भावांनो लोड घेऊ नका, मोदींच्या मिशनमुळं आता तुमच्या गाड्या पाण्यावर चालतील.

आज १५ ऑगस्ट आज आपल्या पंतप्रधानांच लाल किल्ल्यावर भाषण झालं. आता तिथं काय १५ ऑगस्टचा खाऊ काय वाटायला नाही. पण मोदींनी एक भारी विषय केलाय. म्हणे आता देशात गाड्या पाण्यावर पळणार आहेत. आयला ऐकूनच कसं कानाला गार गार वाटायलय. असो नक्की काय विषय आहे ते समजून घेऊया..

तर झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला भारताची ऊर्जा पर्याप्तता आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

पुढं ते असं ही म्हंटले की,

आज देशात होत असलेल्या सर्व कार्यक्रमांपैकी जे भारताला मोठी झेप घेण्यास मदत करेल, ते म्हणजे ग्रीन हायड्रोजनचे क्षेत्र. राष्ट्र ध्वजाला स्मरुन मी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. भारताला स्वातंत्र्याच्या १०० वर्षपूर्ण होण्यापूर्वी ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगत मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लवकरच १०० लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजना सुरू करण्याची घोषणा केली.

२०२१ च्या अर्थसंकल्पात मांडलेलं प्रपोजल पंतप्रधानांनी घोषणा करुन पुढं नेलंय.

त्यामुळे आता ग्रीन हायड्रोजनची निर्मिती शक्य होईल. या वर्षी एप्रिलमध्ये हायड्रोजन राउंड टेबल : नवी दिल्ली संवाद -२०२१ आयोजित हायड्रोजन इकॉनॉमी’ याविषयावर बोलताना तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले होते की, या ग्रीन हायड्रोजनमुळे कार्बनचे उत्सर्जन नियंत्रित करण्याचे ध्येय सरकारचे आहे.

आता हायड्रोजन वापराबद्दलचा एवढा उत्साह का दिसतो ? त्याच एक साधं कारण आहे.

ते एकतर फ्युएल सेल मध्ये वापरले जातं. किंवा मग उष्णता निर्माण करण्यासाठी जाळलं जातं. जीवाश्म इंधनांची म्हणजे पेट्रोल डिझेलची जागा हायड्रोजन घेते. त्यामुळे जागतिक तापमानवाढ कमी व्हायला मदत होते. हायड्रोजनचा अतिरिक्त फायदा म्हणजे वाहतुकीव्यतिरिक्त, हे रसायने, लोह, पोलाद, खत आणि शुद्धीकरण, वाहतूक, उष्णता आणि वीज यांसारख्या उद्योगांसाठी “डीकार्बोनायझिंग एजंट” ठरू शकते.

भारताने या ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी अनेक शोधपूर्ण पावले उचलली आहेत. भारत सध्या ब्लू हायड्रोजन, हायड्रोजन सीएनजी (एच-सीएनजी) आणि ग्रीन हायड्रोजन या प्रायोगिक प्रकल्पावर काम करत आहे. कॉम्प्रेस केलेल्या नैसर्गिक वायू आणि हायड्रोजनचे मिश्रण तयार करून वाहतूक इंधन तसेच रिफायनरीजमध्ये इंडस्ट्रियल इनपुट म्हणून याचा वापर होत आहे.

दिल्लीमध्ये एका पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून ५० बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) मध्ये मिश्रित हायड्रोजनचा वापर केला जातोय. आणि येत्या काही महिन्यांत देशभरात त्याचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे.

हायड्रोजन इंधन म्हणून कशाप्रकारे मदत करते?

हायड्रोजन हे धूमकेतूच्या स्पीडचं इंधन आहे असं म्हंटल्यास वावगं ठरु नये. हे इंधन प्रचंड उर्जा निर्माण करते. विशेष म्हणजे हे जगातला सगळ्यात मुबलक घटका पैकी एक आहे. पण पृथ्वीवर ते पाणी किंवा हायड्रोकार्बन सारख्या जटिल रेणूंमध्ये सापडते. हायड्रोजन हा काही मूळ ऊर्जेचे स्त्रोत नाही. म्हणजे जसं  जीवाश्म इंधन, सूर्यप्रकाश, हवेसारखे नूतनीकरणक्षम स्त्रोत आहेत तसा हायड्रोजन नाही.

