सेनेसाठी झेललेला तलवारीचा घाव अभिमानाने मिरवणारा नेता म्हणजे मोहन रावले

‘आव्वाजsss कुणाचाsss… शिवसेनेचा’

आज ही असा नारा आसमंतात घुमला की कट्टर शिवसैनिकाच्या अंगात ऊर्जा संचारते, पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावन्द्य मानून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे शिवसैनिक हीच शिवसेना पक्षाची खरी ताकद.

पक्षासाठी ही ताकद उभी केली शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी.

७०च्या दशकात शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या काळात मुंबईच्या तरुणांमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे’ नावाचे एक वलय तयार झाले होते. त्यांच्या आक्रमक स्वभावाचे आणि भाषणांचे तरुणाईला भलतंच आकर्षण असायचे. यातूनच बाळासाहेबांनी अनेक तरुण कार्यकर्ते पक्षाशी जोडले.

अशाच एका भाषणातून शिवसेनेला एक कडवट शिवसैनिक मिळाला. इतका कट्टर की त्याने पक्षासाठी छातीवर झेलला तलवारीचा घाव देखील आयुष्यभर एखाद्या दागिण्यासारखा अभिमानाने मिरवला.

सुरुवातीला बाळासाहेबांचा अंगरक्षक ते नंतरच्या काळात ५ वेळचा लोकसभेचा खासदार असा त्या शिवसैनिकाचा प्रवास होता.

मोहन विष्णू रावले.  

गिरणी कामगाराचा मुलगा असलेल्या व गिरण्यांच्या परिसरात वाढलेल मोहन यांची ७० च्या दशकात महाविद्यालयात असताना ओळख बॉक्सर चॅम्पियन अशी होती. त्यांनी बॉक्सिंगचे अखिल भारतीय विद्यापीठ विजेतेपद मिळवले होते. सोबतच अनेकवेळा वेस्टर्न इंडिया चॅम्पियन ठरले होते.

बाळासाहेबांच्या भाषणाने प्रभावित झालेल्यांपैकी मोहन देखील एक होते. त्यांची धिप्पाड शरीरयष्टी, बॉक्सिंग चॅम्पियन आणि बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा यामुळे तरुणवयातच त्यांच्या अंगरक्षकाची महत्त्वाची जबाबदारी रावले यांच्यावर दिली.

अंगरक्षक म्हणून संधी मिळाल्यानंतर ते बाळासाहेब यांच्या अत्यंत विश्वासातील आणि निकटवर्ती बनले.

परळ भागातील मोहन अंगरक्षक म्हणून काम करत असताना महाविद्यालयीन शिक्षणही घेत होते महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेणाऱ्या रावलेंची ही हुशारी पाहून त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेना या संघटनेच्या उभारणीची जबाबदारी सोपवण्यात आली

१९७९ मध्ये त्यांना या संघटनेचे पहिले अध्यक्षपद देण्यात आले. याच संघटनेच्या माध्यमातून मोहन रावले यांनी आपले नेतृत्त्व प्रस्थापित केले.

शिवसेना स्टाईल आंदोलन त्यांच्या नसानसात होते. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये विरोधी विद्यार्थी संघटनांना अंगावर घेताना किंवा गिरणी परिसरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाज देताना रावले कधी मागे राहिले नाहीत.

महाविद्यालयातील एका अशाच एका बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले, हत्यारांचा वापर झाला. तलवारी निघाल्या आणि त्यातील एक वार रावले यांच्या छातीवर झाला. तो वार इतका मोठा होता की अगदी पोटापर्यंत गेला. पण पुढील अनेक वर्ष त्यांनी तो वार अभिमानाने मिरवला. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा घेतली ती रावलेंकडूनच. अख्खी विद्यार्थी सेना घडवून त्यांनी ती तयार अवस्थेत राज यांच्याकडे दिली. भारतीय विद्यार्थी सेनेचा चढता आलेख पाहून त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही संधी मिळाली आणि सोबतच बेस्ट समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

गिरणी कामगारांचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळमध्ये त्यांच्यासारख्या शिवसैनिकांनी रुजलेल्या शिवसेनेच्या ताकदीचा पुढच्या काळात रावले यांना फायदा झाला.

१९९१ मध्ये त्या वेळच्या दक्षिण- मध्य मुंबईतून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. रावलेंनी ती स्वतःच्या आणि पक्षाच्या ताकदीच्या जोरावर जिंकली देखील. ते खासदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर २००४ पर्यंत लोकसभेच्या जवळपास पाच निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुका मोहन रावले यांनी तत्कालीन दक्षिण- मध्य मुंबई या मतदारसंघातून एकहाती जिंकल्या. यात त्यांनी मजीद मेमन, सचिन अहिर यांच्यासारख्या दिग्ग्जचा त्यांनी पराभव केला.

लालबाग, परळ, शिवडी, वडाळा या परिसराचा तेव्हा या मतदारसंघात समावेश होता.

मात्र, मनसेच्या उदयानंतर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा बुरूज कोसळला आणि सहाव्यांदा खासदार होण्याचे रावले यांचे स्वप्न भंग पावले. ते २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मनसेच्या बाळा नांदगावकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन रावलेंच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लावला.

२०१३ मध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वावर टिका करत पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता पण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अवघ्या सहाच महिन्यांत ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पुन्हा पक्षात आले. पण त्यानंतर ते राजकारणापासून काहीसे लांबच राहिले. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले रावले जाहीर कार्यक्रमांमध्ये का नसतात असे प्रश्न अनेकदा विचारले जायचे पण आज सकाळी अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.