अन् अशाप्रकारे महाराष्ट्रात हे 3 अमराठी नेते सेटल होत गेले…

महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या भाजपच्या ३ नेत्यांची खूप हवा आहे…

एक खासदार नवनीत राणा. दुसरे खासदार किरीट सोमय्या आणि तिसरे भाजपचे कट्टर समर्थक मोहित कंबोज. पण या तीनही नेत्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे हे नेते अमराठी आहेत. 

अमराठी असूनही हे नेते खूप कमी काळात महाराष्ट्रात सेट झाले..पण कसे ?  त्यांचं भाजपमध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इतकं महत्व कसं वाढत गेलं ?

 त्यातलं पहिलं नाव म्हणजे नवनीत राणा –

नवनीत राणा यांचं नाव नवनीत कौर. त्यांचे वडिल सैन्यात मोठ्ठे अधिकारी होते. त्यांच कुटूंब मूळचं पंजाबचं असलं तरी मुंबईतच रहायला होतं. त्यामुळे नवनीत कौर यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं. त्या मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या. 

पुढे फिल्म लाईनमध्ये करियर करायचं होतं, त्यांनी साऊथ गाठलं. त्यानंतर कन्नड, तमिळ,तेलगु सिनेमात त्यांना ओळख मिळू लागली. थोडक्यात साऊथ इंडस्ट्रीमधल्या पहिल्या फळीतल्या अभिनेत्रींच्या यादीत त्या पोहचल्या होत्या. 

त्या रामदेवबाबांच्या शिष्या होत्या. त्यांच्या योग शिबिरात त्यांची ओळख आमदार रवी राणा यांच्याशी झाली. दोघात मैत्री झाली. रवी राणा यांनी नवनीत कौर याना लग्नाची मागणी घातली. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

२०११ अमरावती येथे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी लग्न केले. आणि अशा प्रकारे त्या अमरावतीच्या सून झाल्या. 

२०१४ मध्ये त्या नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरूवात केली…..

मुंबईतच लहानच्या मोठ्या झाल्या त्यामुळे त्यांना मराठी उत्तम येत होतं. अन हळूहळू त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांचे पती म्हणजेच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा नवनीत राणा यांना फायदाच झाला. 

रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचं  प्रमाणपत्र मिळवलं. त्या आधारावर त्यांनी २०१४ ची आणि २०१९ ची निवडणूक लढवली होती. 

ण आनंदराव अडसूळ यांनी या प्रमाणपत्राविरोधात तक्रार केल्यानंतर मुंबई हाय कोर्टाने त्यांचं जातप्रमाणपत्र रद्द केलं आहे.

२०१४ साली त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली. 

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याकडून नवनीत राणा यांचा पराभव झाला. पण २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवत त्यांनी आनंदाराव अडसूळ यांचा पराभव केला आणि खासदार बनल्या. अमरावतीतून खासदार होणा-या त्या पहिल्या महिला होत्या. मोदी लाटेत देखील शिवसेना नेत्याचा पराभव करण्याची किमया त्यांनी केली. 

पण लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला. 

काही झाले तरी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणारच अशी ठाम भूमिका घेतलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाली आणि आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

२) दुसरं नाव म्हणजे किरीट सोमय्या 

सातत्यानं नव-नवीन घोटाळे बाहेर काढणं आणि ते माध्यमांधून लावून धरणं यासाठी किरीट सोमय्या हे राज्यभरात ओळखले जातात. अलीकडे त्यांच्या गादीवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातलं राजकारण पेटलं होतं. 

तसं किरीट सोमय्या यांच्या राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनांमधून. 

१९८० च्या काळात सोमय्या हे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीनं प्रभावित होते. याशिवाय ते ९० च्या दशकात मुंबईत गुजरातीबहुल भागांमध्ये गरब्यांचे कार्यक्रम आयोजित करायचे,ते कार्यक्रम प्रचंड गाजायचे. याच कार्यक्रमांमधून सोमय्या लोकांमध्ये ओळखले जावू लागले. 

अशाच एका गरबा कार्यक्रमात लालकृष्ण आडवाणी आले आणि त्यांनी नृत्य देखील केलं. ही त्यावेळी मुंबईत सर्वात जास्त चर्चा झालेली बातमी होती. 

या दिवसापासून सोमय्या अख्ख्या मुंबईत फेमस झाले आणि महाराष्ट्र भाजपमधील महत्वाचे नेते बनत गेले. 

