मोदींच्या बड्डेला ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ का साजरा होतो…? तर त्याचं उत्तर लय सिरीयस आहे

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस…! त्यानिमित्त भाजपकडून देशभरात ‘सेवा सप्ताह’ साजरा केला जातोय तर महाराष्ट्र सरकार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करतेय. सगळं काही हॅपनिंग चालू असतांनाच दुसरीकडे देशातील तरुण वर्ग आणि विरोधी पक्ष ‘बेरोजगारी दिन’ साजरा करत आहेत.

याआधी मार्च २०१९ मध्ये ‘#में_भी_बेरोजगार’ ट्रेंड चालवण्यात आला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये #मोदी_रोजगार_दो ट्रेंड चालवण्यात आला होता तर यंदा मोदींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्विटरवर प्रचंड ट्रेंड होतोय. आतापर्यंत तीनवेळा हॅशटॅग बदलण्यात आलेत आणि या तिन्ही वेळेसच कॉमन मुद्दा फक्त बेरोजगारीचाच होता आणि आहे. 

काँग्रेसकडून हा दिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा केला केला जातोय.

पण हा ट्रेंड का चालतोय? तर अर्थातच देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून. 

तोच मुद्दा आकडेवारीवरूनच समजून घ्यावं लागेल…

भारतातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करणाऱ्या सीएमआयई प्रायव्हेट लिमिटेडच्या आकडेवारीनुसार,

मोदी सत्तेत आल्यानंतर २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये बेरोजगारीचा दर ५.४४ टक्के होता. त्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षापर्यंत वाढ होत गेलेली दिसतेय. २०२१-२२ मध्ये भारतात बेरोजगारी दर ८ टक्के होता.

२०१६-१७ मध्ये नोकरी असलेल्यांची संख्या ४०.७३ कोटी होती, २०१७-१८ मध्ये त्यात घट होऊन ही संख्या ४०. ५९ कोटींवर आली. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात हीच संख्या ४०.०९ कोटी पर्यंत खाली घसरली.

२०१९-२० या काळात बेरोजगारांची संख्या ३.५ कोटी होती पण कोरोना लॉकडाऊनमुळे यात वाढ झाली. मार्च २०२० मध्ये ८.८ असलेला बेरोजगारचा दर एप्रिल महिन्यात २३.५ वर गेला. त्यामुळे भारतात जवळपास तिप्पट लोकं बेरोजगार झालेले होते. यात ७.२ कोटी लोकांचे रोजगार गेले. तर ८.५ कोटी लोकं बेरोजगारीमुळे डिप्रेशनमध्ये गेले होते. पण लॉकडाऊन संपल्यानंतर यात सुधारणा झाली आली तरी ती पुरेशी नाहीये. 

भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर, दरवर्षी २ कोटी लोकं १५-५९ वर्किंग पॉप्युलेशनच्या ग्रुपमध्ये येतात, यात सुद्धा १५-२४ आणि २५-५९ असे दोन प्रकार पडतात. सर्वांनाच रोजगार मिळतो असं नाही. यात अनेक जण काम न मिळाल्यामुळे शांत बसतात, शेतात कामाला जातात. तर महिलांना सामाजिक निर्बंध, कायदा आणि सुव्यवस्था यामुळे घरी थांबवलं जातं. 

कमावत्या गटात बेरोजगारीचं प्रमाण मोठं आहे पण यात सगळ्यात जास्त ज्वलंत मुद्दा आहे तो तरुण बेरोजगारांचा.

१५-२४ या वयोगटातील रोजगारक्षम तरुणांना भारतात रोजगार मिळण्याचे प्रमाण कमी आहे. भारतात या वयोगटातील २३ टक्के तरुणांना रोजगार मिळतो. तर अमेरिकेत हा आकडा ५० टक्क्याहून अधिक आहे तर युरोपात ३३ टक्के आहे. अगदी भारताच्या शेजारी असलेले बांगलादेश आणि श्रीलंकेत सुद्धा हा आकडा मोठा आहे. 

या आकड्यामध्ये २०१६ पासून सातत्याने घट होत आहे. २०१६-१७ मध्ये हा आकडा २०.९ होता त्यात घट होऊन २०१७-१८ मध्ये १७.९ वर आला. तर २०१८-१९ सालात १५.५, २०१९-२० सालात १४.७, २०२०-२१ सालात १०.९ तर मागील २०२१-२२ या आर्थिक वर्षात हा आकडा १०.४ इतका कमी होता.

त्यामुळेच सरासरी देशात बेरोजगारी दर ७ टक्के असतांना तरुणांमध्ये हा दर ३४ टक्के इतका प्रचंड होता.

२०१६-१७ ते २०२१-२२ या काळात सर्व कामगारांचा कामामध्ये सहभागाचा दर ४२.६ होता तर तरुणांमध्ये हा दर २२.७ होता. त्यामुळे भारतात तरुण बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचाच परिमाण सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये दिसून येतोय.

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याच्या निम्मे सुद्धा रोजगार देण्यात आलेले नाहीत. असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून प्रकाशित झालेल्या वार्षिक रिपोर्टनुसार, मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या सेवेत एकूण ३१.१ लाख कर्मचारी होते. त्यात एकूण स्वीकृत पदांची संख्या ४०.७८ लाख एवढी आहे त्यामुळे ८.८७ लाख जागा रिक्त होत्या. यात रेल्वे, गृहमंत्रालय, पोस्ट आणि टॅक्स विभागांचा समावेश आहे.

काँग्रेसने यावरून अनेकदा भाजप सरकारवर टीका केलीय मात्र आता थेट #राष्ट्रीय बेरोजगार दिवस ट्रेंड करायला सुरुवात झाली. 

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. यात वेगवेगळे सेवा कार्यक्रम, मोफत हेल्थ चेकअप आणि दिव्यांगांना वेगवेगळ्या वस्तूंची मदत केली जाणार आहे. तर याच काळात बेरोजगार सप्ताह राबवण्यात यावा असं आवाहन काँग्रेसने विरोधी पक्षांना केलं आहे. 

 

काँग्रेसकने हा बेरोजगारी दिन साजरा करण्यासाठी ट्विटरवर ट्रेंड सुरु केलाय. “भारत जोडो” च्या ट्विटर हॅन्डलवरून सुरु केलेल्या या ट्रेन्डला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे…म्हणूनच मोदींच्या बड्डेच्या दिवशी #राष्ट्रीयबेरोजगारीदिवस ट्रेंड ट्विटरवर धुमाकूळ घालत आहे.

हे ही वाच भिडू  

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.