नरेंद्र मोदी राजकारणात आले ते अरुण जेटलींचं बोट धरून…
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातुन निवडणूक लढवत देशाचे पंतप्रधान झाले. भाजपसाठी आणि मोदींसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. पण ही खुशी एका बाजुला असतानाच दुसऱ्या बाजुला या क्षणाला दृष्ट लावणारी एक गोष्ट घडली होती.
अमृतसरमधून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असलेले भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचा पराभव झाला होता.
एकीकडे मोदींनी देशाचा गड जिंकला होता पण त्यांचा मित्राचा पराभव झाला होता. तो ही अगदी जिवाभावाच्या मित्राचा.
आपण नरेंद्र मोदी-अमित शहा या मैत्रीचे किस्से सांगतो, ते कसे भेटले, कसे एकत्र आले अशा गोष्टी सांगतो पण अमित शहांच्या ही आधीपासून अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी एकमेकांचे मित्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात ते दिल्ली या राजकीय वाटचालीत अरुण जेटलींचा सिंहाचा वाटा होता.
पंतप्रधान पदासाठी त्यांचे नाव पहिल्यांदा सुचवणारेही जेटलीच होते.
मोदी – जेटली या जोडीच्या मैत्रीची सुरुवात झाली ती विद्यार्थी आंदोलन आणि आणीबाणी पासून. तेव्हापासूनच दोघांनी एकमेकांना ओळखायला सुरुवात केले होती. जेटली हे दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी नेते तर मोदी गुजरातमध्ये संघाचे प्रचारक.
आणीबाणी दरम्यानच्या आंदोलनात विद्यार्थी नेता म्हणून जेटली पहिल्या फळीतुन आंदोलनात उतरले. पोलिसांनी अटक केली न् ते जवळपास १९ महिने तुरुंगात होते. तर मोदी भूमिगत राहून आणीबाणी विरोधातील आंदोलनात सक्रिय होते.
ते तुरुंगातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये सेतू म्हणून काम करत होते. याच दरम्यान दोघांची ओळख झाली. जेटली वरिष्ठ नव्हते तरी मोदी त्यांची मदत करायचे.
पुढे आणीबाणीच्या समाप्तीनंतर लगेचच मोदी काही काळासाठी पुन्हा दिल्लीला आले. आणीबाणीवर पुस्तक लिहिण्यासाठी ते दिल्लीच्या दीनदयाळ शोध संस्थेशी जोडले गेले. त्याच दरम्यान त्यांचे गुरु आणि संघाचे वरिष्ठ नेते लक्ष्मणराव इनामदार आणि दत्तोपंत ठेंगणी यांच्या सांगण्यावरून दिल्ली विद्यापीठामध्ये एक्सटर्नल विद्यार्थी म्हणून बीए साठी प्रवेश घेतला.
जेटली देखील याच विद्यापीठातील. त्यांच्या राजकारणाची सुरुवात देखील इथपासूनच झाली होती. जेटली हे अत्यंत गर्भ श्रीमंत कुटुंबातील. पण ते बाहेर कुठेही आपल्या श्रीमंतीचा माज दाखवत नसतं. त्यामुळेच गरीब असलेल्या मोदींशी त्यांची चांगली मैत्री झाली.
मोदींना राजकारणाचे पहिले धडे अरुण जेटली यांनीच दिले.
पुढे १९७८ च्या नंतर मोदी पुन्हा एकदा गुजरातला गेले. आणि संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. तिकडे जेटली देखील दिल्लीमध्ये वकिलीची प्रॅक्टिस करू लागले. दोघेही आपआपल्या आयुष्यात व्यस्त झाले. संघाच्या काही कामानिमीत्त दिल्लीला जाणं झालं तर त्यांची भेट व्हायची.
१९८७ मध्ये मोदी गुजरात भाजपचे महामंत्री म्हणून पक्षात आले. सोबतच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील बनले.
त्याच काळात १९९१ मध्ये जेटली देखील राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले. १९९१ ला भाजपच्या अध्यक्षपदी मुरली मनोहर जोशी आले. त्यांच्या राष्ट्रीय एकता यात्रेचे आयोजनाची जबाबदारी दोघांकडे होती.
मोदींच्या दिल्लीच्या राजकारणात त्यांना सहारा आपल्या खास मित्राचा म्हणजेच अरुण जेटलींचाच होता.
पुढे १९९४-९५च्या दरम्यान गुजरातमधील शंकर सिंह वाघेला यांच्या भाजपमधील बंडाच्या पार्श्वभूमीवर मोदींना गुजरातमधून दिल्लीला पाठवले. त्यावेळी त्यांची राहायची व्यवस्था तत्कालिन राज्यसभा सदस्य दिलीप शंघानी यांनी आपल्या बंगल्यावरती केली होती.
