गुजरात टायटन्स ते गुजरातचे सिंह : २००७ पासून चालू असलेला मोदींचा गुजराती अस्मितेचा प्रोजेक्ट

काही महिन्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलची फायनल झाली. गुजरात टायटन्सने आयपीएल जिंकली. गृहमंत्री अमित शहा स्वतः सामन्याला उपस्थित होते. त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ‘राज्याची’ टीम जिंकली म्हणून संपूर्ण टीमचा सत्कार केला. 

“टायटन्सचा सर्व गुजरातींना अभिमान वाटला आणि प्रत्येक गुजरातींची छाती अभिमानाने फुलून गेली”

अशी प्रतिक्रिया सत्काराच्या वेळी गुजरातच्या मुख्यामंत्र्यांनी दिली.

याआधी आयपीएलमध्ये किती टीम जिंकल्यात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती टीमचा सत्कार केलाय हे आठवा. गुजरात टायटन्स ही टीम अहमदबादच्या शहराच्या नावाने घेण्यात आली होती आणि पुढे जाऊन टीमला नाव राज्याच्या नावाने देण्यात आलं. 

जय जय गारवी गुजरात [गर्व गुजरातचा विजय] हे गाणं जेव्हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या क्वालिफायरच्या सामन्यादरम्यान डीजेने वाजवलं होतं तेव्हा प्रेक्षकांनी अख्ख स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं.

जय जय गारवी गुजरात हे गुजरातचं राज्य गीत आहे आणि गुजरात टायटन्सच्या आवे दे गाण्याची सुरवातही याच ओळीने होते. 

या सर्वात एक कॉमन थ्रेड दिसतो तो म्हणजे गुजरातची अस्मिता आणि गुजरात टायटन्सलाही या गुजरात अस्मितेच्या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेण्यासाठी चालू असलेला प्रयत्न. 

बंगाली अस्मिता किंवा तामिळ अस्मिता एवढी गुजराथी अस्मिता प्रबळ नाहीये किंवा राष्ट्रीय स्तरावर ती  तेवढी दिसतही नाही. पण त्याचवेळी गुजराती अस्मिता निर्माण करण्याचे प्रयत्न मात्र पुरेपूर चालू असतात असं दिसून येतं. विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या दिशने चांगलीच पाऊले टाकल्याची दिसतात.

गुजराती अस्मिता म्हणजे असं जर तुम्हाला प्रश्न विचारलाच तर गुजरातची संस्कृती, भाषा, प्रदेशाबद्दल अभिमान. 

याचा उद्देश काय तर सर्व गुजरातमधील सर्वांना गुजराती अस्मितेखाली एकत्र आणणे.  २००२ च्या दंगलींनंतर जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावर धार्मिक कट्टरतेचे आरोप लागले होते तेव्हा नरेंद्र मोदींना गुजराती अस्मितेने आधार दिला होता. त्यानंतरच्या जवळपास सगळ्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी इतर सर्व मुद्यांबाबरोबरच गुजराती अस्मितेच्या जीवावर मतं मागितली होती. अगदी २०१४ च्या निवडणूकीमध्ये सुद्धा ज्यामध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. 

”गुजराती जिंकलाच तर सरदार पटेल, महात्मा गांधी यांचे विचार कायम राहातील” 

जाहिराती मोदींसाठी त्यावेळी करण्यात आल्या होत्या. पुढे २०१७ च्या विधानसभेतही मोदींनी गुजराती अस्मितेचं हत्यार वापरलं होतं.

मग गुजराती अस्मिता ही मोदींनीच निर्माण केली का?

तर गुजराती अस्मितेचा प्रोजेक्ट तसा खूप जुना आहे. गांधी, सरदार पटेल यांचा जरी अस्मिता  जगवण्यासाठी उपयोग केला जात असला तरी गुजराती अस्मितेला प्रारंभिक स्वरूप देण्याचं श्रेय जातं के. एम. मुंशी यांना. मुंशी हे गुजरातचे सर्वाधिक वाचले जाणारे लेखक आहेत, त्यांच्या ऐतिहासिक कथा अजूनही पुन्हा मुद्रित केल्या जात आहेत. 

कन्हैयालाल माणेकलाल मुंशी यांनी गुजराती लोकांना अस्मितेची ओळख दिली असे मानले जाते आणि त्यामुळेच त्यांची आजही  लोकप्रियता आहे.  

मुंशी यांची अस्मिता गुजरातवर झालेल्या एकामागून एक परकीय आक्रमणांनंतर गुजरातचा अभिमान पुन्हा मिळवण्यासाठी होता. विशेषतः सोमनाथ मंदिराचा मुद्दा त्याच्या लिखाणात सारखा यायचा.

