पंतप्रधान समोर दिसताच हा भाजप नेता आपल्या खिशातलं सगळं सामान मोदींकडे लपवायचा..

आपले सर्वांचे लाडके मोदीजी म्हणजे  गोष्टीवेल्हाळ माणूस किस्से सांगावे तर त्यांनी आणि लिहावं तर आम्ही. आता काही कुजकट विरोधक त्यांच्या भाषणांना खोटं ठरवतात पण त्याला आपण काय करणार? आता सांगणारा थोडं मीठ मसाला लावून सांगणारच की ओ. पण एक गोष्ट मात्र खरी.  बालनरेन्द्र की कहानीया असतात मात्र गमतीदार..

तर गोष्ट आहे आपल्या मोदीजींच्या तारुण्यातली.

मोदीजी राजकारणात आपले पाय मजबूत करण्याच्या खटपटीत होते. संघ प्रचारक म्हणून गुजरातमध्ये वणवण भटकल्यावर त्यांना भाजपचा कार्यकर्ता म्हणून दिल्लीला रवानगी करण्यात आली होती. इतर नेते दिल्लीला गेल्यावर तिथला चकाचौंद बघून दिपून जातात. पण मोदीजींनी ठगांच्या दिल्लीला सुद्धा लवकरच आपल्या खिशात टाकलं.

आपली मिठास वाणी, १८-१८ तास काम करण्याची कॅपॅसिटी यामुळे लवकरच ते दिल्लीच्या भाजप नेत्यांमध्ये फेमस झाले. इतर पक्षीय नेत्यांमध्ये देखील हा मेहनती यंग मॅन डोळ्यात भरू लागला.

भारताचे ८ वे पंतप्रधान चंद्रशेखर म्हणजे एक भारतीय राजकारणातील रांगडा गडी. अस्सल ग्रामीण शेतकरी कुटूंबातून आलेले चंद्रशेखर आपल्या फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांना शहरी कृत्रिम गोडगोड बोलणे जमायचं नाही. थेट पाकिस्तानी पंतप्रधानांना फोन करून त्याची खरडपट्टी काढण्याएवढा रोखठोकपणा  त्यांच्याकडे होता.

पण हा किस्सा मात्र पहिल्या जनता सरकार वेळचा असावा.

राजस्थान भाजपचे जेष्ठ  नेते भैरोसिंह आणि मोदीजी पार्टीच्या कामासाठी म्हणून कुठल्या तरी दौऱ्यावर चालले होते. दोघे दिल्ली एअरपोर्ट वर होते. अजून विमान येण्यासाठी थोडा वेळ होता म्हणून ते गप्पा मारत बसले होते.

इतक्यात त्यांना दूर वरून चंद्रशेखर येताना दिसले. ते देखील कुठे तरी काम असल्यामुळे जाणार होते. योगायोगाने त्यांची फ्लाईट सुद्धा त्याच वेळेला होती. धोतर दाढी अशा पेहरावातले चंद्रशेखर मोठमोठ्या ढांगा टाकत येतायत हे मोदीजी पाहात होते आणि इकडे अचानक भैरोसिंह शेखावत यांची गडबड उडाली.

त्यांनी हळूच नरेंद्र मोदींना बाजूला घेतले आणि आपल्या खिशातला सगळा ऐवज त्यांच्या खिशात टाकला आणि काही बोलू नको अशी खूण केली. मोदीजींना काही कळेचना कि नेमका चक्कर काय आहे ? हे सगळं एवढ्या फास्ट घडलं कि मोदींना आपल्या खिशात काय आहे हे चेक करायला सुद्धा वेळ मिळाला नाही.

इतक्यात चन्द्रशेखर तिथं येऊन पोहचले.

भैरोसिंह शेखावत त्यांचं स्वागत करू लागले पण चंद्रशेखर काही बोलले नाहीत. त्यांनी थेट आपले दोन्ही हात शेखावत यांच्या कुडत्याच्या खिशात घातले. त्यांना तिथं काही सापडलं नाही. त्यांच्या पार्टीचे इतर लोक देखील सोबत होते. त्यामुळे चंद्रशेखर काही बोलले नाहीत. ते हसले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या.

काही वेळानी ते गेले आणि शेखावत यांनी आपला ऐवज मोदींकडून वापस घेतला. आपले मोदीजी अजून धक्क्यातून सावरायचे होते. एवढा मोठा नेता येतो आणि आपल्या शेखावतजींच्या शर्टचे खिसे चेक करतो आणि ते देखील त्यांचं सामान आपल्याकडे लपवतात. हा नेमका प्रकार काय आहे ?

यावर भैरोसिंह शेखावत यांनी आपला बटवा उघडला आणि त्यात काय सामान आहे ते दाखवल. त्यात पान परागची डब्बी, तंबाखू चुना वगैरे गोष्टी होत्या. भैरोसिंह शेखावत यांना या गोष्टींचा नाद होता. त्यांना तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही.

त्या मानाने चन्द्रशेखर कडक स्वभावाचे होते. त्यांना कोणतंही व्यसन खपायच नाही. भैरोसिंह शेखावत जरी जनसंघ भाजपच्या विचारांचे असले तरी ते त्यांना आपल्या लहान भावा प्रमाणे वागवायचे. म्हणूनच चंद्रशेखरजी त्यांना भेटले की सगळ्यात पहिलं काम खिसे चेक करायचे आणि त्यात मिळलेल्या गायछापच्या पुढल्या, चुन्याच्या डब्ब्या, पान पराग जे काही सापडेल ते घेऊन तिथल्या तिथे कचऱ्यात फेकून द्यायचे.

असं त्यांचा दरारा असल्यामुळे भैरोसिंह शेखावत आपला पान तंबाखूचा डब्बा मोदींच्या खिशात लपवायचे.

काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी मोदींनी हा किस्सा आपल्या भाषणात सांगितला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.