मोदींची कुठली मागणी धुडकावून लावताना डोनाल्ड ट्रंप म्हणाले, “ना मोदिजी ना !”

बॉब वूडवर्ड हे प्रख्यात अमेरिकन शोध पत्रकार.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकासाठी आपले सहकारी कार्ल बर्नस्टीन यांच्यासमवेत  त्यांनी शोध पत्रकारितेच्या इतिहासातील मैलाचा दगड समजले जाणारे ‘वॉटरगेट स्कॅन्डल’ बाहेर काढले होते. याच ‘वॉटरगेट स्कॅन्डल’मुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

fear1
पुस्तकाच्या कव्हरसह बॉब वूडवर्ड

त्याच बॉब वूडवर्ड यांचं ‘फिअर- ट्रंप इन द व्हाईट हाउस’ नावाचं  नवीन पुस्तक आलंय. या  पुस्तकातून रोजच डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रशासनातील नवनवीन भानगडींचा खुलासा होऊ लागलाय.

वूडवर्ड यांनी आपल्या पुस्तकात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतवर्षीच्या अमेरिका दौऱ्यासंदर्भातील एक रंजक किस्सा देखील लिहिलाय.

कॅम्प डेव्हिड रिसॉर्ट

वॉशिंग्टन डीसी या शहरापासून साधारणतः १०० किलोमीटर अंतरावर एक अतिशय सुंदर असा ‘अध्यक्षीय रिसॉर्ट’ आहे. रिसॉर्टच तो, सुंदर असणारच की ! त्यात पुन्हा अमेरिकन अध्यक्षांचा रिसॉर्ट म्हणजे काय विचारता !

‘कॅम्प डेव्हिड रिसॉर्ट’ असं या रिसॉर्टचं नाव. अमेरिकेत आलेल्या अतिशय महत्वाच्या व्यक्तींना या रिसॉर्टवर भोजनासाठी आमंत्रित केलं जातं. व्हीव्हीआयपी लोकांना रिलॅक्स होण्यासाठीचं ते स्थळ.

camp david resort
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आपले निवांत क्षण ‘कॅम्प डेव्हिड रिसॉर्ट’च्या परिसरात व्यतीत करताना

विन्स्टन चर्चिल, मार्गारेट थॅचर, ब्लादिमीर पुतीन, अँजेला मर्केल, यासर अराफात यांसारख्या जगभरातल्या दादा म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय नेत्यांनी या रिसॉर्टवरचा पाहुणचार स्वीकारून झालाय.

एवढंच काय तर आपल्या शेजारच्या पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी देखील या रिसॉर्टची हवा खाऊन झालीये. असं असताना कुठल्याही भारतीय नेत्याला मात्र अद्यापपर्यंत ही संधी मिळालेली नाही.

मोदिजींना अर्थातच ही गोष्ट खटकली. त्यांनी ठरवलं की ही कमी भरून काढायची. शिवाय अमेरिकेच्या अध्यक्षपदावर मोदिजींचे मित्रच विराजमान असल्याने भारताचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी यापेक्षा अजून योग्य अशी दुसरी वेळ कुठली असणार होती…?

झालं ! गेल्यावर्षी मोदिजी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात आपली मोहीम फत्ते करण्याचा विचार त्यांनी मनाशी पक्का केला होता. त्यासाठी मोदिजींनी व्यवस्थित फिल्डिंग देखील लावली होती.

भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानच्या संबंधामध्ये अमेरिकेची भूमिका काय असावी, या विषयावर मोदिजी ट्रंप यांच्यासोबत ‘कॅम्प डेव्हिड’ रिसॉर्टवर डिनरचा ‘आनंद’ घेत चर्चा करू इच्छित होते.

एच.आर.मॅकमास्टर हे त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. मॅकमास्टर हे अमेरिका आणि भारत यांच्यादरम्यान अतिशय सदृढ संबंध असावेत या मताचे. त्यांच्याच माध्यमातून मोदिजींनी आपला निरोप ‘व्हाईट हाऊस’पर्यंत पोहचवला होता.

मोदिजींचा निरोप घेऊन गेलेले मॅकमास्टर त्यावेळी व्हाईट हाऊसचे तत्कालीन चीफ ऑफ स्टाफ रींस प्रीबस यांना भेटले होते. मोदिजींसाठी ‘कॅम्प डेव्हिड’वर भोजनाच्या कार्यकम ठेवण्यात यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, पण प्रीबस यांनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला.

‘हा डिनर होऊ शकत नाही, कारण तो पूर्वनियोजित कार्यक्रमाचा हिस्सा नाही. राष्ट्रपती ट्रंप यांची देखील तशीच इच्छा आहे’

असं उत्तर प्रीबस यांनी मॅकमास्टर यांना दिलं होतं. त्यांचं हे उत्तर ऐकून मॅकमास्टर अतिशय नाराज झाले होते.

वूडवर्ड यांच्या पुस्तकातून समोर आलेल्या माहितीबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून अजून तरी कुठलीही टिपण्णी करण्यात आलेली नाही. ‘व्हाईट हाऊस’ने मात्र ४४८ पानांचं हे संपूर्ण पुस्तकच एक ‘मजेशीर गोष्ट’ असल्याचं सांगत त्यातील दावे झिडकारून लावलेत.

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.