योगींच्याही खूप आधी एका माणसाने युपीतल्या बेगमाबादचं नाव बदलून मोदीनगर केलं होतं !!

उत्तरप्रदेश मध्ये योगी आदित्यनाथांचं सरकार आल्यापासून एक नवीन फॅड आलंय. गावांची नावे बदलणे. उदाहरणार्थ वर्षानुवर्ष इलाहबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराला आता प्रयागराज करण्यात आलंय. असे अनेक उदाहरण आहेत. भारतीय इतिहासावर असलेला मुघल प्रभाव हटवण्यासाठी योगी सरकार हे काम करत आहे अस म्हटल जात.

काल तर त्यांनी हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करा अशी मागणी केली.

पण असा ठरवून कोणाचा प्रभाव कमी करता येत नाही. गावाला बदलायचं असेल तर तिथला विकास केला पाहिजे. असच झालं युपीच्या बेगमाबादच्या बाबतीत आणि तिथलं नाव बदलून मोदीनगर करण्यात आल होतं.

थांबा थांबा हा विकास आपल्या मोदीजीनी नाही तर ललित मोदीच्या आजोबांनी केलेला. हा तेच आयपीएलवाले ललित मोदी

का?कधी? कस? सांगतो भिडू जरा दम खा. सगळ विस्कटून सांगतो.

तर गोष्ट आहे १९०२ ची. हरियाना मधल्या महेंद्रगड गावात मुलतानीमल मोदी नावाचे मारवाडी व्यापारी राहायचे. इंग्रजाच्या देशभरातल्या मिल्ट्री कँटीनचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकड होतं. त्यामुळे पैसा तुफान होता. लग्न सुद्धा तीन चार केली. त्यातली एकच बायको वाचली. दोन नंबरच्या बायकोचा मुलगा रामप्रसाद मोदी पण सगळ्यात धाकट्या बायकोने त्याला सावत्रपणा न करता लाडाने वाढवला म्हणून त्या सावत्र आईच्या नावाने त्याने आपलं नाव बदलून घेतले,”गुजरमल मोदी”

आता प्रत्येक व्यापारी कुटुंबांप्रमाणे मोदीच्या रक्तातही बिझनेस भिनला होता.

दहावीत फेल झाल्यावर गुजरमलला त्याच्या वडिलांनी थेट शाळा सोडायला लावून पेढीवर बसवल. तिथ त्याला खर शिक्षण मिळाल,

“व्यवहार ज्ञानाच शिक्षण”

मग काय काही वर्षातच बापापेक्षा बेटा सवाई निघाला. त्याने इंग्रजी मगझिन वाचून हिशोबाच्या नव्या पद्धती शिकून घेतल्या होत्या. त्या बापाच्या धंद्यात वापरून जास्त नफा कमवून दाखवला. त्यांचा एक धान्याचा कारखाना देखील होता. गुजरमल मोदींनी आपल्या वडिलांच्या मागे लागून आपल्या मिलचा इंश्युरंस काढून घेतला.

योगायोगाने तिथे आग लागली आणि होणाऱ्या प्रचंड नुकसानीपासून  मोदी वाचले.

गुजरमल मोदीला धंद्यामधलं डोक आहे हे त्याच्या वडिलाना कळाल. पण तेव्हाचे इंग्रज सरकार आणि तिथले पतियालाचे राजे गुजरमलच्या अति महत्वाकांक्षेला बांधायचा प्रयत्न करत होते. म्हणून तो आपल्या गावातून ४०० रुपये खिशात घेऊन नशीब अजमावण्यासाठी बाहेर पडला. दिल्लीला आला. बऱ्याच खस्ता खाल्ल्या.

कुठूनतरी त्याला कळाल की तेव्हाच्या युपी मधल सरकार राज्यात साखर उद्योग वाढवा म्हणून काही तरी स्कीम देत आहे. गुजरमलने त्याचा फायदा घेतला.

१९३२ साली एका छोट्याशा खेडेगावात त्याने स्वतःचा साखर कारखाना सुरु केला. 

त्या गावाचं नाव होतं बेगमाबाद. खूप वर्षापूर्वी कुठल्यातरी मुघल बादशाहने आपल्या प्रिय बायकोच्या स्मरणार्थ वसवलेल गाव पण इंग्रजी राजवटीमध्ये दुर्लक्षिल गेलेलं. दिल्लीपासून अगदी ५० किलोमीटर अंतरावर असणार हे गाव गुजरमलला आपल्या कारखान्यासाठी योग्य वाटलं. पोरग स्वतः स्वतः काही तरी हातपाय मारतय हे बघून वडिलांनी देखील त्या धंद्यात 2 लाख गुंतवले.

