शिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा केलीय, पण त्यांची ताकद किती?
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढणार.
आमची जेवढी ताकद आहे, त्या ताकदीनं आम्ही लढू. मात्र, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी आघाडी करणार नाही. समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नव्या आघाडीला देखील शुभेच्छा. पण शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार.
हि घोषणा आहे शिवसेना नेते आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांची. उत्तरप्रदेशच्या विधानसभेची मुदत मे २०२२ मध्ये संपणार आहे. त्यामुळेच आगामी वर्षाच्या सुरुवातीलाचं म्हणजे मार्च-एप्रिल २०२२ हि निवडणूक अपेक्षित आहेत.
यात समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजद या पक्षांनी नुकतीच आघाडी करण्याची घोषणा केली आहे. तर त्याचवेळी शिवसेनेनं मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
मात्र याचं सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उत्तरप्रदेशमध्ये ताकद किती आहे हे बघणं महत्वाचं ठरत.
तसं बघितले तर शिवसेना अगदी १९८९ पासून महाराष्ट्राबाहेरच्या निवडणूक लढवत आहे.
यात १९९१ मध्ये शिवसेनेने उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांनी १४ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, आणि एवढ्यात जवळपास ४५ हजार मत घेतली होती. यात पवन कुमार पांडे हे एक उमेदवार देखील निवडून आले होते. मात्र उत्तरप्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात एकूण मतांच्या तुलनेत शिवसेनेला ०.१२ टक्के इतकीच मत मिळाली होती.
त्यानंतर देखील शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये निवडणूका लढवल्या आहेत. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नव्हतं. अगदी अलीकडच्या काही वर्षातील सांगायच म्हंटलं तर शिवसेनेने २०१२ मध्ये तिथं ३१ जागा लढवल्या होत्या. मात्र त्यात त्यांना एकही जागा जिंता आली नव्हती.
त्यानंतर २०१७ च्या विधानसभेची निवडणूक देखील शिवसेनेने लढवली होती. यात तर त्यांनी तब्बल १५० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना अवघी ८८ हजार मत मिळाली होती. सोबतच एकही जागा निवडून येऊ शकली नव्हती, आणि टक्केवारी देखील एकूण मतांच्या तुलनेत केवळ ०.१ टक्का इतकीच होती.
त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत देखील उत्तरप्रदेशात २५ जागा लढवण्याची शिवसेनेनं घोषणा केली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नव्हतं. पण, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र शिवसेनेचे काही उमेदवार निवडून येत आहेत. त्यानंतर आता २०२२ ची निवडणूक आणि ती देखील स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
शिवसेनेच्या या स्वबळावर निवडणूक लढवण्याविषयी जेष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणतात,
आता शिवसेनेचे उत्तरप्रदेशमधील अस्तित्व नगण्य आहे, केवळ पक्षाच्या राष्ट्रीय मान्यतेसाठी काही पत आपल्याला मिळवता आली तर ती मिळवायची यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.
सोबतच एक निवडणूक चिन्ह रिझर्व करण्यासाठीचे देखील प्रकार आहे. कारण अन्य राज्यांमध्ये जे मान्यता प्राप्त पक्ष असतात त्यांचं चिन्ह त्यांना अन्य राज्यांमध्ये मिळतात, असा पूर्वी नियम होता. आता तो नियम नाही मात्र तरी देखील हे पक्ष निवडणूक लढवत असतात.
शिवसेनेच्या या भूमिकेचा भाजप किंवा हिंदुत्ववादी विचारी मतांना फटका बसेल का? याबाबत बोलताना देशपांडे सांगतात,
असं काही वाटत नाही. कारण मतदार जे असे नगण्य उमेदवार असतात त्यांना फारसं महत्व देतं नाहीत. आणि जेव्हा सरळ लढती होतात, तेव्हा किरकोळ पक्षांना तिथं फारशी किंमत राहत नाही. यामध्ये अगदी विजयी आणि पराभूत उमेदवार यातील फरक करण्याइतक देखील अस्तित्व राहत नाही.
स्वबळाची भूमिका म्हणजे गोंधळाचं राजकारण आहे का?
शिवसेनेची सध्याची स्वबळाची भूमिका म्हणजे गोंधळ्याच राजकारण आहे का? हा प्रश्न देखील सध्या विचारला जात आहे. याला २ तर्क आहेत. एकतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं एकत्र सरकार आहे.
सोबतच शिवसेना सध्या देशपातळीवर देखील विरोधी पक्षाच्या गोटात सामील झालेली दिसून येते.
काल पेगासस प्रकरणावरून दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल काॅन्फरन्स, आम आदमी पक्ष, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळ काँग्रेस आणि वीसीके अशा जवळपास १४ पक्षांची बैठक पार पडली.
सोबतच इथं आणखी एक विरोधाभास दिसून येतो, तो म्हणजे शिवसेना पक्ष विरोधी पक्षांच्या बैठकीला हजेरी लावत असला तरी तो अद्याप देखील काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा अधिकृत घटक पक्ष बनलेला नाही. मात्र त्याच वेळी शिवसेनाची याच आघाडीचं नेतृत्व शरद पवारांनी करावं याबाबत मागणी होती.
आता महाराष्ट्रात आणि देशपातळीवर शिवसेना विरोधी पक्षांसोबत असली तरी आता त्यांनी उत्तरप्रदेशच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.
याबाबत बोलताना जेष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात,
सेनेचं हे गोंधळच राजकारण वाटत नाही. कारण याआधी देखील शिवसेनेने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत निवडणूक लढवली होती. गुजरातमध्ये देखील याआधी त्यांनी भाजपसोबत युती असताना स्वबळावर निवडणूक लढवली होती, त्यामुळे भाजपचे ३ ठिकाणी उमेदवार देखील पडले होते. सोबतच राज्यात देखील महापालिकांच्या निवडणुका वेगळ्या लढवल्या आहेत.
हे हि वाच भिडू
- बाळासाहेबांनी साध्या कागदावर जागावाटप केले आणि अर्ध्या तासात शिवसेना भाजप युती झाली
- ज्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली त्या नेत्यांचं पुढे काय झालं?
- भुजबळांना तेव्हाचं शिवसेना सोडून देशभराचे OBC नेते बनायची संधी आली होती..