मोहन भागवतांनी अधिकृतरित्या गुजरात निवडणुकांच्या तयारीचा नारळ फोडला आहे….
मागच्या काही वर्षांपर्यंत गुजरातच्या निवडणुका म्हणजे भाजपसाठी सोपा पेपर मनाला जात होती. पण २०१७ च्या निवडणुकांमध्ये मात्र भाजपची ३ आकडी जागा मिळवताना चांगलीच दमछाक झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यामुळेच आगामी २०२२ मधील गुजरातची निवडणूक भाजप आणि पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगलीच मनावर घेणार यात शंका नव्हती.
याच गोष्टीचा प्रत्यय मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमधून आल्याचं आपल्याला दिसून येते.
गुजरातमध्ये २८ आणि २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक होणार होती. पण ती काही कारणास्तव रद्द झाली. याच दोन दिवसीय आगामी गुजरात निवडणुकांच्या तयारीचा अधिकृतरीत्या नारळ फुटणार असल्याचं बोललं जात होतं. पण हि बैठक रद्द झाल्यानंतर देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थांबला नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा नारळ फोडलाच.
२८ तारखेला अहमदाबादमध्ये पोहोचले आणि पुढच्याच दिवशी सुरतला निघून गेले. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी संघाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्यासोबतच पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या देखील त्यांनी भेटीगाठी घेतल्या.
काहीच तासात घडलेल्या या मुलाखतींमध्ये संघांच्या आगामी बैठका आणि मुद्द्यांवरती काही रूपरेषा देखील तयार झाल्या असल्याचं बोललं जात आहे. या पुढची बैठक १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं देखील सांगितले जात आहे.
आगामी बैठकांमध्ये कोणकोणत्या मुद्दांवर चर्चा होऊ शकते?
पुढच्या वर्षात राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती तयार करणे. मागच्या निवडणुकांमध्ये भाजपने १५० जागांचे लक्ष ठेवले होते. पण पक्षाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यावेळी काँग्रेसकडून भाजपला चांगलीच फाईट बघायला मिळाली होती. त्यामुळेच मागच्या वेळी प्रमाणेच यंदाच्या निवडणुकांमध्ये १५० जागा मिळवण्याचे भाजपचे लक्ष असणार आहे. याबाबत आगामी बैठकीत चर्चा होऊ शकते.
मागच्या वेळी झालेल्या विधानसभा निकालाचे विश्लेषण झाल्यानंतर असं लक्षात आले होते कि, गुजरातच्या ग्रामीण भागामध्ये भाजपच्या उमेदवारांना नाकारण्यात आलं आहे, तिकडे भाजपला कमी मत मिळाली आहेत. त्यामुळे यावेळी गावां-गावांमध्ये सरकारच्या योजना, काम यांचा प्रचार आणि प्रसार वाढवण्याबाबत रूपरेषा तयार करण्याच्या चर्चा आगामी बैठकीत होऊ शकतात.
यासोबतच संघाकडून देखील राज्य सरकारला ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्यासाठीचे संकेत देण्यात आले आहेत. या दिशेतून सरकारने देखील काम सुरु केलं आहे. गुजरातच्या ग्रामीण भागामध्ये कुपोषण हा एक मोठा मुद्दा मानला जातो. त्यावर उपाय म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गर्भवती महिलांना १५ पोषक लाडू देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.
आगामी काळात भाजपच्या संघटनात्मक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या जबाबदारीबाबत आढावा घेऊन काही बदल देखील केले जाऊ शकतात.
कोरोना काळात बेड आणि औषध यातील कमतरता आणि गुजरात सरकारने राज्यातील मृत्यूचे आकडे लपवल्याच्या बातम्या देशभरातील माध्यमांमधून दाखवल्या गेल्या होत्या. सोबतच प्रदेशाध्यक्ष शिवराज पाटील यांनी कोणत्याही लायसन्स शिवाय कोरोनावरील औषधे सार्वजनिक रित्या वाटण्याची घोषणा केली होती.
त्यामुळे त्यांच्यावर सामान्य लोकांकडे दुर्लक्ष केल्याचे, आणि आपल्याच लोकांची मदत केल्याची टीका झाली होती. या सगळ्यातून सरकारच्या प्रतिमेला एक मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आता पदाधिकारी आणि सरकारची हि प्रतिमा सुधारण्यासाठी चर्चा करून फीडबॅक दिला जाऊ शकतो.
या सगळ्या घडामोडींबाबत बोलताना संघाच्या राज्यपातळीवरील एका स्वयंसेवकाने माध्यमांशी बोलताना सांगितले कि,
बैठकीची तयारी पूर्ण झाली होती. यात देशपातळीवरील ४ ते ५ पदाधिकारी उपस्थित राहणार होते. यात अगदी सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबोले हे देखील उपस्थिती लावणार होते. पण देशपातळीवरील इतर काही नेत्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हि बैठक रद्द करण्यात आली.
मात्र हि बैठक रद्द करण्यामागे आणखी एक कारण होते. ते म्हणजे राज्य सरकारमधील मंत्री आणि कार्यकर्त्यांना आपल्या कामाची समीक्षा करण्यासाठी आणखी वेळ देणे. तसा वेळ देण्यात आल्याचं या स्वयंसेवकाने सांगितले आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे मोहन भागवतांनी अधिकृतरित्या गुजरात निवडणुकांच्या तयारीचा नारळ फोडला आहे.
हे हि वाच भिडू