्यांनी थेट किल्ली सोपविली.
आमदारांच्या सारख्या व्हीआयपी व्यक्ती राहत असलेल्या या अति महत्वाच्या बिल्डिंग मध्ये अशा प्रकारचा गोंधळ हा देशाच्या सिक्युरिटीला देखील धोका होता.
याला काही प्रमाणात आमदार देखील जबाबदार होते. आमदारांचे पीए कार्यकर्ते हे देखील आयडी विचारल्यावर हा आपला अपमान समजतात. आमदार निवास हे या आमदारांना राहण्या ऐवजी मुंबईला येणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय बनून राहिला आहे.
मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर परिस्थिती थोडीफार बदलली मात्र पुन्हा काही दिवसांनी जैसे थे अवस्था बनली आहे.
आजही इथे चालणाऱ्या असंख्य गोष्टी या दबक्या आवाजात सांगितल्या जातातच. पण मृत आमदार इथे तब्बल वर्षभर राहिला होता हे एकदाच घडले होते.
हे ही वाच भिडू.
- राज्यातले बरेच आमदार बीडच्या या पठ्ठ्याकडूनच कपडे घेतात.
- चारित्र्यवान प्रधान मास्तरांच्या गादीखाली साडी सापडते तेव्हा…
- मुंबईच्या हनुमान थिएटरमधून आमदार- खासदारांना उचलून बाहेर काढावं लागायचं