युरोपमध्ये भल्याभल्या राजकारण्यांना जमलं नाही ते या फुटबॉलरने करून दाखवलं !!
” If he scores another few then I’ll be Muslim too .”
ऐकायला थोडं फिल्मी वाटतं असली, तरी सध्या सगळ्या युरोपात गाजत असलेली घोषणा आहे ही . फिल्मी यासाठी म्हणलं कारण एखाद्या खेळाडूने मॅच मध्ये गोल केला तर लोक चक्क आपला धर्म देखील बदलायला तयार आहेत अशा घटना फक्त पिक्चरमध्येच घडत असतात. पण सध्या इंग्लडमधील लिव्हरपूलची जनता आपल्या एका खेळाडूसाठी मुस्लिम व्हायला देखील तयार आहे.
हा खेळाडू आहे लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा मोहम्मद सलाह .
लिव्हरपूल प्रीमियर लीग मधला खूप मोठा आणि फेमस क्लब आहे. जगभरातल्या फुटबॉल फॅन्सना खूप चांगल्या खेळाचा अनुभव त्यांनी दिला आहे. गॅरी लिंकनर ,रॉबी फॉवलर , स्टीव्हन जेरार्ड , फर्नांडो टोरेस , लुईस सुआरेझ सारखे सुपरस्टार लिव्हरपूल मध्येच तयार झाले आहेत. पण दुर्दैवाने इतके मोठे खेळाडू , जबरदस्त फॅन फॉलोविंग , भरपूर पैसा हे सगळं असताना देखील लिव्हरपूलला मोठ्या लीग जिंकण्यात नेहमीच अपयश येत होते.
लिव्हरपूलने शेवटची प्रीमियर लीग १९८९ – ९० ला जिंकली होती . त्यानंतर गेली २० वर्षे झाले प्रीमियर लीग ची ट्रॉफी त्यांना हुलकावणी देत आहे. हेच चॅम्पियन्स लीग बाबत देखील , २००५ नंतर लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीग मध्ये देखील यश मिळवता आलं नाही. याचा अर्थ असा नाही कि लिव्हरपूल अयशस्वी आहे , अगदी थोड्या फार फरकाने लिव्हरपूल च्या लीग जिंकण्याच्या संधी हुकत राहिल्या आहेत. याचगोष्टीमुळे लिव्हरपूल संघांची आणि त्यांच्या फॅन्सची कायम चेष्टा पण होते. ‘ Next year will be our year ‘ असं त्यांना चिडवलं जात.
पण २०१७ मध्ये लिव्हरपूल ने मोहम्मद सलाह ला साईन केलं आणि लिव्हरपूल चे दिवस बदलले.
इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची सलाहची हि पहिलीच वेळ नव्हती . याआधी तो चेल्सीकडून प्रीमियर लीग मध्ये खेळला आहे. आज जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सलाहला त्यावेळी इंग्लंड मध्ये पण कोण ओळखत नव्हतं. पण सलाह लिव्हरपूलकडे आला आणि त्याच तसंच लिव्हरपूलच नशीबच बदललं. लिव्हरपूल कडून खेळताना पहिल्याच सिजन मध्ये त्याने लीग मध्ये सर्वात जास्त गोल करून गोल्डन बूट जिंकला.
सलाहच्या परफॉर्मन्सच्या जीवावरच लिव्हरपूल गेल्यावर्षी चॅम्पियन्स लीगच्या फायनल पर्यंत पोहचली , गेल्यावर्षी लिव्हरपूल ला कोणती ट्रॉफी मिळवता आली नसली तरी एकंदरीत टीमच्या विशेषतः सलाह च्या परफॉर्मन्स वरती लिव्हरपूलची जनता जाम खूष झाली. लिव्हरपूलच्या आपल्या पहिल्याच सिजन मध्ये सलाहने पुन्हा एकदा क्लब ला आपल्या जुन्या उंचीवर नेवून ठेवलं.
