मोदीजीनां राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल काय वाटत?
आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीची १५० जयंती. त्यानिमित्ताने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लिहिलेला एका लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी लिहिलं की
चिमूटभर मीठ उचलून मोठी चळवळ सुरू करण्याची शक्ती गांधी यांच्यात होती. भारतात स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी झाल्या, परंतु त्या सर्वांमध्ये बापूंचा संघर्ष सर्वात वेगळा होता. त्यांचा जन्म भारतात झाला, परंतु त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगभरात दिसून येतो.
नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीच्याच गुजरातचे आहेत. बऱ्याचदा विरोधक त्यांच्यावर आरोप करतात की मोदी ज्या विचारसरणीला मानतात ती गांधींच्या विचारांविरुद्ध आहे. आजही त्यांचे अनेक कार्यकर्ते खाजगीमध्ये गांधीजींवर टीका करताना दिसतात. मात्र नरेंद्र मोदी मात्र आपल्या देशोदेशीच्या कार्यक्रमात गांधीजींचा विचार कसा योग्य आहे हे सांगताना दिसतात.
अशा वेळी मोदीजींनी गांधीजीबद्दल वेळोवेळी काय म्हटल आहे ते पाहूया
युनायटेड नेशन्स २५ सप्टेंबर २०१९.
महात्मा गांधींनी लोकशाहीच्या खऱ्या सामर्थ्यावर जोर दिला होता. जनतेने सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे अशी दिशा त्यांनी दाखविली होती.
गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या महात्मा गांधी जयंतीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेद्र मोदी बोलत होते. या प्रसंगी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, युनोचे महासचिव उपस्थित होते.
१ ऑक्टोबर २०१८
गांधीजी, त्यांचे विचार इतके खोलवर समजले नसते तर स्वच्छता अभियान आमच्या सरकारच्या अग्रक्रमात कधीच आले नसते. मला बापूंकडूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छ भारत अभियान सुरू झाले.
मागच्या वर्षी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भरलेल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनात बोलताना मोदींनी वरील वक्तव्य केले.
२९ जून २०१७ साबरमती
हा अहिंसेचा देश आहे. हा महात्मा गांधीचा देश आहे. गौरक्षेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची हत्या करणे मला मान्य नाही.
गौरक्षकांनी गायीला वाचवण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारलाय व देशभर त्यांची गुंडगिरी वाढली आहे अशी उदाहरणे समोर येत होती. त्यावेळी मोदींनी त्यांची या शब्दात कानउघडणी केली.
लंडन १२ नोव्हेंबर २०१५
“मला विचारण्यात आले. ब्रिटीश संसदेबाहेर महात्मा गांधींचा पुतळा का उभा आहे? मी म्हणालो की ब्रिटिश त्यांचे मोठेपण ओळखण्यापुरेसे हुशार आहेत. आम्ही भारतीय सुद्धा त्यांना वाटून घेण्यापुरते उदार आहोत. गांधीजींचा स्पर्श झाला म्हणून आम्ही दोन्ही देश भाग्यवान आहोत.”
ब्रिटीश संसदेच्या प्रांगणात महात्मा गांधींचा पुतळा उभा करण्यात आला आहे. त्याच्या भेटीला गेलेल्या नरेंद्र मोदींनी तेथील संसदेला संबोधित करताना हे वक्तव्य केले होते.
१६ नोव्हेंबर २०१४ ऑस्ट्रेलिया
गांधीजींचे विचार स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात जितके कालसुसंगत होते तितकेच ते आजही आहेत. त्यांचे महत्व त्यांची व्याप्ती आजही कमी झालेली नाही.
आपल्या पंतप्रधानपदानंतरच्या पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नरेंद्र मोदींनी ब्रिस्बेन येथे महात्मा गांधींच्या पुतळयाच अनावरण केलं. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची प्रशंसा केली होती.
हे ही वाच भिडू.
- गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का?
- हा मराठी पोरगा महात्मा गांधींना सायकलवरून चीनला घेवून गेला होता.
- नरेंद्र मोदींनी पुण्याच्या समाजवाद्यांवर जोक केला, वाचा वाचा.