जेव्हा जम्मू काश्मीर जळत होता तेव्हा पुण्याच्या पोलीस कमिशनरला बोलवण्यात आलं

३०ऑगस्ट १९६५ गणेश चतुर्थीचा दिवस. भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले होते. सर्वत्र वातावरण तंग होते. पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हल्ला होईल म्हणून रात्रीच्या वेळी ब्लॅक आऊट केले जात होते. पुण्यातही अशीच परिस्थिती होती. आपले भाई बांधव सीमेवर लढत आहेत याच दडपण संपूर्ण भारतावर होते.

अशातच काही तरी क्षुल्लक कारण घडले आणि पुण्यात ऐन गणेशोत्सवात दंगल उसळली. सर्वत्र दगडफेक जाळपोळीचे वातावरण पेटलं. आधीच युद्ध त्यात हे नवं संकट पुण्यावर आलं.

तेव्हा मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. त्यांनी आणि गृहमंत्री बाळासाहेब देसाई या दोघांनी तत्काळ पोलिसांना परिस्थिती काबूत आणण्यासाठी मोकळीक दिली. पुणे शहरात कर्फ्यू लावण्यात आला. कर्फ्यू असूनही काही ठिकाणी दंगल न थांबल्यामुळे गोळीबार देखील करण्यात आला.

दोनच दिवसात दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात आले पण कर्फ्यू दहा दिवसांसाठी कायम राहिला. काहीही झालं तरी पोलिसांनी गणेशोत्सव थांबवला नाही. अगदी शेवटच्या दिवशी साधेपणाने का असेना अनंत चतुर्दशीची मिरवणूक काढण्यात आली. अशा अंधःकाराच्या सावटात गणेशोत्सव पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळविल्याची बातमी धडकली.

दोन्ही संकटे पार पडली. पुण्यातील दंगल रोखण्याबद्दल इथल्या पोलिसांचं कौतुक देशभरात झालं. या निमित्ताने शहरासाठी पोलीस आयुक्तालय सुरू झाले आणि शहराचे पहिले पोलीस आयुक्त बनले, 

 इमॅन्युएल सुमित्र मोडक

ते मूळचे साताऱ्याचे. पुणे येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुंबईतील महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली. त्याच काळात ते ब्रिटिश इंडियन पोलीस परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये सातारा येथे ते साहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर रुजू झाले.

गांधीजींनी सुरु केलेल्या चले जावं आंदोलनाचा हा काळ. संपूर्ण देशात लोक रस्त्यावर उतरले होते. सातारा जिल्ह्यात मात्र या आंदोलनाने वेगळेच रूप घेतले होते. इथल्या क्रांतिकारी तरुणांनी एकत्र येऊन क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना केली होती.

सरकारी काम ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलनाचा सहारा या क्रांतिकारकांकडून घेतला जात होता. सातारा जिल्ह्यात एक समांतर सरकार या स्वातंत्र्यसैनिकांकडून चालवले जात होते. सातारच्या पोलीस खात्यात असलेल्या एस.एस.मोडक यांनी ही परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळली.

तिथे केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने त्यांना पोलीस पदक दिले.अत्यंत तरुण वयात हे पदक मिळवणारे मोडक हे पहिले ऑफिसर ठरले होते.

साताऱ्यात त्यांनी केलेली कामगिरी प्रचंड गाजली. प्रसंगी वसंतदादा पाटील यांना त्यांनी अटक केली. पुढे याच स्वातंत्र्यलढ्यातील वसंतदादा, यशवंतराव चव्हाण हे क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यानंतर राज्याच्या राजकारणाचे महत्वाचे नेते बनले. पण, तरीही ‘आपले कर्तव्य बजावणारे मोडक’ म्हणून या नेत्यांशी त्यांचे संबंध सलोख्याचेच राहिले.

१९४३ मध्ये किरण सेनगुप्त या बंगाली युवतीशी त्यांचा विवाह झाला.