यावर्षीच्या सिजन मध्ये सलाहने सिद्ध केलं कि आपण फक्त ‘ One season wonder ‘ नाही. २००५ नंतर यावर्षी लिव्हरपूल क्लब फ़ुटबॉल मधली सगळ्यात मोठी स्पर्धा चॅम्पियन्स लीग जिंकली. एकूण ५ गोल सलाहने चॅम्पियन्स लीग मध्ये केले यामध्ये फायनल मॅचच्या पहिल्या काही मिनिटातच केलेल्या गोलचा देखील समावेश आहे. यानंतर लिव्हरपूल चे फॅन्स मोहम्मद सलाह च्या आणखी प्रेमात पडणं साहजिकच होत.
मोहम्मद सलाहच्या खेळाचा प्रभाव जेवढा फुटबॉल ग्राउंड वरती पडत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त लिव्हरपूलच्या गल्ल्यांमध्ये पडत होता आणि हे जास्त महत्वाचं होत.
मध्य आशियातील संघर्षामुळे मुस्लिम निर्वासित युरोपमध्ये स्थलांतरित व्हायला सुरुवात झाली. युरोपातील अनेक देशात स्थानिक आणि निर्वासित असा संघर्ष सुरु झाला . या संघर्षाला राजकीय मुद्दा बनवण्यात आला आणि संपूर्ण युरोपमध्ये मुस्लिमांच्या विरुद्धचा द्वेष वाढायला लागला. इंग्लंड देखील याला अपवाद नव्हतं.त्यातच २०१७ मध्ये मँचेस्टर आणि लंडन मध्ये दहशतवादी हल्ले करण्यात आले, अनेक नागरिक यात मृत्युमुखी पडले. या हल्ल्यांमागे मुस्लिम दहशतवादी संघटना होत्या. यानंतर इंग्लंड मधील मुस्लिमद्वेष आणखीनच वाढला. सामान्य मुस्लिम नागरिकांवर सोशल मीडिया असो किंवा आपलं रोजच जगणं असो सर्वच ठिकाणी वांशिक हल्ले व्हायला लागले.
सगळ्या इंग्लंड मध्ये मुस्लिमांविरुद्धच वातावरण गढूळ होत असताना लिव्हरपूल परिसरात मात्र इतर ठिकाणांशी तुलना करता याचे प्रमाण अत्यंत कमी होते. चर्चा अशी होती कि , लिव्हरपूल मध्ये हे प्रमाण कमी असण्याचं कारण होत त्यांचा लाडका खेळाडू मोहम्मद सलाह जो मुस्लिम होता. सलहाने लिव्हरपूल फुटबॉल क्लब ला जे यश मिळवून दिल होत त्यामुळे तेथील स्थानिक लोकांचा एकूण मुस्लिम जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोणच बदलला होता आणि यालाच म्हणले जात होते,
‘ Mo Salah Effect ‘
आता हा Mo Salah Effect किती खरा , यामध्ये किती तथ्य आहे हे शोधून काढण्याचा निर्णय स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ने घेतला. या युनिव्हर्सिटीने एक सर्व्हे सुरु केला यामध्ये फेसबुक , ट्विटर याठिकाणी मुस्लिमांच्यावर होणारे शाब्दिक हल्ले यांचा अभ्यास केला. यासोबतच इंग्लंडमधील सुमारे २३ ठिकाणांचा सर्व्हे करून याठिकाणी मुस्लिमांच्यावर दर महिन्याला किती हल्ले होतात याची आकडेवारी गोळा करण्यात आली.
या सर्व्हेचे आलेले परिणाम अतिशय आश्यर्यकारक पण तितकेच सकारात्मक होते.
