तो साऊथचा एकमेव सुपरस्टार आहे ज्याच्या सिनेमाची वाट बॉलिवूड निर्मातेदेखील बघत असतात..

आपल्या महाराष्ट्रात साऊथ इंडियन हिरोंची जी क्रेझ वाढत चाललीय तिला काय तोड नाही. साउथचे पिच्चर म्हणजे आपल्यासाठी संजीवनी झाल्यात जमा आहे , म्हणजे मारधाड वाले पिच्चर, लव्ह स्टोरी, हॉरर अशा सगळ्या जॉनरचे पिच्चर साऊथ वाले बनवतात आणि भारतभरातून प्रेम आणि पैसे दोन्ही मिळवतात. नागराज मंजुळेने बनवलेल्या फॅन्ड्रीतला जब्या जसा आपला वाटतो तसंच सेम साऊथ वाले हिरो सुद्धा आपल्याइकडं भरपूर लोकप्रिय आहे.

मध्यंतरी दृश्यम २ नावाचा चित्रपट साऊथमध्ये रिलीज झाला आणि पिच्चर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालला. सस्पेन्स असलेला हा चित्रपट आणि त्यात मुख्य भूमिकेत होता मोहनलाल. आता यातली मोहनलालची अभिनयातली बॅटिंग बघून लोकं अजय देवगणला ट्रोल करायला लागली होती, साऊथचाच दृश्यमचा हिंदीतला रिमेक अजय देवगणने केला होता.

मोहनलाल हा काय साधासुधा गडी नाही, सगळं बॉलिवूड त्याच्या चित्रपटाची वाट बघत जेणेकरून त्याच्यावर रिमेक करता येईल. फक्त साऊथमध्ये नाही तर भारतभरात मोहनलालचे फॅन्स म्हणण्याऐवजी भक्त आहेत.

२१ मे १९६० साली केरळमध्ये मोहनलालचा जन्म झाला. मोहनलाल हा मूळचा मल्याळम सिनेमातला आघाडीचा नट. रजनीकांत तर मोहनलाल बद्दल म्हणतो कि संपूर्ण भारतात मोहनलाल सारखा नॅचरल ऍक्टर दुसरा नाही. आपल्या नॅचरल अभिनयाच्या जोरावर चित्रपट कायम चालतात हि मोहनलालची जमेची बाजू.

मोहनलालची मल्याळम सिनेमात इतकी क्रेझ होती कि दर १५ दिवसाला त्याचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा. हे रिलीज झालेले चित्रपट हिट सुद्धा व्हायचे. पण मोहनलालच्या या १५ दिवसाला पिच्चर रिलीज करण्याच्या थेरीने नवीन हिरो लोकांना बेक्कार अडचणी येऊ लागल्या होत्या. कन्टेन्ट असणारा चित्रपट आणि नैसर्गिक अभिनय यांच्या जोरावर मोहनलाल कायम टॉपला आहे.

एका वर्षात सगळ्यात जास्त चित्रपट रिलीज करण्याचा विक्रम हा मोहनलालच्या नावावर आहे. हेच नाही तर एका वर्षात सगळ्यात जास्त हिट सिनेमे देण्याचा विक्रम सुद्धा मोहनलालच्याच नावावर आहे. १९८६ साली मोहनलालच्या एका वर्षात एकूण ३६ फिल्म्स आल्या होत्या पैकी २५ हिट झाल्या होत्या.

मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं स्टारडम असलेला एकमेव नट म्हणजे मोहनलाल. मागील ४० वर्षांपासून मल्याळम सिनेमावर राज्य मोहनलालच आहे, ३०० हुन अधिक चित्रपट त्याने केले आहेत. नरसिम्हम, मणिचित्रा थाजू , दृश्यम, वानप्रस्थम, पुली मुर्गन, जनता गॅरेज आणि नुकताच आलेला दृश्यम २ या जबरदस्त हिट चित्रपटांमुळे मोहनलाल घराघरात पोहचला.

मोहनलालच्या या वाढत्या लोकप्रियतेला आळा घालणारा एकच हिरो त्यावेळी होता ते म्हणजे मामुटी. मामुटी आणि मोहनलाल हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. संघर्षाच्या काळात मामुटी आणि मोहनलाल यांनी सोबत अनेक चित्रपटात छोट्यामोठ्या भूमिका एकत्र साकारल्या होत्या. पुढे या दोघांनी मिळून ५५ हुन अधिक चित्रपटात एकत्र काम केले.

मोहनलालची अभिनयाची सुरवात १९७८ साली थिरानोत्तम या मल्याळम चित्रपटातून झाली होती मात्र हा चित्रपट सेन्सॉरशिपमुळे तब्बल २५ वर्षांनी रिलीज झाला होता. अनेक चित्रपटांमधून मोहनलाल अभिनय करत आहे. कुठेही त्याची कॉंट्रोव्हर्सीची ओरड पाहायला मिळत नाही.

अनेक पुरस्कार आणि अवॉर्ड मोहनलालला मिळाले आहेत. ५ वेळा नॅशनल अवॉर्डने मोहनलालला गौरविण्यात आले आहे. चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे मोहनलालला भारत सरकारकडून २००१ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि २०१९ साली पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोहनलाल हे पहिले  ज्यांना इंडियन मिलिटरी तर्फे लेफ्टनंट कर्नल हि पदवी देण्यात आली आहे. याबरोबरच त्वायक्वांदो हेडक्वार्टर कडून ब्लॅक बेल्ट सुद्धा मिळाला आहे. रजनीकांत, कमल हसन या दोघाआधी आयफा अवार्ड मिळवणारा मोहनलाल हा साऊथचा पहिलाच अभिनेता आहे.

महानायक अमिताभ बच्चन स्वतःला मोहनलालचा फॅन असल्याचं सांगतात तर विजय सेतुपती हे मोहनलालला अभिनय क्षेत्रातला आदर्श मानतात. सलमान आपल्या बॉडीसाठी, शाहरुख रोमान्ससाठी , आमिर खान कन्टेन्टफुल चित्रपटांसाठी आणि गोविंदा कॉमेडीसाठी ओळखले जातात पण मोहनलाल या सगळ्यांचं मिश्रण असल्याचं सांगतात , विविधता असलेले आणि नवीन जॉनर मोहनलाल हाताळताना दिसतात.

भुलभुलैय्या, चंद्रमुखी, दृश्यम, गरम मसाला अशा अनेक मोहनलालच्या  चित्रपटांचे रिमेक बॉलीवूडने बनवले आहेत. निर्माते सुद्धा फक्त मोहनलाल चित्रपटात आहे या विश्वासावर पैसे लावतात. तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये मोहनलालने काम केले आहे.

स्टारडमचा जराही गर्व ना बाळगता साधेपणाने राहणारा नट म्हणजे मोहनलाल.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.