पण मोदींना हव्या असणाऱ्या सगळ्या आवश्यक सामानाची व्यवस्था अरुण जेटली यांनीच केली होती. ते जे काही सामान लागेल ते आपल्या घरून घेऊन जात असत. त्यावेळी दोघेही पक्षातील अननुभवी नेते होते.
१९९८ मध्ये मोदींना भाजपचे महासचिव बनवले तर एका वर्षातच जेटलींना देखील पक्षाचे प्रवक्ता बनवण्यात आले. तोपर्यंत दोघांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. परंतु मोठ्या दर्जाची पद देण्यात आली होती.
१९९९ च्या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले, तेव्हा जेटली यांना लॉटरी लागली. ते माहिती आणि नभोवाणी खात्याचे (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री झाले.
जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) धोरणानुसार प्रथमच सुरू केलेल्या निर्गुतवणूक मंत्रालयाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. नंतर कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार खात्याचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आला. जबाबदार्या यशस्वी पार पाडल्याने नोव्हंबर २००० मध्ये कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार आणि जहाज खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले.
सोबतच गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य देखील. त्यामुळे सहाजिकच गुजरातमधील राजकारणातील त्यांचा सहभाग वाढला. २००१च्या भुकंपानंतर केशुभाईंचा राजीनामा घेण्यात आला आणि इथे मुख्यमंत्रीपदासाठी नरेंद्र मोदींचे पहिल्यांदा नाव सुचवले ते अरुण जेटलीनीच. दोन वर्षात मोदी देखील गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
जेटली आपल्या मित्राच्या बचावाला धावले होते
२००२ मध्ये गुजरात दंगलीचे प्रकरण घडले आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना राजधर्माची आठवण करून दिली. मोदींवर चहुबाजूंनी हल्ले सुरु झाले.
यानंतर अरुण जेटली यांना मोदींचा राजीनामा घेण्यासाठी गुजरातला पाठवले. जेटली तिथे नरेंद्र मोदींचा राजीनामा घेवून गोव्याला कार्यकारणीच्या बैठकीला जाणार होते. पण गुजरातमध्ये पोहचताच त्यांना असे वाटू लागले की, राजीनामा घेणे कदाचित चुकीचे असू ठरेल.
यानंतर जेटलीच स्वतः मोदींच्ये बचावात पुढे होते. सोबतच दंगलीसंबंधीत अनेक बाबींवर कायदेशीर सल्ले देखील दिले. त्यामुळे मोदींना या दंगलीच्या आरोपांबाबत विरोध करता आला.
२००९ मध्ये जेव्हा लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूका हारले तेव्हा जेटली पुन्हा ॲक्शनमध्ये आले. हळू हळू ते मोदींना राष्ट्रीय नेता म्हणून महत्व वाढवायला सुरु केले. नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागले होते त्यावेळी अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी यांना बळ देण्याचे काम केले .
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांना आधी पक्षाचे प्रचार प्रमुख आणि नंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. त्यामध्ये अरुण जेटली आणि राजनाथसिंग यांनी निर्णायक प्रसंगात नरेंद्र मोदी यांना बळ दिले आणि मोलाची मदतही केली.
मित्राने केलेल्या मदतीला मोदी देखील विसरले नाहीत. जेटली यांनी २०१४ पर्यंत कधीच थेट निवडणूक लढवली नव्हती. पण मोदींनी २०१४ मध्ये प्रथमच त्यांना अमृतसरमधून नवज्योतसिंग सिद्धच्याऐवजी भाजपतर्फे लोकसभेसाठी निवडणूक लढवायला लावली.
पण काँग्रेसचे नेते व पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांना पराभूत केले. मात्र, मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर अरूण जेटली अर्थ आणि संरक्षण या दोन्हीही खात्यांची सूत्रे देण्यात आली.
केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावरही जेटलींनी त्यांच्या प्रत्येक धोरणाची पाठराखण केली, विशेषतः आर्थिक धोरणांच्या कार्यवाहीसाठी जिवाचे रान केले.
२०१९ मधील निवडणूकांमध्ये मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले, तेव्हा जेटली प्रकृतीच्या कुरबुरीने पुर्वीच्या तडफेने निवडणूक प्रक्रियेत सामील होवू शकले नव्हते. पुढे निकालांनंतर अवघ्या तीन महिन्यांमध्येच २४ ऑगस्ट २०१९ ला त्यांचे निधन झाले.
हे ही वाच भिडू.
- जगाचं रक्षण करणाऱ्या शक्तिमानला अरुण जेटलीनीं वाचवलं होतं.
- काश्मीरचे जावई जेटली यांनी कलम ३७० चा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळला असता.
- भाजप-जेडीयू युती तुटणार होती पण एका माणसाने ठरवलं नितीश कुमार मुख्यमंत्री होतील
- जॉर्ज फर्नांडिस यांचा सिक्रेट प्लॅन फसला नाही तर अडवाणी २००८ साली पंतप्रधान झाले असते