शिवसेनेच्या बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी मनसेचं महासंपर्क अभियान गेमचेंजर ठरेल का?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या बंडाने महाराष्ट्राचा राजकारण ढवळून निघालंय. शिवसेना पूर्ती वाताहत होण्याच्या मार्गावर आहे. यात भाजपाला सगळ्यात जास्त फायदा झाल्याचं दिसतंय तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडून सत्ता गेली असली तरी त्यांचे पक्ष अजून तरी शाबूत असल्याचं दिसतंय. अगदी छोटे पक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडी, बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षांनी देखील या गोंधळात चांगला भाव खाल्ला.

पण यात केवळ एकंच आमदार असलेली मनसे मात्र यात कुठं नव्हती.

मात्र शिवसेनेच्या झालेल्या पीछेहाटीत मनसेला आता संधी असल्याचं सांगितलं जातंय. बंडखोरीमुळे कोकणात शिवसेनेला मिळणार पाठिंबा कमी होणार असल्याचा अंदाज बांधून ही पोकळी भरून काढण्यासाठी  मनसेने महासंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे.

मनसेच्या विद्यार्थी आघाडीचं महासंपर्क अभियान प्रामुख्याने तरुण वर्गाला पक्षाकडे ओढण्यासाठी असल्याचं दिसतं आहे.

मनविसेच्या या महासंपर्क अभियानाचं नेतृत्व अमित ठाकरेंकडे आहे. अमित ठाकरे कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी भेटून प्रत्येक कॉलेजमध्ये मनविसेची शाखा स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. यामधून विद्यार्थ्यांची मतं मिळवण्यासाठी माणसे कामाला लागली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेची कोकणामध्ये सध्या काय स्थिती आहे आणि शिवसेनेची मतं मिळवण्यासाठी मनसेची कोकणातील आगामी रणनीती काय असेल याबद्दल चर्चा केली जात आहे. 

मनसेचं लक्ष लागलेल्या कोकणात अशी झालीय बंडखोरी 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ९ शिवसेना आमदारांपैकी ६ आमदारांनी बंडखोरी केलीय. रायगड जिल्ह्यात ७ पैकी ३ आमदार शिवसेनेचे आहेत. यात महादेव थोरवे, महेंद्र दळवी आणि भारत गोगावले यांचा समावेश आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील सेनेचे तीनही आमदार बंडखोर गटात सहभागी झाले आहेत.

तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात निम्मे गेले निम्मे राहिले 

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी ४ आमदार शिवसेनेचे आहेत. त्यातील भाष्कर जाधव आणि राजन साळवी हे डॉ आमदार शिवसेनेतच आहेत तर योगेश कदम आणि उदय सामंत हे दोन आमदार बंडखोर गटात गेले आहेत.

यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ पैकी २ आमदार शिवसेनेचे आहेत. यातील वैभव नाईक शिवसेनेत आहेत तर दिपक केसरकर हे बंडखोर गटात गेले आहेत.

परंतु बंडखोरीचा फायदा उठवू पाहणाऱ्या मनसेची मतदारसंघांमध्ये परिस्थिती अशी आहे. 

२०१९ च्या निवडणुकीत यातील ९ मतदारसंघांपैकी कर्जत, दापोली, अलिबाग आणि रत्नागिरी या चार  मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी निवडणूकच लढवली नव्हती. तर महाड आणि राजापूर मतदारसंघात मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले तसेच गुहाघर, कुडाळ आणि सावंतवाडी मध्ये मनसेचे उमेदवार पाचव्या स्थानी राहिले होते.

एवढंच नाही तर निवडणूक लढवलेल्या या पाचही जागांवर मनसेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. 

यामुळे कोकणात पक्ष विस्तारण्यासाठी मनसेनं विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलंय

सध्याची अनुकूल परिस्थिती बघून अमित ठाकरे यांनी मनविसेला राज्यातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. तसेच कोकणात शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेला टक्कर देण्याची तयारी सुरु केलेली आहे असं सांगितलं जातं.

