आजवरचा इतिहास सांगतो, प्रोजेक्ट भारी असला की मोदी सुट्टी देत नाहीत..!!!

वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरु आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार असतांना सुद्धा तो गुजरातला पळवला गेला अशी टीका सुद्धा केली जात आहे. या सगळ्यामागे मोदींचा प्रभाव असल्याची टीका सुद्धा केली जातेय.

परंतु मोदींच्या प्रभावाने गुजरातमध्ये सुरु झालेला हा पहिलाच प्रोजेक्ट नाहीये. आजवरचा इतिहास सांगतो, प्रोजेक्ट भारी असला की मोदी सुट्टी देत नाहीत..!!! 

कसं तर नरेंद्र मोदींच्या प्रभावाने वेदांतापूर्वी अनेक प्रोजेक्ट्स गुजरातमध्ये सुरु करण्यात आलेले आहेत. त्यात अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. 

१. टाटा नॅनो प्रोजेक्ट  

देशातील लोकांच्या असुरक्षित बाईक प्रवासाला बघून रतन टाटा यांनी सामान्य माणसाला परवडेल अशी कार बाजारात आणण्याचा निर्णय केला होता. त्यासाठी नॅनो कारची निर्मिती करण्यात आली होती. या नॅनो कारला बनवण्यासाठी २००६ मध्ये पश्चिम बंगालच्या सिंगूरमध्ये प्लांट बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी स्थानिक लोकांसह या प्लांटला विरोध केला होता.

त्यांच्या आंदोलनामुळे प्लांट बंद करण्यात आला आणि त्याला दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हा हा प्लांट स्वतःच्या राज्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी प्रयत्न केले. मात्र नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने हा प्लांट गुजरातच्या सानंद येथे हलवण्यात आला.

या प्लांटमध्ये तब्बल ४.५ हजार करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. या प्लांटसाठी गुजरात सरकारने अतिशय कमी भाडेतत्वावर १.१ हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. यात ४ हजार कर्मऱ्यांना थेट तर हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला होता. 

२. मुंद्रा पोर्ट 

मुंद्रा पोर्ट हे भारतातील सगळ्यात मोठ्या खाजगी बंदरांपैकी एक आहे. याची निर्मिती १९९४ मध्ये सुरु करण्यात आली होती. पोर्टची सुरुवात सरकारी कंपन्यांनी केली होती मात्र १९९८ मध्ये यात अदानी ग्रुपने सुद्धा काही भाग खरेदी केले. त्यानंतर २००५ मध्ये अदानी पोर्ट लिमिटेड आणि गुजरात अदानी पोर्ट लिमिटेड या दोन कंपन्यांना मर्ज करण्यात आलं. तेव्हापासून अदानी पोर्ट अँड सेज कंपनीकडून हा पोर्ट चालवला जातो.  

या पोर्टला विकसित करण्यासाठी अतिशय स्वस्त दरात गुजरात सरकारने जमीन उपलब्ध करून दिली होती. ही जमीन देण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले असे सांगितले जाते. १४४.४ मिलियन टन मालाची वाहतूक क्षमता असलेला हा पोर्ट आज भारतातील सगळ्यात मोठा खाजगी पोर्ट आहे.

२०१९ मध्ये या पोर्टच्या विस्तारासाठी ५७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली होती. २०२१ च्या आकडेवारीनुसार २ हजार ७३३ लोकांना रोजगार मिळालेला आहे. 

३. जामनगर रिलायन्स ऑइल रिफायनरी

जामनगर शहराच्या जवळ १९९९ मध्ये रिलायन्स कंपनीने क्रूड ऑइल रिफायनरीची सुरुवात केली होती. प्रतिदिन ६ लाख ६८ हजार बॅरल प्रतिदिन या क्षमतेने हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला. मात्र २५ डिसेंबर २००८ मध्ये ऐलायन्स ग्रुपने जामनगरच्या नवीन आर्थिक क्षेत्रात आणखी मोठी ऑइल रिफायनरी स्थापन करण्याची घोषणा केली. ३६ महिन्यानंतर नवीन रिफायनरी सुरु झाली. 

नवीन रिफायनरीमुळे संपूर्ण प्रोजेक्टची क्षमता दुप्पट झाली. आज या प्लांटमध्ये प्रतिदिन एकूण १२ लाख ४० हजार बॅरल तेलाची प्रोसेसिंग केली जाते. आज ही जगातील सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी आहे. ही रिफायनरी ७.५ हजार एकर क्षेत्रावर बनवण्यात आलेली आहे तसेच यात ७० हजार कामगार काम करतात. तर लाखो कामगारांना यामुळे अप्रत्यक्ष रोजगार मिळल आहे. 

४. एल अँड टी आयटी पार्क 

गुजरातच्या २०२२-२७ आयटी आयटीइएस धोरणानुसार बंगलोर आणि पुण्याच्या धर्तीवर वडोदरा शहरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. यात एकूण १३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यात २०२२ मध्ये एल अँड टी कंपनीने सुद्धा ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केलाय. 

कंपनीच्या आयटी पार्कमधून एकूण २ हजार इंजिनियर आणि १० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्ये आयटी हब तयार करणे आणि त्यात मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात येते. 

५. फोर्ड इंडिया कार प्लांट

फोर्ड या कार कंपनीने गुजरातच्या सानंद शहरात २०१४ मध्ये कार बनवण्याचा प्लांट सुरु करण्याचा करार केला होता. चेन्नईच्या २ लाख कार निर्मितीच्या धर्तीवर सानंदमध्ये २ लाख २० हजार कार आणि २ लाख ७० हजार इंजिन्स बनवण्याचा प्लांट बनवण्यात आला. यात फोर्डच्या ८ वेगवेगळ्या मॉडेल्सची निर्मिती करण्यात येत होती.

या प्लांटमध्ये एकूण ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र भारतात कार विकल्या जात नसल्यामुळे ऑगस्ट २०२२ मध्ये हा प्लांट ७२६ करोड रुपयात टाटा कंपनीला विकण्यात आला.

गुजरातमध्ये सुरु झालेल्या अनेक मोठ्या प्रोजेक्टसमागे नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. त्यांनी २००३ मध्ये गुजरात इंडस्ट्रियल पॉलिसी आणली होती. या पॉलिसीमुळे राज्यात औद्योगधंद्यांना लागणाऱ्या उत्तम सेवा सुविधा निर्माण करण्यात आल्या. तसेच उद्योगाला पूरक असे निर्णय घेण्यात आले त्यामुळे २००१ नंतर गुजरातचा औद्योगिक विकास झपाट्याने झालेला आहे.

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.