फक्त एकच आमदार असुनही “मनसे” भक्कम विरोधक म्हणून उभारतोय..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज वाढीव वीज बिलासंदर्भांत राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. ‘वीज बिल भरु नका’, अस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. तसेच राज ठाकरे यांचे निवेदन मनसे नेत्यांमार्फत जिल्हाधिकारांना देण्यात आले आहे.

रेल्वेप्रश्न, मंदिर प्रश्न यानंतर मनसेनं आता लाईट बिल प्रश्नी आंदोलन सुरु केलेलं आहे. बाकीचे विरोधकही आंदोलन करतात मात्र केवळ एक आमदार असून देखील मनसेच्या विविध आंदोलनाच्या बातम्या सातत्याने येत असतात.

२०१९ च्या निवडणुकांनंतर २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत राज ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’चा केवळ एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत तरी सत्तेपासून हा पक्ष कोसो दूर राहील. मात्र तरीही मनसेचे कार्यकर्ते काही ना काही मुद्द्यांवर आंदोलन करत रस्त्यावर आक्रमक झालेले दिसून येतात.

त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, अवघ्या एका आमदाराच्या जीवावर मनसे सक्षम विरोधी पक्षाची बजावत आहे का?

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मनसेने कोणती आंदोलने केली?

CAA आणि NRC मध्ये महाराष्ट्र सरकार विरोधी भूमिका

जेव्हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशभरामध्ये CAA आणि NRC ला विरोध आणि पाठिंबा देणारी सर्व आंदोलन होत होती. भाजप या कायद्यांच्या समर्थनात उभा होता. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सरकार असलेल्या राज्यांनी या कायद्यांना विरोध दर्शवला. महाराष्ट्र सरकारने या कायद्याला विरोध केला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मात्र या कायद्यांना जाहीर पाठिंबा देत महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. तसेच भाजपच्या भूमिकेची रीघ ओढत त्यांनी ९ फेब्रुवारी २०२० ला गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढला होता.

सीएएमध्ये गैर काय आहे, हा देश म्हणजे धर्मशाळा वाटते काय? असे त्यांनी यावेळी म्हंटले होते. 

परीक्षा रद्द करण्यासाठी राज्यपालांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान टाळावे यासाठी राज ठाकरे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.

त्यावेळी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद होते. राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही होते तर राज ठाकरे यांनी परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशीच मागणी केली होती.

रेल्वे प्रवासासाठी सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई लोकल सह सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करत मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, नेते संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे या चौघांनी २१ सप्टेंबर रोजी लोकलने प्रवास करत हे आंदोलन केले होते. 

यानंतर या चौघांना कर्जत चारफाटा पोलिसांनी अटक केली होती.

कोरोना काळात आंदोलन न करता ही विविध संघटनांची भेट घेत सक्रियता दाखवली.

कोरोना काळात आंदोलन न करता येत नव्हते पण विविध संघटनांनी सत्ता नसताना आणि विरोधी पक्ष नसताना राज ठाकरेंची घरी जाऊन भेट घेतली होती.

यात एकट्या सप्टेंबर महिन्यात मुंबईचे डब्बेवाले, बेस्ट कर्मचारी, डॉक्टर्स, रिक्षाचालक अशा अनेक जनांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तर वीज बिल, जिम उघडण्याचा प्रश्न, मंदिर खुली करण्याचा मुद्दा, अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारशी पत्रव्यवहार केला होता.

मंदिर उघडण्यासाठी मंदिरात जाऊन आंदोलन

राज ठाकरे यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर हि पक्षाने सातत्याने माध्यमांद्वारे मागणी केली होती. मात्र तरीही निर्णय न झाल्याने मनसेने ७ ऑक्टोबर रोजी विविध शहरांमधील मंदिरामध्ये जात पुन्हा आंदोलन केले होते.

यात पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा मंदिराच्या सभा मंडपात होम हवन व गणपतीची पूजा केली होती. तसेच पनवेलच्या विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून महाआरती करण्यात आली होती.

मद्यालय सुरु केल्यानंतर कोरोना फक्त मंदीरातच लपून बसला आहे का? असा सवाल यावेळी मनसेने केला होता.

लेखिकेच्या आंदोलनाला पाठिंबा

ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांच्यासोबत मुंबईत मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मनसेने मारहाण केली होती. या घटनेच्या निमित्ताने मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची दिसून आली.

८ ऑक्टोबर रोजी शोभा देशपांडे कुलाब्यातल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या असताना तिथल्या सराफाला मराठीत बोलण्याची विनंती केली. यावरून त्या सराफाने आपल्याला तुच्छ वागणूक देत महिला कर्मचाऱ्यांकडून दुकानातून बाहेर काढले होते, त्यानंतर त्या या घटनेविरोधात दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या.

हे प्रकरण मनसेपर्यंत पोहोचल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दुकानात गाठत सराफाला समज देण्यासोबतच शोभा देशपांडेंची माफी मागायला सांगितली. अखेर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरत त्यांची माफी मागितली. आणि त्यानंतरच त्याला दुकान उघडण्यासाठी परवानगी दिली होती. 

राज्यपालांची भेट

राज्यातील वाढीव वीज बील आणि दूध दरप्रश्नी २९ ऑक्टोबर रोजी राज ठाकरेंनी थेट राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली होती.

वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेले दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली होती.

कोचिंग क्लास पासून पालकांपर्यंत सगळेच राज यांची भेट घेतात

राज्यातील ग्रंथालये सुरु केल्यानंतर कोचिंग क्लासेस आणि इतर शालेय उपक्रम सुरु करावेत यासाठी पालक चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर कोचिंग क्लासचे चालक आणि विद्यार्थी-पालक समन्वय समितीने २ नोव्हेंबर रोजी मुंबईमधील कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

यावेळी राज यांनी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थेट राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला होता. मंत्री गायकवाड यांनी संध्याकाळी यासंदर्भात बैठक असून याबद्दल उद्यापर्यंत कळतो, अशी माहिती राज यांना दिली होती.

याच भेटीदरम्यान अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर पालकांनी राज ठाकरेंशी चर्चा केली होती. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार?, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे कसे होणार?, काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचे काय होणार अशा अनेक मुद्द्यांवर पालकांनी राज यांच्याशी चर्चा करुन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.

वाढीव वीज बिलाविरोधात पुन्हा रस्त्यावर –

आज २६ नोव्हेंबरला वाढीव वीज बिलाविरोधातील मनसेने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला.

तसेच राज ठाकरे जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकानं वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा,

असे आवाहन मनसेने नागरिकांना केले आहे.

ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी २६ नोव्हेंबरला मनसेने राज्यभरात मोर्चे काढण्यात आला आहे. मनसे नी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या प्रमुख शहरात मोर्चे काढले आहेत.

ठाणे येथे आंदोलनात सहभागी झालेले मनसे नेते रविंद्र जाधव, अविनाश जाधव, अभिजित पानसे यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

या सगळ्या आंदोलनांनंतर राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष विधानसभेच्या निवडणूका हारल्यानंतर देखील सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांना विरोध करणारा एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून मनसे उभा राहत असल्याचे म्हणायला वाव आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.