एकदा तर मोदींचा खरा फोटो छापून येऊन पण खोट्या प्रसिद्धीचे आरोप झाले होते…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने मोदींची स्तुती केल्याची एक बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. यात दावा केला होता

‘Last, Best Hope of The Earth’ म्हणजेच ‘पृथ्वीवरील सर्वात शेवटची आणि सर्वोत्तम आशादायी व्यक्ती’

अगदी पहिल्या पानावरच मोदींच्या फोटोसह बातमी छापल्याचे फोटो भाजपच्या आणि मोदींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल केले होते. मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनेकांनी या बातमीच्या खोलात जाऊन ती फेक असल्याचं सांगितले होते. कारण इमेजमधील तारखेचा घोळ, सप्टेंबर महिन्याचे चुकीचे स्पेलिंग यामुळे हे दावे केले जात होते.

पण आता, खुद्द ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नेच याबाबत ट्विटरवरुन खुलासा केला आहे. त्यानुसार, ही इमेज आणि बातमी पूर्णपणे फेक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच मोदींसंदर्भातील आमच्या सत्य व तथ्य बातम्या येथे पाहायला मिळतील, असे म्हणत टाइम्स कम्युनिकेशनने एक लिंकही शेअर केली आहे.

त्यामुळे हि बातमी खोटी असल्याचं आता सिद्ध झालं आहे. मात्र याच खुलाश्यानंतर आता मोदी भक्तांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी व्हायरल केलेली खोटी बातमी, प्रचारासाठी चाललेली धडपड अशा अनेक प्रकारच्या टीका सुरु झाल्या आहेत.

पण याआधी एकदा याच्या अगदी उलट वाद सुरु होता. तेव्हा तर मोदींचा खरा फोटो छापून येऊन पण त्यांच्यावर खोट्या प्रसिद्धीचे आरोप झाले होते.

हि गोष्ट २०१२ मधील आहे. आता पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी जगप्रसिद्ध अशा टाइम मॅगझीनने मोदींची कवर स्टोरी केली होती. यात ‘Modi means business, but can he lead india?’ अशा प्रकारची स्टोरी छापून टाइमने तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले होते.

मात्र त्यावेळी Indian American Muslim Council अर्थात आयएएमसीने आरोप केला होता कि मोदींनी मॅगझीनच्या कवर पेजवर जागा मिळवण्यासाठी वॉशिंग्‍टनच्या एका पीआर एजन्सीची मदत घेतली आहे.

आयएएमसीने त्यावेळी मोदींना कवर पेजवर जागा दिल्याच्या गोष्टीचा बराच विरोध केला होता. आणि जगभरात त्याविरोधात अभियान देखील चालवलं होतं. आयएएमसीचे अध्यक्ष शाहीन खतीब यांनी आरोप केला होता कि,

वॉशिंग्‍टनची पीआर एजन्सी ‘एपीसीओ वर्ल्‍डवाइड’ यांच्या प्रयत्नांमुळेच ‘टाईम’मध्ये मोदींचे कौतुक झाले. अमेरिकेने अजून पर्यंत नरेंद्र मोदी यांना व्हिसा दिलेला नाही, आणि अलीकडेच अमेरिकेच्या काँग्रेसने मोदींवर बरीच टीका केली होती. अशा वेळी टाइमने मोदींचे कौतुक करणे या गोष्टीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.

खतीब पुढे म्हणाले होते कि, टाईमच्या कवर स्टोरीमध्ये अनेक चुकीचे आणि खोटे दावे प्रकाशित करण्यात आले आहेत. यात मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या अनेक चुकांना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुजरात सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याची प्रतिमा सुधारण्यासाठी एपीसीओ वर्ल्ड वाइड कंपनीची मदत घेतली होती.

गुजरातचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते शक्ति सिंह गोहिल यांनी देखील त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला होता. ते म्हणाले होते कि गुजरातच्या लोकांच्या पैशावर टाइममध्ये मोदींची बातमी छापली आहे.

एपीसीओ वर्ल्ड वाइड

एपीसीओ वर्ल्ड वाइड हि अमेरिकेची एक बरीच प्रसिद्ध अशी पीआर एजन्सी आहे. १९८४ पासून हि कंपनी जनसंपर्कासाठी काम करते. अमेरिकेमध्ये या कंपनीला दोन नंबरची सगळ्यात ताकदवान अशी एजन्सी असं आजही म्हंटले जाते. मलेशिया सरकार, रशियाचे एकेकाळचे दिग्गज कम्युनिस्ट नेते मिखाईल खोद्रोवस्की यांसारखे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेते, अभिनेते, संस्था या कंपनीची मदत घेत असतात.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.