यानंतर सोमय्या यांनी मुंबईतले छोटे-छोटे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरायला सुरुवात केली, यातून ते थेट अधिकाऱ्यांशी जाऊन भिडायचे.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मुलुंडमधून दिग्गज नेते वामनराव परब यांचं तिकीट कापून सोमय्यांना दिलं. सोमय्या जिंकून आले अन पहिल्यांदा आमदार झाले. आमदार असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेतले. 

पुढे १९९९ साली सोमय्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून गुरुदास कामत यांना पराभूत करून खासदार झाले. त्यानंतर २०१४ ला ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. 

२०१९ च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. 

त्यावेळी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे त्यांचं तिकीट कापलं अशी चर्चा होती. पण त्यानंतर देखील त्यांनी घोटाळा बाहेर काढणारा नेता अशी ओळख कायम ठेवली ते आजतागायत…

३) तिसरे म्हणजे मोहित कंबोज –

आर्यन खान ड्रग्स प्रकरण असो वा आत्ताचा भोंगा अन हनुमान चालीसाचा वाद असो यात मोहित कंबोज हे नाव कायमच समोर होतं आणि आहे. त्यात अलीकडे मातोश्रीच्या परिसरात त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे ते चर्चेत आलेले.

मोहित कंबोज हे मूळचे उत्तर प्रदेशचे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीमधला. तिथेच त्यांचं शालेय  झालं आणि पुढं त्यांनी मुंबईत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं.  मोहित यांच्या आजोबांचा आणि वडिलांचा उत्तर प्रदेशमध्ये हिरे आणि सोन्याचा व्यवसाय आहे. 

पण मुंबईत शिकलेले मोहित यांना मुंबईतचं सेटल व्हायचं होतं. 

२००२ मध्ये ते बनारसहून मुंबईत आले आणि वयाच्या २१ व्या वर्षी KBJ ग्रुप नावाने सराफा व्यवसाय सुरु केला. रिअल इस्टेट, ज्वेलरी, इंटरटेन्मेन्ट इत्यादी क्षेत्रातही लवकरच त्यांचं मोठं नाव झालं.

बॉम्बे बुलियन असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली.  त्यानंतर त्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले.  बॉम्बे बुलियन असोसिएशन ही सोने आणि दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संघटना आहे. २०१३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा युनिटचा अध्यक्ष बनवलं. २०१४ मध्ये त्यांना मुंबई भाजपचे उपाध्यक्षही करण्यात आले.

…….आणि अशाप्रकारे ते महाराष्ट्रात पॉलिटिकली सेटल होत गेले.  

२०१४ साली त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी भाजपच्या तिकिटावर मुंबईतील दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मोहित कंबोज हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. पण त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. इथून शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू विजयी झाले होते.  

२०१६ मध्ये मोहित कंबोज यांना भारतीय युवा मोर्चाचं मुंबईचं अध्यक्ष तर २०१९ मध्ये त्यांना भाजप मुंबईचं सरचिटणीस करण्यात आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी स्वतःचं आडनाव बदललं. 

त्यांनी मोहित कंबोज नाव बदलून मोहित भारतीय असं नाव केलं..  

वरिष्ठ नेत्यांच्या गुड बुक्स मध्ये नाव कोरणारे फार थोडे नेते आहेत. त्यातले एक म्हणजे मोहित कंबोज.

 ते देवेंद्र फडणवीसांच्या गुड बुक्स मध्ये असल्याचं म्हणलं जातं. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या प्रचाराची आखणी करण्यात कंबोज सगळ्यात पुढं होते. त्यांनी फडणवीस जर या निवडणुकीत हरले तर मी राजकारण सोडून देईल असं जाहीर केलेलं.

त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री बनू शकले नाहीत मग कंबोज यांनी २०२० मध्ये भाजपच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेत आले. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांना डायरेक्ट शिंगावर घेणारे भाजपचे तरुण नेते म्हणून त्यांचं नाव आहे. 

तर हे ३ नावं जे अमराठी आहेत…मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकरणात नाव कमावलं आणि आज महाराष्ट्राचं राजकारण हलवून सोडणारे म्हणून नेते म्हणून या तिन्ही नेत्यांना ओळखले जातात.

 हे हि वाच भिडू :

 

  

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.