उत्तर प्रदेश मधल्या सुरवातीच्या काळातल्या साखर कारखान्यामध्ये हा मोदींचा कारखाना येतो.

सुरवातीला मोदींना तो कारखाना चालवायला खूप कष्ट पडले. एकदा तर महापुरात अख्खा कारखाना बुडाला, तरी जिद्दीने गुजरमल मोदीने कारखाना चालू ठेवला. युपीच्या सुपीक जमिनीने त्यांना साथ दिली. भरपूर पिकणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग चालतील हे मोदींनी ओळखल.

बेगमाबाद मध्येच एक नवीन कारखाना सुरु केला. वनस्पती तेल.

खरं तर खूप वर्षे त्यांच्या डोक्यात ही आयडिया होती, पण साखर उद्योगात यश मिळाल्यावर त्यांनी या धंद्यात हात घातला. तसंही साखरेचा कारखाना उसाच्या सिझनमध्येच चालू असायचा. इतर वेळात त्यांनी वनस्पती तेलाकडे लक्ष गुंतवले. १९४० मध्ये हा धंदा एकदम गाजला.

लोकांना मोदी वनस्पती तेल खूप आवडले. त्यांनी त्याचे हवाबंद डब्बे सुद्धा स्वतः बनवायला सुरवात केली.

शिवाय तेल बनवल्यानंतर जो खराब माल उरला असतो त्यावर प्रक्रिया करून त्यापासून साबण वगैरे बनवले. गुजरमल मोदी ज्याला हात लावतील त्याच सोन होत होतं. अख्ख्या बेगमाबादमध्ये रोज मोदींचा नवीन कारखाना उभा रहात होता. 

याच काळात जगाला दुसऱ्या महायुद्धाने ग्रासले. धूर्त बनिया असलेल्या मोदींनी यात आपला फायदा ओळखला. मोदी फूड प्रोडक्ट्स आणि मोदी सप्लाय कोर्पोरेशन नावाच्या कंपन्या सुरु केल्या. युद्धात लढणाऱ्या सैनिकांसाठी हवाबंद डब्यात जास्त वेळ टिकेल असे अन्न ब्रिटीश सरकारला सप्लाय केला जाऊ लागला. नवीन बिस्कीट कारखाना सुरु झालायात मोदींनी तुफान पैसा कमावला.

ब्रिटीश सरकारने त्यांना रायबहादूर ही पदवी देखील दिली. पण लोक मोदींना बेगमाबादचा नवा बादशाह म्हणून ओळखत होते.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होऊ लागली. बेगमाबाद शहर मोदी कारखान्यांनी भरून वाहात होतं. गावातला १००% रोजगार मोदींनी तयार केलेला होता. हजारो लोक आसपासच्या खेडेगावातून येऊन बेगमाबादमध्ये राहू लागले होते. मुघलकालीन बेगमाबाद च रुपांतर एका इंडस्ट्रीयल सिटी मध्ये झालं होत.

अखेर १९४५ साली गावाच नाव सर्वानुमते बदलून मोदीनगर करण्यात आल. 

स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी उद्योगस्नेही धोरणे आणली. याचा फायदा मोदींना झाला. त्यांनी अनेक हजारो कारखाने त्या गावात उभे केले. टेक्स्टाईल मिल असेल, फ्लोअरमिल, रंगाचा कारखाना, टॉर्च फॅक्ट्री,स्पिनिंग मिल, स्टील फॅक्ट्री असे नवे अनेक उद्योग बनवले. त्याच्यानंतरच्या पिढ्यानीही हीच परंपरा कायम राखली.

आज ही त्या गावाच नाव मोदी नगर आहे. आता तर तिथल्या कोणाला या गावाच नाव पूर्वी वेगळ होत हे देखील ठाऊक नाही. त्यांना एवढ च ठाऊक आहे की मोदींनी आपला विकास केला आणि म्हणून गावाच नाव मोदीनगर आहे.

हे नाव कुठल्या विद्वेषातून आले नाही तर विकासातून आले आणि म्हणून टिकले. जमशेदपूर, वालचंदनगर, किर्लोस्करवाडी आणि हे मोदीनगर अशी अनेक गावे याचं उदाहरण आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.