इंदिरा गांधींच्या काळात सुरू झालेली कंपनी मोदी सरकारनी विकायला काढलीये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने देशात निर्गुंतवणुकीचे धोरण राबवले आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा समूहाने एअर इंडियाची खरेदी केली होती. सोबतच एलआयसीमधली हिस्सेदारी आणि इतर काही सरकारी मालकीच्या कंपन्याही येत्या महिन्यांत विकल्या जातील अशी शक्यता आहे.

या आर्थिक वर्षात विकली गेलेली एअर इंडिया ही पहिली सरकारी कंपनी ठरली. तब्बल १८ हजार कोटी रुपयांना टाटा समूह आणि सरकारमध्ये हा करार झाला. त्यातच आता या आर्थिक वर्षात आणखी एक सरकारी कंपनी विकली जाणार आहे, ती म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड.

नेमका विषय काय आहे, हे सांगतो-

सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच सेल या कंपनीच्या निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया २०१६ सालापासूनच सुरू झाली होती. त्यानंतर, २०१९ मध्ये सरकारने निविदा मागवल्या होत्या; मात्र या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच सेलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचं खासगीकरण करण्यास विरोध केला होता. त्यानंतर, फेब्रुवारी २०२० मध्ये विक्रीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.

विक्रीबाबतचा ग्रीन सिग्नल कोणाकडून येतो-

आर्थिक व्यवहारां संदर्भातले निर्णय घेण्यात संसदीय समितीचीही महत्त्वाची भूमिका असते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र प्रसाद यांचा या संसदीय समितीमध्ये समावेश आहे. सरकारनं सेलमधली १०० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळं या कंपनीचं १०० टक्के खासगीकरण होणार आहे.

नंदल फायनान्स अँड लिजिंग कंपनीनं सर्वात मोठी बोली लावत तब्बल २१० कोटींना सेल कंपनी विकत घेतली आहे.

आता जाणून घेऊयात सेल कंपनीबद्दल-

सेल कंपनी तयार झाली ती १९७४ मध्ये. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पुढाकार घेऊन देशात अनेक कंपन्यांची आणि महामंडळांची स्थापना केली. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडही त्यावेळेसच स्थापन झाली. या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि संशोधन आणि विकास संस्थांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा व्यावसायिकरित्या वापर करणे आहे.

सेलनं स्वतःच्या रिचर्स सिस्टीमसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांच्या संशोधनाच्या आधारे अनेक गोष्टींचं देशात पहिल्यांदाच उत्पादन केलं. संरक्षणाशी संबंधित उत्पादनांचाही यात समावेश होता. सौरउर्जेवर चालणारी अनेक उत्पादनं जसं की सोलार पॅनेल, देशात पहिल्यांदा आणायचं श्रेयही सेल कंपनीलाच जातं. सेलनं बनवलेल्या सौरउर्जेवरच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय दर्जाही प्राप्त झाला आहे.

सौरउर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांसोबतच सेल भारतीय रेल्वे आणि भारताच्या सुरक्षा दलांसाठी लागणारी उत्पादनंही बनवतं. सेलला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

आता मात्र सेलची पूर्ण हिस्सेदारी खासगी कंपनीकडे जाईल. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातच कंपनीची विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.