ह्या ५ कारणांमुळे मोहित कंबोज आज मुंबई-भाजपमधला सगळ्यात मोठा चेहरा बनले

एक अमराठी नेता मुंबईत येतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु बनतो. मी बोलतेय ते भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबद्दल. 

१७ ऑगस्ट रोजी मोहित कंबोज यांनी ट्विट केलं कि “लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेल मध्ये जाणार”.. त्यांच्या या ट्विटनंतर पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेची दिशाच पार बदलून गेली. 

त्यात आशिष शेलार म्हणालेत की, मोहित कंबोज यांचा स्ट्राइकिंग रेट 100% आहे. म्हणजेच मोहित कंबोज जे बोलतात ते खरंच होतं.

पण एवढया आत्मविश्वासाने ते विधानं करतात आणि भाजपचे इतर नेते त्यांना तितक्याच तत्परतेने प्रतिसाद देतात त्यामुळे मोहित कंबोज यांचं भाजपमध्ये इतकं महत्व कसं काय ? 

त्याचबाबतची अशी ५ कारणं ज्यामुळे मोहित कंबोज आज मुंबई-भाजपमधला सगळ्यात मोठा चेहरा बनलेत..

१) मोहित कंबोज यांचं उत्तर भारतीय असणं.

मोहित कंबोज हे मूळचे उत्तर प्रदेशचे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीमधला. तिथेच त्यांचं शालेय शिक्षण झालं पण २००२ मध्ये ते युपीमधून मुंबईत आले आणि वयाच्या २१ व्या वर्षी KBJ ग्रुप नावाने सराफा व्यवसाय सुरु केला. 

हळूहळू नाव होत गेलं. २०१३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपने त्यांना मुंबई भाजपचं सचिव बनवलं, ते मुंबई भाजपचे उपाध्यक्षही राहिलेत.  मुबईत असणाऱ्या उत्तर भारतीयांमध्ये स्ट्रॉंग नेटवर्क तयार झालं. म्हणूनच भाजपने त्यांना उत्तर भारतीय मोर्चा युनिटचं  अध्यक्ष बनवलं होतं. कारण मुंबईत उत्तर भारतीय मतदार किती महत्वाचा हे सर्वच राजकीय पक्ष जाणून आहेत. 

इंडियन एक्सप्रेसच्या आकडेवारीनुसार, मुंबईत २७% पेक्षा जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात १ कोटी ५० लाख मतदान उत्तर भारतीयांचं आहे.  

मुंबईतील एकूण २२७ प्रभागांपैकी १८४ मध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या ५३% पर्यंत आहे. हा झाला मतदारांचा टक्का. निवडून आलेल्यांची सांख्य पाहायची झाली तर, २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातले जवळपास १४ उत्तर भारतीय नगरसेवक  आहेत.

हे आकडे लक्षात घेता तुम्हाला कळलं असेलच कि पक्ष कोणताही असला तरीही उत्तर भारतीयांना टाळून मुंबई महापालिकेत सत्ता मिळणं अवघड आहे त्यामुळेच मोहित कंबोज यांचं उत्तर भारतीय असणं भाजपसाठी महत्वाचं आहे.

२) उत्तर भारतीय असण्यासोबतच मोहित कंबोज यांचं व्यापारी असणं महत्वाचं आहे.

मोहित कंबोज यांना व्यापारी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांच्या आजोबांचा आणि वडिलांचा उत्तर प्रदेशमध्ये हिरे आणि सोन्याचा व्यवसाय आहे. पण मोहित यांना मुंबईतच सेटल व्हायचं होतं म्हणून ते मुंबईत आले. 

त्यांनी मुंबईत अगदी कमी काळात KBJ ग्रुप मोठा केलाय. सराफासोबतच रिअल इस्टेट, ज्वेलरी, इंटरटेन्मेन्ट, क्रिकेट लीग, इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांचं मोठं नाव झालं. 

मुंबईतल्या व्यापारी वर्गावर त्यांचं वर्चस्व आहे. मुंबईमध्ये ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन’ ही सोने आणि दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची एक मोठी संघटना आहे. ही संघटना १९४८ मध्ये सोन्याच्या व्यापाऱ्यांनी स्थापन केली होती. 

मुंबईतील जेवढे गडगंज श्रीमंत आणि नावाजलेले सोने-चांदीचे व्यापारी या संघटनेचे सदस्य आहेत. आणि याच संघटनेचे मोहित कंबोज हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत..म्हणजेच मुंबईतलय व्यापारी वर्गावर मोहित यांचं वर्चस्व आहे. 

३) मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीसांच्या गुड बुक्स मध्ये आहेत.

विरोधक कायमच अशी टीका करतात कि मोहित कंबोज हे फडणवीसांचे फ्रंट मॅन आहेत.  वरिष्ठ नेत्यांच्या गुड बुक्स मध्ये नाव कोरणारे फार थोडे नेते आहेत. त्यातले एक म्हणजे मोहित कंबोज.

सद्या त्यांच्याकडे भाजपचं कोणतंच पद नाहीये कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराची आखणी करण्यात मोहित कंबोज सगळ्यात पुढं होते.  तेंव्हा त्यांनी असं जाहीर केलेलं की, फडणवीस जर या निवडणुकीत हरले तर मी राजकारण सोडून देईल. 

त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री बनू शकले नाहीत मग कंबोज यांनी २०२० मध्ये भाजपच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. फडणवीसांच्या गुड बुक्स मध्ये असल्यामुळे येत्या काळात त्यांना पक्षात मोठं पद मिळेल असं बोललं जातंय.  

४) मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीच्या काळात लावून धरलेले मुद्दे

२०२० मध्ये मोहित यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून ऍक्टिव्ह झालेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना विरोधी पक्ष म्हणून ते वेळोवेळी समोर आलेत. कंबोज यांनी शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला.  मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेवर आरोप करत ठाकरे सरकारला देखील लक्ष्य केलं होतं.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या वेळेस त्यांनी एकामागोमाग एक पत्रकार परिषदा घेऊन नवाब मलिकांवर आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका करत ते प्रकरण माध्यमांमध्ये सातत्याने चर्चेत आणलेलं. 

मलिक लवकरच जेलमध्ये जाणार, असा दावा कंबोज यांनी केला होता. त्यानंतर काहीच दिवसांत मलिकांना तुरुंगात जावं लागलं. यानंतर मशिदीवरचे भोंगे अन हनुमान चालीसाच्या वादात देखील मोहित कंबोज आघाडीवर होते. त्यात अलीकडे मातोश्रीच्या परिसरात त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरणही त्यांनी चांगलंच लावून धरलं होतं.

५. मुंबईत पर्याय म्हणून मोहित कंबोज महत्वाचे ठरतात.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना डायरेक्ट शिंगावर घेणारे भाजपचे तरुण नेते म्हणून त्यांचं नाव आहे. मुंबईत भाजपचे जे नेते त्यात कृपाशंकर सिंग, मंगलप्रभात लोढा,आशिष शेलार, किरीट सोमय्या, मोहित कंबोज अशी नावं आहेत. यापैकी मंगलप्रभात लोढा यांनी याआधी मुंबईच अध्यक्षपद सांभाळलं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

आशिष शेलार यांना तर पक्षाने मुंबईचं अध्यक्षपद देऊ केलं. उरलेल्या पर्यायांपैकी किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांचं बोलायचं तर, अमराठी असणं हे किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यातला समान दुवा असला तरी किरीट सोमय्या यांच्या निमित्ताने भाजपकडे गुजराती व्होट बँक आहे तर कंबोज यांच्याकडून उत्तर भारतीयांची व्होट बँक आहे. 

यांच्यात तुलना करायची झालीच तर, 

किरीट सोमय्या भाजप विरोधी बाकावर होता तेंव्हा त्यांनी सत्ताधारी पक्षातील एकेक नेता पकडून त्यांच्यावर भल्यामोठ्या आरोपांची राळ उठवत असायचे. पण भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होतेय. 

तेच कंबोज यांच्याबद्दल बोलायचं तर, मोहित कंबोज यांची मुंबईतल्या मोठं-मोठ्या व्यापारी वर्गात उठबस असणं आणि मुंबईतला उत्तर भारतीयांचा मतदानाचा टक्का लक्षात घेता मोहित कंबोज यांनी स्वतःचं वजन निर्माण केलं. इतर नेत्यांच्या मानाने कंबोज राज्यात फडणवीसांच्या मर्जीतले आहेत तर   दिल्ली वर्तुळात अमित शाह यांच्या मर्जीतले आहेत असं म्हणतात. 

याच कारणांमुळे मोहित कंबोज भाजपमध्ये महत्वाचे ठरतात.

हे ही भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.