लस बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ म्हणतायत, ओमिक्रॉनसमोर लस गंडू शकते…

सगळ्या जगभरात कोविडनं थैमान घातलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. या सगळ्यातून जगाला दिलासा मिळाला, तो मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळं. जगातल्या बहुतांश देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं, आंतरराष्ट्रीय प्रवासाचे आणि लॉकडाऊनचे निर्बंधही हळूहळू कमी होत होते. जग मोकळा श्वास घेणार, असं वाटत असतानाच ओमिक्रॉन नावाचा व्हेरिएंट आला आणि सगळी दुनिया हँग झाली.

आता बऱ्याच लोकांनी लसी घेतल्यात, परदेशात तर बूस्टर डोसही मिळालेत. तरी पण ओमिक्रॉनची भीती का वाटतेय? पुन्हा निर्बंध का लादले जातायत? जर पुन्हा कोविड होऊ शकतो तर लस घ्यायचा फायदा काय? असे प्रश्न आम्हालाही पडले. पण आम्ही उत्तरं शोधून काढली आणि तुम्हालाही सांगायचं ठरवलं…

लस बनवणारे स्टीफन बॅन्सेल काय म्हणतात?

ओमिक्रॉन या व्हेरिएंटबद्दल अजूनही अभ्यास सुरू आहे. लसींमुळं आपल्या शरीरात निर्माण झालेल्या रोगप्रतिकार शक्तीवर ओमिक्रॉन काय परिणाम करेल यावर कोविडविरोधी लस तयार करणाऱ्या मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बॅन्सेल यांनी महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ”ओमिक्रॉनमुळं लसींच्या परिणामकारकतेवर मोठा फरक पडू शकतो. पण किती फरक पडू शकेल हे आत्ताच नक्की सांगता येणार नाही. जेव्हा पूर्ण माहिती समोर येईल, तेव्हा याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल. मात्र ओमिक्रॉनबद्दल माझं ज्या शास्त्रज्ञांशी बोलणं झालं आहे, त्यांनी तरी धोक्याचा इशारा दिला आहे.”

आता लगेच घाबरून जाऊ नका भिडू लोक, कारण-

ओमिक्रॉन खरंच खतरनाक आहे की नाही हे अजून क्लिअर व्हायचंय. ओमिक्रॉन आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती कमी करेल अशी फक्त शक्यता नोंदवण्यात येत आहे. कारण ओमिक्रॉन झालेल्या लोकांपैकी बऱ्याच जणांचे लसीकरण झालं होतं. अनेकांना बूस्टर डोसही मिळाला होता. तरीही पुरेश्या आणि खात्रीशीर माहितीअभावी ओमिक्रॉनची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याची क्षमता आधी पसरलेल्या व्हेरिएंटपेक्षा जात आहे की कमी याचं अनुमान आपण काढू शकत नाही.

व्हायरसच्या कुठल्याही व्हेरिएंटचा अभ्यास करताना त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याची क्षमता तपासली जातेच, पण सोबतच तो व्हेरिएंट किती झपाट्यानं पसरू शकतो आणि गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो का हेही तपासलं जातं.

युरोपसारख्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेल्या देशांमध्येही कोविडचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. याचं कारण म्हणजे व्हेरिएंटची रोगप्रतिकारशक्ती कमी करण्याची क्षमता जास्त होती. जेव्हा डेल्टा व्हेरिएंट आला, तेव्हा भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र लसीकरण न झालेल्या लोकांमध्येच त्याचा संसर्ग झालेला आढळून आला.

डेल्टा फारसा पसरला नाही, मात्र त्याचा संसर्ग झालेल्यांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं. डेल्टा खतरनाक होताच, पण तो भारतात फारसा पसरला नाही. यामध्ये लसीकरणाचा मोठा प्रभाव होता.

लोकं ओमिक्रॉनला एवढी का घाबरत आहेत?

भारतात पहिल्या लाटेवेळी जितकी हानी झाली नाही, तितकी हानी दुसऱ्या लाटेवेळी झाली. कित्येकांना आपल्या कुटुंबातले सदस्य किंवा ओळखीतल्या व्यक्ती गमवाव्या लागल्या. बेड उपलब्ध नसल्यानं हॉस्पिटल्समध्ये झालेली गर्दी, लसींसाठी उडालेली तारांबळ या गोष्टी अनुभवल्यानं धास्ती बसली. साहजिकच ओमिक्रॉन आल्यामुळं लोकांमधलं भितीचं प्रमाण वाढलं. अजूनही ओमिक्रॉनचा परिणाम, पसरण्याचा वेग या गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते हे स्पष्ट व्हायला आणखी दोन आठवड्यांचा वेळ लागणार आहे.

कोविडचा संसर्ग होणारच असेल, तर लस घेण्यात काय अर्थ आहे?

लस बनवणाऱ्या कंपन्यांनी शंभर टक्के कोविड होणारच नाही, अशी कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. लसींचा उद्देशच कोविड झाला तरी त्याच्याशी लढू शकेल अशी प्रतिकारशक्ती बनवू शकेल अशी होती. लसींमुळं कित्येकांचं कोविड होण्यापासून रक्षण झालंच. सोबतच कोविड झाल्यावरही, हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज पडली नाही. मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर कमी झाला. लसीकरण झालेल्या लोकसंख्येला संसर्ग झालेला असला, तरी त्याची तीव्रता आटोक्यात राहिली.

आता ओमिक्रॉन झटपट पसरणारा असला, तरी त्याची तीव्रता कमी असली, तर त्याचा फार परिणाम जाणवणार नाही असा तज्ञाचा अंदाज आहे. तीव्रता कमी असल्यास त्याचा प्रसारही मर्यादित असेल. पुढच्या दोन आठवड्यांत हे चित्र आणखी क्लिअर होणार असलं, तरी त्याची वाट बघू नका.

लसीचा पहिला, दुसरा जो कुठला डोस राहिला असेल, तो लवकरात लवकर घ्या…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.