शिवसेनेच्या खासदाराचं पोट बिघडलं आणि नरसिंहरावांचं सरकार थोडक्यात वाचलं

एखाद्या शिवसैनिकाची खरी ओळख काय असेल तर तो पक्षादेश शिरसावन्द्य मनानं. आपल्या नेतृत्वाने वरून आदेश दिला की तो बरोबरच असणार हे गृहीत धरायचे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरायचे. यात तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते पक्षाच्या नेत्यांपर्यंत कोणीही अपवाद नसायचे.

आणि असे कट्टर शिवसैनिक घडवले ते स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणि तीच त्यांची खरी ताकद बनली होती. एखाद्या व्यक्तीला तिकीट देताना पण संबंधित व्यक्तीची जात-पात कोणती आहे ते बघण्याऐवजी बाळासाहेब त्या व्यक्तीची पक्षावरील निष्ठा किती आहे हे बघत.

बाळासाहेबांनी घडवलेल्या अशाच अनेक निष्ठावंत शिवसैनिकांपैकी एक होते,

दिवंगत माजी खा. मोहन रावले.  

त्यांची तर ओळख म्हणजे पक्षासाठी झेललेला तलवारीचा घाव देखील अभिमानाने मिरवणारा नेता अशी होती. बाळासाहेबांबद्दलची निष्ठा आणि शिवसेना स्टाईल आंदोलन या दोन गोष्टी त्यांच्या नसानसात होते. त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल कधी कोणी प्रश्नच उपस्थित करत नव्हते.

पण एकदा मात्र अशी वेळ आली होती कि केवळ महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेतली होती. सोबतच काँग्रेसला मदत करून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांचं सरकार थोडक्यात वाचलं होतं, असे हि आरोप झाले होते. त्यांनी या सगळ्या मागचे सांगितलेले कारण कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखे होते.  

गोष्ट आहे १९९३ सालची. केंद्रात पंतप्रधानपदी पी. व्ही. नरसिंहराव येऊन एव्हाना २ वर्षांचा कालावधी होउन गेला होता. देशात आर्थिक सुधारणांच्या अगदी सुरुवातीचाच कालखंड होता. नवनवीन कंपन्या आणि उद्योगधंदे भारतात येऊ पाहत होते. पण राव सरकार या सर्वाना पायघड्या घालत असल्याची टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप सुरु झाले होते.

त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अयोध्येवरून राजकारण तापलं होतं. भाजपने काढलेल्या रथयात्रेमुळे सरकारवर हिंदू-मुस्लिम समाजात धार्मिक तेढ निर्माण होणारं वातावरण तयार केल्याचे आरोप डावे आणि विरोधातील इतर पक्ष करत होते.

अखेरीस या आरोपांना संसदेसमोर मांडायचे असे ठरवून, जुलै १९९३ च्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार अजय मुखोपाध्याय यांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

त्यावेळी ५२८ सदस्य संख्या असलेल्या सदनात २६५ मतांची गरज होती. पण काँग्रेसकडे स्वतःचे आणि मित्र पक्षाचे मिळून २५१ सदस्यच होते. त्यामुळे त्यांच्या सरकारवर आलेला अविश्वासाचा ठराव फेटाळून लावता यावा, यासाठी काँग्रेस पक्षाला तेव्हा विरोधी पक्षातील काही खासदार फोडून त्यांची मते मिळवणे आवश्यक होते. किंवा कमीत कमी १४ खासदारांनी अनुपस्थित राहणं गरजेचं होतं.

थोडक्यात नरसिंहरावांना पुढे सरकार चालवण्यासाठी कमीत कमी १४ मतांची आवश्यकता होती.

त्यावेळी सदनात सेनेचे ४ खासदार निवडून आले होते, पैकी एक रावले होते. युती असल्याने सरकार विरोधात मतदान करण्याचे आदेश होते.

जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तेव्हा मात्र शिवसेनेचे रावले, झारखंड मुक्ती मोर्चाचे ६ खासदार गैरहजर होते. तर काहींनी सरकारच्या बाजुंनी मतदान केले आणि त्यांच्याच जोरावर नरसिंहरावांनी आपलं सरकार वाचवलं होतं.  

यानंतर मात्र सगळीकडे चर्चा झाली ती रावले यांची. माध्यम आणि पक्षांकडून विचारणा सुरु झाल्यानंतर आपण काल दहीवडा खाल्ला होता, आणि तो बाधला, त्यामुळे पोट बिघडलं होतं. असे स्पष्ट करून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळेच अविश्वास ठरावावरील मतदानास गैरहजर राहिल्याचे सांगितले होते. 

त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यांनी कॉंग्रेसला मदत केली असा आरोपही झाला. नरसिंहरावांना एक-एक मताची गरज होती. अशावेळी रावले नेमके त्याचदिवशी गैरहजर राहिले होते. सोबतच झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांवर देखील पैसे घेऊन अनुपस्थित राहिल्याचा आरोप झाला.

दुसरीकडे दहीवड्याची ती रेसिपी शरद पवार यांचीच होती, अशी चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात रंगली होती आणि पवार वा रावले यांनी त्याचा इन्कारही केला नव्हता.

या सगळ्या घडामोडीनंतर बाळासाहेबांनी रावले यांना धारेवर धरले. मातोश्रीवर बोलावून रावलेंची कानउघाडणी झाली. ज्या व्यक्तीच्या कट्टरतेचे दाखले बाळासाहेब स्वतः द्यायचे तोच व्यक्ती असा कसा वागला याचे सर्वांनाच आश्‍चर्य वाटले.

आता यानंतर खरा प्रश्न होता बाळासाहेबांची नाराजी कशी दूर करायची हा.

मात्र मोहन रावले यांच्यावर मीनाताईंनी मुलासारखी माया केली, त्याच रावले यांच्या मदतीला धावल्या. बाळासाहेबांची त्यांनी समजूत काढली. त्यामुळे झाले गेले विसरून बाळासाहेबांनी कोणतीही कारवाई न करता रावलेंवर पूर्वीचाच विश्वास व्यक्त केला.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.