सातार्‍यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर नंतर मुंबई येथे त्यांनी पोलीस उपायुक्तपदी काम केले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी त्यांना बढती मिळाली.

पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर १९६५ मध्ये पुण्याचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला.

पुणे शहर आणि जिल्ह्याचे पोलीस कामकाज या आयुक्तालयातून केले जात होते. तेव्हा पुण्यात डेक्कन जिमखाना, विश्रामबाग, फरासखाना, कॅन्टोन्मेंट अशी मोजकी पोलीस ठाणी होती. पानशेतच्या धरणफुटीनंतर पुण्यात चोरीमारीचे प्रमाण प्रचंड वाढलं होतं. मोडक यांच्या पुढे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेची घडी घालण्याचे मोठे आव्हान होते.  

पुण्यात असताना त्यांनी दंगल कशी हाताळायची, पोलीस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली. जातीय दंगली होऊ नयेत यासाठी काय करायला हवे याबाबतचे आपले मतही ते अनेकदा स्पष्टपणे मांडत. 

ते जवळपास वर्षभर या पदावर होते. तिथं त्यांच्या कामगिरीवर केंद्रातून यशवंतराव चव्हाण यांचं बारीक लक्ष होतं. लालबहादूर शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्या व त्यांनी यशवंतरावांना दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालय सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं.

तो काळ धामधुमीचा होता. दिल्ली विद्यार्थी आंदोलनांनी पेटली होती. गोवधबंदीच्या मुद्द्यावरून खुद्द संसदेवर साधूंनी हल्ला केला होता. नुकतंच झालेल्या युद्धात अपयश आल्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमध्ये असंतोष माजवून तिथली परिस्थिती स्फोटक बनवण्याचा प्रयत्न चालू केला होता.

याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यशवंतरावांनी आपला सगळ्यात कर्तबगार अधिकारी काश्मीरला पाठवला.

पोलीस कमिशनर ई.एस.मोडक

मोडक हे तत्काळ जम्मू काश्मीरला रवाना झाले. दंगल सदृश्य परिस्थिती कशी आटोक्यात आणायची याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा विश्वास सार्थ करून दाखवला. आपल्या कडक शिस्तीने जम्मू-काश्मीरच्या पोलीस संचालकपदी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली.

पुढे ते मुंबईला परत आले. त्यांच्याच काळात मुंबईतील सिरीयल किलर रमण राघव याचा बिमोड झाला. या कारवाईचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते.प्रामाणिक हुशार आणि साहसी अधिकारी म्हणून त्यांचं नाव संपूर्ण देशात गाजलं.  

१९७६ मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपदावर त्यांची नेमणूक झाली. या पदावरूनच ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. पोलीस सेवा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले.

निवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी आपला बराच वेळ लिखाणात व्यतीत केला. त्यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. शिवाय त्यांच्या अनेक कथा कथाही प्रसिद्ध झालेल्या आहेत. सेंटिनेल ऑफ सह्याद्री-मेमरीज अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन्स या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केलेले होते. सम्राट अशोकाच्या आयुष्याने ते भारावून गेले होते. त्याच्याबद्दल लिहिलेली भारतातली सर्व पुस्तके त्यांनी वाचून काढली. व त्यावर  बीलव्हेड ऑफ द गॉडस्-अ स्टोरी ऑफ अशोका द ग्रेट ही कादंबरी लिहिली.

वयाच्या ९० व्या वर्षी २९ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राच्या आजवरच्या सर्वात जांबाज आणि कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये इ.एस.मोडक यांचे नाव हमखास घेतले जाते. फक्त राज्यातच नाही तर देशभरात त्यांच्या पराक्रमाचे उदाहरण दिले जाते. श्रीमती प्रतिभा बिस्वास लिखित ‘पोलीस नभोमंडळातील २१ आयपीएस नक्षत्रं’ या पुस्तकामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे.

संदर्भ- शिल्पकार चरित्रकोश वर्षा जोशी-आठवले  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.