परंतु मनविसे केवळ विद्यार्थ्यांची नोंदणी करून थांबणार आहे. कि मग विद्यार्थ्यांना आपल्या पक्षात दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी विशेष असे उपक्रम राबवणार आहे. यावर मनसेचे भवितव्य ठरेल असे विश्लेषक सांगतात.

यात कोकणातील बेरोजगारीचा फॅक्टर सुद्धा महत्वाचाय..

कारण कोकणात औद्योगिक विकास झालेला नसल्यामुळे पुरेशा प्रमाणात रोजगार नाही. कोकणात औद्योगिक विकास खुंटण्याला कोकणवासीच जबाबदार असले तरी नव्या पिढीला मात्र रोजगार हवाय. शिवसेनेसह कोणत्याही पक्षाने यावर लक्ष दिलेले नाही. परंतु नव्याने पाय रोवू पाहणारी मनसे यात भरीव काही करेलच असा अंदाज सध्या तरी वर्तवला जाऊ शकत नाही असे विश्लेषक सांगतात. 

इतर पक्ष आणि मनसे रोजगार निर्मितीसाठी काय करतात यात जरी निश्चितता नसली तरी विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे असेही सांगितले जाते. 

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडूने कोकणातील राजकीय परिस्थितीचे जाणकार ॲड. विलास पाटणे यांच्याशी संपर्क साधला.

बोल भिडूशी बोलतांना ॲड. विलास पाटणे असं सांगतात..

 “शिवसेनेत बंडाळी झाल्यामुळे याचा प्रभाव निवडणुकीवर होईल परंतु तो समोरच्या एकाच निवडणुकीपुरता मर्यादित असण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्तमान आमदारांसोबत त्याच्या सोबत असलेले दुसरे नेते ही पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न पुढील निवडणुकीत निश्चितच करतील.” असे ते सांगतात.

पुढे बोलतांना ॲड. पाटणे सांगतात कि, “शिवसेनेचे जुने कट्टर शिवसैनिक पुन्हा नव्याने पक्ष जिवंत करण्यासाठी काम सुरु करण्याची सुद्धा शक्यता आहे. जर असं झालं तर शिवसेना पुन्हा नव्या दमाने कोकणात जिवंत होण्यात मदत होईल. तसेच कोकणात फारसा कास्ट फॅक्टर जाणवत नसल्याने लोकं निव्वळ शिवसैनिक या भावनेने पक्षाच्या कामाला लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.”

निवडणुकीत जात फॅक्टर महत्वाचा मानला जातो पण कोकणात काय स्थिती आहे. 

कोकणात काही भागात जात फॅक्टर महत्वाचा असला तरी काही भागात तो महत्वाचा नसल्याचे विश्लेषक सांगतात. रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या मोठी आहे. परंतु जिल्ह्यातील एकही आमदार कुणबी नाही. 

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या तुलनेने अल्प तर मराठा जातीचे प्राबल्य असल्याचे सांगितले जाते. सोबतच मुस्लिम मतदारही काही अंशी प्रभावी असल्याचे विश्लेषक सांगतात. 

विमानतळाला दि. बा. पाटीलांच्या नावाचा मुद्दा आगरी-कोळी मतांसाठी प्रभावी ठरेल.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास, रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात आगरी-कोळी जातीची संख्या प्रभावी आहे. तसेच निवडून येणारे आमदारही आगरी-कोळी आहेत. यामुळे शेवटच्या टप्प्यात  महाविकास आघाडीने नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले असल्याचे विश्लेषक सांगतात. 

आता मनविसेने कोकणात आपलं महासंपर्क अभियान सुरु केलं असलं, तरी निव्वळ जनसंपर्काने मतं मिळवता येत नाहीत असं अनेकदा दिसून आलंय. त्यामुळे जमिनी स्तरावरून दीर्घ काळ टिकेल अशी प्रभावी पक्षबांधणी  मनसेला करावी लागेल हे निश्चित आहे.  

 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.