राजकीय शास्त्रज्ञ मनू भगवान मुन्शी यांना हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे मानतात ज्यांनी काँग्रेसमधून धोरणात्मकपणे काम करण्यास प्राधान्य दिले, परंतु हिंदू राष्ट्रवादी गटांशी सक्रिय  संबंध ठेवले.

त्यामुळं मुंशी यांची गुजराती अस्मिता स्वीकारणं मोदींना अवघड गेलं नाही. यूपीए सरकारच्या काळात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी लोकांना सांगायचे की सोमनाथ मंदिराची विटंबना झाल्यापासून ते सरदार वल्लभभाई पटेल यांना पहिले पंतप्रधान पद डावलण्यापर्यंत गुजरातवर नेहमीच अन्याय झाला आहे आणि सध्याच्या काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही तेच करत आहेत. 

मोदींच्या या बोलण्यावर मुन्शींच्या विचारांचा, विचारसरणीचा आणि लेखनाचा प्रभाव होता असा जाणकार सांगतात.

मात्र मोदी जेव्हा दिल्लीत गेले आणि त्यांना अमित शहांच्या रूपाने अजून एक गुजराती सहकारी मिळाला तेव्हा त्यांनी या विचारांना कृतीत आणायला सुरवात केली. अगदी मेक गुजरात ग्रेट अगेनच्या धर्तीवर काम चालू झाल्याचं दिसतं.

उदाहरणंच द्यायची झाल्यास सुरवात गुजरातचा अभिमान असलेल्या सिंहांपासून करण्यात येइल.

गुजरातमधील गीर अभियारण्य हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथं सिंह सापडतात. एवढच नाही तर जगातही आशियायी सिंहांचे हे एकमेव निवासस्थान आहे . त्याचवेळी अभयारण्यात साथीच्या रोगाने मृत्यू होण्याचा आकडा वाढत होता त्यामुळे यातील काही सिंहांना दुसऱ्या अभयारण्यात नेण्यात यावे अशी चर्चा होती.  

त्यासाठी मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर वन्यजीव अभयारण्यामध्ये सुविधा तयार देखील करण्यात आल्या आहेत. 

मात्र गुजरातचा त्यांच्या राज्यातील सिंह दुसऱ्या राज्यातील अभयारण्यामध्ये नेण्यास विरोध आहे. अगदी नरेंद्र मोदींपासून रुपानीपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. सिंह आज गुजरात अस्मितेचं प्रतीक आहे आणि गुजरात आपली ओळख इतर राज्यांशी वाटू इच्छित नाही असं जाणकार सांगतात.

भारतातली सगळ्यात मोठा पुतळा उभारण्यामागेही गुजराती अस्मितेचा अँगल होता असं सांगण्यात येतं. सरदार पटेलांचा पुतळा जो स्टॅचू ऑफ युनिटी म्हणूनही ओळखला जातो तो आज गुजरातची ओळख झाला आहे.

गुजरातची अस्मिता फक्त प्रतिकांपुरतंच मर्यादित नाहीये. नरेंद्र मोदी सरकारच्या आज अशा अनेक कृती आहेत ज्यामध्ये गुजरातला झुकते माप देण्यात आलं आहे.

२०१४ पासून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या १४ विदेशी राष्ट्राध्यक्षांना मोदी गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत. 

ट्रम्प, शिंजो आबे यांचे तर रोड शो आणि मोठाले इव्हेंट देखील आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्राध्यक्षांना गुजरात फिरवताना गुजरातची संस्कृती जगासमोर येइल याची बरोबर काळजी मोदींकडून घेतली जाते.

मुंबईत प्रस्थापित असणारी इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हीस सेंटर गिफ्ट सिटी गांधीनगरला शिफ्ट करण्यात आली. 

या सिटीद्वारे गुजरातमध्ये जागतिक दर्जाचा फायनान्शियल हब बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच भारतातील पहिली बुलेट ट्रेन देखील मुंबई -अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे आणि हा प्रोजेक्ट अहमदाबादला डोळ्यासमोर ठेऊन डिझाइन करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. 

अगदी अमित शहा यांच्याकडे सहकारमंत्री पद दिलं जातं आणि त्यांचा अनेक समारंभात सहकारक्षेत्रात गुजरात कसा श्रेष्ठ आहे हे सांगत फिरतात त्याच्याकडेही गुजराती अस्मितेच्या अँगलने आता पाहिलं जात आहे. त्यामुळं येणाऱ्या गुजरात विधानसभांच्या निवडणुकांमध्ये देखील गुजराती अस्मितेचा मुद्दा पुढे केला जाणार एवढं नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.