चेहऱ्यावर बॉल लागला, सहा टाके पडले. पण परत येऊन त्याच बॉलरला पहिल्या बॉलला सिक्स हाणला !

तस बघायला गेलो तर ह्या गोष्टीला छत्तीस वर्ष झालेत. पण १९८३ म्हणल की आपल्याला फक्त आणि फक्त भारतानं जिंकलेला वर्ल्ड कप आठवतो. तो कप उचलणारा कपिल देव आठवतो.

पण याच टीममधे अजुन एक वाघ होता तो म्हणजे मोहिंदर अमरनाथ.

१९८३ ला भारतीय टीम वेस्ट इंडीज दौर्यावर आली होती. वर्ल्ड कपची तयारी म्हणूनच भारत या दौऱ्याकडे बघत होता. वेस्ट इंडीज दौरा म्हणजे त्याकाळात सुसाईड म्हणून ओळखल जायचं. त्यांची तुफान वेगाने बॉलिंग करणारी होल्डिंग, मार्शल, रोबर्टस आणि गार्नर ही चौकडी तेव्हा त्यांच्या शिखरावर होती.

पाटा विकेटवर खेळण्याची सवय असणारे भारतीय बॅटसमन त्यांच्या समोर कितपत टिकतील हा प्रश्न होता.

मोहिंदर अमरनाथ तेव्हा टीममधे चौथ्यांदा कम-बॅक करत होता. खराब फॉर्म मूळ तो त्याच्या पूर्ण करिअर मधे नेहमी तळ्यात मळ्यात करत राहिल्यामुळे त्याची बेभरवशाचा ऑल राउंडर अशी बनली होती.

टीम वेस्ट इंडीजच्या दौऱ्यासाठी मोहिंदर ने आपले वडील लाला अमरनाथ यांच्याकडून बाउन्सर खेळण्याचे खास ट्रेनिंग घेतले होते. तो जेव्हा टीम मधे परत आला तेव्हा त्याचा क्रिजमधला स्टान्स बदलला होता. त्या स्टांस ला इंग्रजीत ‘ टू आईड ‘ म्हणतात.

ह्या स्टांस मुळे बाऊंसर खेळणं सोपं होत अस म्हणायचे.

आणि ते खरं ठरल. जेव्हा गावस्करसकट बाकीचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात आउट होऊन परतत होते तेव्हा अमरनाथ एकटाच  किल्ला लढवत राहिला. पहिल्या कसोटीत त्याने उपयुक्त ४० धावा काढल्या. दुसऱ्या मॅच मधे तर तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता.

पहिल्या इनिंग मधे अर्धशतक तर दुसऱ्या इनिंग मधे शतक करून भावाने प्रचंड हवा केली होती. त्याच्यामुळेच भारताला टेस्ट अनिर्णीत राखण्यात यश आलं होतं.

वेस्ट इंडियन फास्ट अटॅकच्या शेपटावर त्याने पाय दिला होता. त्यांनी अमरनाथची खेळी आपल्या इगोवर घेतली होती. त्यांच्या साठी आता मुख्य टार्गेट गावस्कर नाही तर अमरनाथ असणार होता.

तिसरी टेस्ट पावसामुळे वाया गेली. चौथ्या मॅचच्या पहिल्या इनिंग मधे मोहिंदरन जबरदस्त ९१ रन ठोकले. 

बाकी टीममध्ये एकही प्लेअर ३० च्या वर रन्स बनवू शकला नव्हता. विंडीजचे बॉलर्स धडाधड विकेट घेत होते. पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी २७७ रन्सची आघाडी घेतली. आता भारत हरणार हे जवळपास नक्की झाले होते.

भारताची दुसरी इनिंगसुरु झाली. गावसकर १९ धावा करून स्वस्तात आउट झाला. अमरनाथला वरच्या नंबरला बॅटिंगला पाठवण्यात आलं. तो मैदानात उतरल्यापासून  विंडीजचे बॉलर्स त्याला फक्त बाऊन्सर मारत होते. मैदानातील वातावरण तापलं होतं.

असाच एक मायकल होल्डींगचा आग ओकणारा बाऊन्सर अमरनाथच्या जबड्यावर आदळला.

मॅटर झाला. सेकंदात त्याचा शर्ट रक्तान भरला. त्याला मैदानातून बाहेर आणण्यात आलं. टीमच्या डॉक्टरनी त्याच्या चेहऱ्याला तब्बल सहा टाके घातले होते.

मॅच अजून सुरु होती. अमरनाथ बाहेर गेल्यावर भारताची आणखी एक विकेट पडली. तेव्हा अमरनाथ उठून बॅटिंग साठी निघाला. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कपिलने त्याला विचारले,

जिम्मी तुला खूप लागलंय. बॅटिंग शक्य आहे का?

मोहिंदरने मान हलवून होकार सांगितला आणि क्रिजकडे निघाला. पण गडबडीत त्याने पोटाच गार्ड लावायच विसरला. पण आता खरी परीक्षा होती. विंडीजचे बॉलर दयामाया दाखवणारे नव्हते. पुढचा बॉल सुद्धा बाउन्सरच असणार हे नक्की होतं.

आणि घडलही तसचं.

धावत आलेल्या होल्डिंगने पहिलाच बॉल बाऊन्सर टाकला. अमरनाथ तयारीतच होता. त्याने त्या बॉलला उंच उडवलं. बॉल सीमापार गेला. अख्खं स्टेडियम उभं राहून टाळ्या वाजवू लागलं. वेस्ट इंडीजचे प्रेक्षक सुद्धा यात सामील होते.

मॅॅच पाहिलेला प्रत्येकजण म्हणतो की तो सिक्स होता. पण आयसीसीने केलेल्या नोंदी मध्ये ती बाउन्ड्री होती अस दाखवलं आहे.  अमरनाथची ही जिगरबाज इनिंग ८० रन करून थांबली.

पण ही मॅच विंडीजने जिंकली.

ह्या टूर मधे अमरनाथने २ सेंच्युरी आणि ४ हाफ सेंच्युरी झळकावत एकूण ५९४ रन काढले होते. तीन पैकी दोन टेस्ट मॅच ड्रॉ झाले होते आणि एक विंडीजने जिंकली होती. पण या दौऱ्यात अमरनाथने आपल्या भीतीवर विजय मिळवला होता.

याच टूरचा अनुभव अमरनाथला इंग्लंडमधेय झालेला वर्ल्ड कप गाजवण्यासाठी उपयोगी ठरला. फायनल मॅॅचमध्ये त्याचीच कामगिरी विश्वविजेत्या विंडीजला धूळ चारण्यात उपयोगी ठरली आणि वर्ल्ड कप जिंकू शकलो. मोहिंदर अमरनाथ त्या सामन्याचा देखील मॅन ऑफ द मॅच ठरला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.