नरेंद्र मोदींचे खास दोस्त संघाच्या महत्वाच्या पदावर आलेत….
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या दोन नंबरच्या पदावर म्हणजेच सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आलीय. बेंगळुरूमध्ये मागच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत होसबळेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यापूर्वी ते सहसरकार्यवाहक या संघातील तीन नंबरच्या पदाची जबाबदारी पार पडत होते.
थोडक्यात काय तर त्यांचं प्रमोशन झालयं, पण यामुळेच आणखी एक गोष्ट घडलीय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळचा माणूस आणि मित्र अशी ओळख असलेला नेता संघाच्या महत्वाच्या वर्तुळात जाऊन पोहचला आहे.
सरसंघचालकांना संघाच्या संविधानानुसार नेतृत्व आणि मार्गदर्शक म्हणून दर्जा आहे, त्यामुळे ते रोज काय घटनांमध्ये सक्रिय सहभाग घेत नाहीत. अशा वेळी त्यांच्या मार्गदर्शनात संघाच्या रोजचं सगळं काम सरकार्यवाहक आणि त्यांच्यासोबत चार सह-सरकार्यवाह (संयुक्त महामंत्री) हे काम पाहतात.
या ५ सदस्यीस टीमचे प्रमुख असतात सरकार्यवाहक, यावरूनच होसबळे यांची निवड किती महत्वाच्या पदावर झाली आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. पण तरीही आणखी सोपं करून आपल्या ऑफिस संस्कृतीत सांगायचं झालं तर सरकार्यवाह हे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासारखे असतात.
नरेंद्र मोदी आणि दत्तात्रय होसबळे यांची गट्टी अगदी विद्यार्थी परिषदेपासून. दोघांनी ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघाच्या विद्यार्थी शाखेपासून काम सुरु केलं. तिथं पासून ते मग अगदी आणीबाणीच्या कालखंडात विद्यार्थी आंदोलन असो किंवा तुरुंगात जाणं असो दोघे एकत्र.
त्यानंतर देशात अनेक ठिकाणी अभाविपच्या विस्तारात आणि नवीन शाखा सुरु करण्यात दोघांनी ही महत्वाची भूमिका पार पडली.
कालांतराने मोदी पूर्णवेळ भाजपमध्ये तर होसबळे पूर्णवेळ संघात आले. पण तरीही जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरात दंगलीवरून चहुबाजूनी टीका होतं असताना होसबळे मोदींच्या पाठीशी होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींचा राजीनामा घेऊ नये या घेतलेल्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला असल्याचं देखील त्यावेळी बोललं जातं होतं.
२००९ मध्ये होसबळे संघाचे सहसरकार्यवाह बनले. त्यानंतर संघाच्या विस्तारात त्यांनी लक्ष घातलं. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी नरेंद्र मोदी यांना भाजपचा आणि पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यासाठी होसबळे आग्रही होते.
मोदींसाठी सत्तेवर आल्यानंतर सर्वात महत्वाच्या ठरलेल्या आणि मिनी लोकसभा समजल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना पाटणामधून सामान बांधून लखनऊमध्ये शिफ्ट केलं होतं. तिथं त्यांनी भाजपचे निवडणूक व्यवस्थापक म्हणून जबादारी पार पडली होती. यात अगदी उमेदवार ठरवण्यापासून ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यापर्यंत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमध्ये त्यांचा रोल महत्वाचा होता.
यापूर्वी २०१८ मध्ये देखील होसबळे यांची सरकार्यवाहक पदी निवड निश्चित मनाली जात होती. पण त्यावेळी भय्यूजी जोशी यांचीच पुन्हा निवड करण्यात आली होती. त्याची दोन महत्वाच्या कारण मध्यमांमधुन चर्चिली गेली होती.
एक तर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नव्हते. ते विद्यार्थी परिषदेतून संघात आले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होसबळे यांची सरकार्यवाहक पदी निवड झाल्यास संघाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मोदी आणि भाजप यांचा सहभाग वाढू शकतो.
इतकच नाही तर त्यावेळी मोदींवर संघाचा दबाव वाढवण्यासाठी ज्या मोदींमुळे गुजरात प्रांत प्रचारक पदावरून डॉ. मनमोहन वैद्य यांना हटवल्याच्या चर्चा झाल्या होत्या, त्याच वैद्य यांना त्यावेळी होसबळे यांच्यासोबत सह-सरकार्यवाहक बनवलं होतं.
होसबळे वेळोवेळी मोदींच्या विविध निर्णयांच्या जाहिरपणे पाठीशी उभे असल्याचं दिसून येतं.
ज्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संपूर्ण देशातून विरोध होतं होता त्यावेळी होसबळे यांनी या कायद्यांना जाहीरपणे संघातून पाठिंबा दिला होता. सोबतच मागच्यावर्षी देशव्यापी लॉकडाऊनच्या निर्णयाचं देखील त्यांनी समर्थन केलं होतं. मे मध्ये एक व्हिडीओ प्रकाशित करून सरकारच्या या कडक निर्णयामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे, यासोबतच महामारीच्या या अवघड प्रसंगात देशाला एकजुटीने उभं राहायला पाहिजे, असं म्हटलं होतं.
एकूणच मोदींचा सगळ्यात जवळचा मित्र संघाच्या महत्वाच्या वर्तुळात दाखल झालायं असं म्हणण्यास हरकत नाही. भविष्यात जर बघायचं झाल्यास एका इंग्रजी वृत्तपत्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार होसबळे मोहन भागवतांची देखील जागा घेऊ शकतात.
हे हि वाच भिडू.
- नरेंद्र मोदी देखील आंदोलनातून मोठे झाले, सरकारे पाडली होती
- वाजपेयी यांच्या एका शब्दानं नरेंद्र मोदींचं अख्खं आयुष्य पालटलं.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे भाजपचे दलित खासदार!!!