पण यापेक्षा भारी म्हणजे,

हायड्रोजन जाळून तयार होणार उप-उत्पादन पाणी आहे. वर्ल्ड एनर्जी कौन्सिल (WEC) म्हणते की एक किलो हायड्रोजन जाळला की, एक किलो पेट्रोलपेक्षा तीन पटीने जास्त ऊर्जा बाहेर पडते आणि शिल्लक काय राहत, तर पाणी.

हायड्रोजन कसे तयार केले जाते ? हायड्रोजन मध्ये ग्रे, ब्लू, ग्रीन काय असत ?

हायड्रोजन विलगीकरणाचे अनेक मार्ग आहेत. ज्या पद्धतीनुसार हायड्रोजनचे उत्पादन केले जाते त्या पद्धतीवरुन हायड्रोजनचे ‘ग्रे’, ‘ब्लू’ किंवा ‘ग्रीन’ हायड्रोजन असे वर्गीकरण केले जाते.

WEC नुसार, २०१९ पर्यंत, ९६ टक्के हायड्रोजन, कार्बन ज्वलन प्रक्रियेद्वारे जीवाश्म इंधनातून तयार करण्यात आले. अशा प्रकारे मिळवलेल्या हायड्रोजन प्रक्रियेला ‘ग्रे’ हायड्रोजन असे म्हटले जाते. आता हे जरी इतर पद्धतींइतके महाग नसले तरी त्यातून बऱ्याच प्रमाणात कार्बन डायऑक्साईडच बाहेर पडतो.

‘ग्रे’ हायड्रोजनच्या उत्पादनात कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज (सीसीएस) प्रक्रियेतून जेव्हा CO2 बाहेर पडतो तेव्हा ‘ब्लु’ हायड्रोजन मिळतो. परंतु ही प्रक्रिया खूप महाग आहे. ‘ग्रे’ आणि ‘ब्लू’ हायड्रोजन, अशा प्रकारे, दोन्ही एकाच प्रक्रियेद्वारे तयार केले जातात.

परंतु भारत सरकारचे लक्ष्य ‘ग्रीन’ हायड्रोजन आहे. हे असे हायड्रोजन आहे जे नूतनीकरणासारख्या स्वच्छ उर्जा स्त्रोतांपासून तयार होते. ‘ग्रीन’ हायड्रोजन अक्षय स्त्रोतांपासून ऊर्जेच्या इलेक्ट्रोलायसिसद्वारे तयार केले जाते. ही प्रक्रिया, जरी ती CO2 तयार करीत नसली तरी खूप  महाग आहे. आणि अद्याप व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.

पण आपला मुद्दाय पाण्यावर गाडी कशी चालणार ?

सध्या भारतात हायड्रोजन वायू बनवण्यासाठी दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. यापैकी एका पद्धतीमध्ये, हायड्रोजन पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करून वेगळे केले जाते. म्हणजेच पाण्याच्या मदतीने बनवलेल्या हायड्रॉनने कार चालवता येतील.

पण, ही पद्धत केवळ त्या कारसाठीच शक्य होईल, ज्यांचं इंजिन हायड्रोजन गॅससाठी बनलं असेल. त्याव्यतिरिक्त नैसर्गिक वायूपासून  हायड्रोजन आणि कार्बन वेगळे करुन त्यातून गाड्या पळवता येतील. म्हणजे यातून मिळणारे हायड्रोजन इंधन म्हणून वापरले जाईल.

म्हणजे आपलं बजेट एकतर हायड्रोजन गाडी घेण्याचं नाही. त्यापेक्षा पण आपण कधीकधी आपली गाडी रॉकेलवर चालवतो. त्यामुळं अजून हायड्रोजन म्हणजेच पाण्यावर गाड्या पळवायला आपली पुढची पिढी गेली पाहिजे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.