सलाह लिव्हरपूल कडून खेळायला लागल्यानंतरच्या तारखेपासून या १ जूनला लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग जिंकेपर्यंतच्या काळाचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं कि, संपूर्ण इंग्लंडमध्ये मुस्लिमांवरील हल्ले वाढत असताना लिव्हरपूल परिसरातील हल्ले मात्र तब्ब्ल १९ % कमी झाले होते. इंग्लंडमधील मोठ्या ५ फुटबॉल क्लब फॅन्स च्या एकूण १५ दशलक्ष ट्विट्स चा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले कि मुस्लिमांच्या विरुद्ध केले जाणारे ट्विट्स इतर क्लब च्या फॅन्स कडून वाढत होते , त्यांच्या एकूण ट्विट्स पैकी सुमारे २० % ते २५ % ट्विट्स मुस्लिमांच्या विरुद्धचे होते मात्र याचवेळी लिव्हरपूल फॅन्स कडून मुस्लिमांच्या विरुद्ध होणाऱ्या ट्विट्स च प्रमाण फक्त ३.४ % होत.
फेसबुक वर देखील ८००० लिव्हरपूल फॅन्स चा एक सर्व्हे घेण्यात आला. यामधील २३ % लोकांचं म्हणणं होत कि त्यांना आता मुस्लिम धर्म हा ब्रिटिश सभ्यतांशी मिळताजुळता आहे. आपल्या सभ्यतांबद्दल अतिशय कट्टर असणारे ब्रिटिश नागरिक आता मुस्लिमांना आपल्या सभ्यतांशी सुसंगत मानायला लागले होते. आणि यामागे एकच कारण होत ते म्हणजे मोहम्मद सलाह.
सर्व्हेनंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी चे प्राध्यापक या निष्कर्षापर्यंत पोहचले कि ,’ Mo Salah Effect ‘ खरा असून कमीत कमी लिव्हरपूल परिसरात तर याने मुस्लिमांबद्दलचा द्वेष कमी करण्यास मदत केली आहे. लिव्हरपूल च्या लोकांनी आता मोहम्मद सलाहला स्विकारलं आहे . त्याच मुस्लिम असणं , त्याने मशिदीत जाऊन प्रार्थना करणं , मॅच मध्ये गोल केल्यानंतर त्याने धार्मिक पद्धतीने त्याच सेलिब्रेशन करन हे सगळं आवडायला लागलं आहे . इतकंच कायतर ” तू जर अजून गोल केलेस तर आम्ही मुस्लिम व्हायला देखील तयार आहे ” असं आवाहन देखील ते सलाहला करत आहेत.
मोहम्मद सलाहमुळे निर्माण झालेल्या या वातावरणाचा संपूर्ण इंग्लंड मध्ये किती परिणाम पडेल ? सलाहाने क्लब सोडल्यानंतर देखील लिव्हरपूल मधील नागरिकांचा मुस्लिमांच्या बद्दलचा असलेला दृष्टिकोण असाच सकारात्मक राहिलं का ? या प्रश्नांची उत्तरे आताच देण अवघड असलं तरी सध्या भल्या भल्या राजकारणी आणि समाजसेवकांना जे जमलं नाही ते सध्या मोहम्मद सलाहने एकट्याने लिव्हरपूल मध्ये करून दाखवलं आहे.
फुटबॉल बद्दल पोप जॉन पॉल च एक वाक्य आहे . ते म्हणतात कि ,
” Amongst all unimportant subjects , football is the by far the most important .”
युरोपमध्ये असणार फुटबॉल च महत्व , फुटबॉल तेथील जनतेवर असणारा प्रभाव बघता तेथील अनेक मोठ्या सामाजिक प्रश्नांना छोटी का होईना उत्तरे फुटबॉल च्या ग्राउंड मधून मिळू शकतात , मिळायला सुरुवात देखील झाली आहे. अपेक्षा एवढीच आहे कि , युरोपमध्ये जे काम फुटबॉल ने केलं आहे तेच काम आपल्याकडे क्रिकेटने करावं.
- भिडू महेश जाधव
हे ही वाच भिडू.
- याच ९० मिनटात आधुनिक जर्मनचा जन्म झाला होता.
- जिंकलात तर देशप्रेमी, हरला तर देशद्रोही !!
- पाच वर्षाचे युद्ध संपवणारे ड्रोग्बाचे ते पाच गोल
- कधीकाळी पोलिसांवर दगडफेक केली होती, सध्या जम्मू-काश्मीरमधील फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखली जाते!!!