निजामाला गंडवून जौहरीने खजिना साठवला पण बँकेने त्यालाच गंडा घातला.
हैद्राबादचा निझाम जगातला त्याकाळी सर्वात श्रीमंत माणूस होता हे आपण बऱ्याचदा ऐकलंय. युरोप अमेरिकेतल्या मोठमोठ्या उद्योजकांपेक्षाही जास्त संपत्ती त्याच्या कडे होती. लाखो करोडोचे सोने नाणी हिरे जवाहिरे त्याच्याजवळ होते.
पण निझामाचा फोटो बघून तस वाटत नाही. कारण म्हातारं प्रचंड चेंगट होतं.
पैशांच्या बाबतीत भयंकर अरसिक असलेला हा माणूस. कपडे सुद्धा अगदी साधे घालायचा. हैद्राबादच्या भल्यामोठ्या राजवाड्यात तो कधी राहिलाच नाही. राहायचा एका छोट्याशा कोठीत. तो म्हणे जगातला सर्वात मोठा हिरा पेपर वेट म्हणून वापरायचा.
अशा या निझामाला अनेकांनी धुतला. पै- पाव्हणे, दरबारी सगळ्यांनी निझामाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. यात त्याचा ज्वेलर कसा मागे राहिलं?
बिहारच्या दरभंगा येथे राहणारा मोहम्मद मोहसीन नावाचा एक हिरे व्यापारी त्याचा फॅमिली जौहरी होता. तस अनेक जौहरी, सोनार त्याच्या दरबारात असतील पण हा एक खास होता. आता खास जौहरी म्हटल्यावर काही खास कामे आली. खास कामाचा खास मोबदला आला. खास हातचलाखी आली.
गंमत म्हणजे या सगळ्या खास कामातून मोहसीन साहेबांनी स्वतःच्या संसारासाठी काही हिरेमोती बाजूला काढून साठवले. ज्याची किंमत करोडो रुपयांची होती.
निझामाचे जौहरी असल्यामुळे मोहसीन यांना नवाब म्हणून बोलावले जायचे.
नवाब झाला तरी बिचारा मोहसीन आपल्या सारखा मिडलक्लास विचारांचा असावा. त्याने काय केलं आपले हिरे चोरी वगैरे होऊ नयेत म्हणून बँकेत नेऊन ठेवायचा विचार केला. हेराफेरीमधल्या अक्षयकुमारला पैशे डबल करून देतो म्हणून सांगणारी चीटफंड वाली बिपाशा बसू भेटते तसंच नवाबाला कोणी तरी भेटलं असाव.
२१ ऑगस्ट १९२३ रोजी नवाब मोहसीनने नेदरलँड्स ट्रेडिंग एजन्सीच्या कलकत्ता शाखेत हा खजिना जमा केला. त्याला २१ कोटी रिशमार्क (जर्मन करन्सी) इतकी रक्कम जमा झाल्याची रिसीट मिळाली. नवाबसाहेबांनी ती जपून देखील ठेवली.
पुढे त्या नेदरलँड्स ट्रेडिंग एजन्सीच रुपांतर एल्जीमीन बँकेत झाल.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज, डच वगैरे गोरी मंडळी आपआपल्या देशात परत गेली. आपल्या नवाबाचे हिरे सुद्धा परदेशी गेले. त्याने बँकेकडे आपली संपत्ती परत मागितली. मग मात्र बँकेने ठेंगा दाखवला.
बँकेने त्याला उत्तर दिल की
आमच्या कडे तुमचे २१ करोड जर्मन रिशमार्क ही रक्कम जमा होती पण सध्या या चलनाला कोणतीही किंमत नसल्यामुळे आम्ही तुमची रक्कम परत करू शकत नाही.
दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पराभवानंतर जर्मनीचे दोन तुकडे झाले. अख्खा देश बेचिराख झाला होता. यामुळे रिशमार्क हे चलन अवमूल्यन होऊन रसातळाला पोहचले होते. मोहसीनरावांचे डोळे पांढरे झाले. आयुष्यभराची ही कमाई होती. बँकेने त्याला गंडा घातला होता.
त्याकाळच्या केंद्र सरकारने मोहम्मद मोहसीन याला मदत करायचे नाकारले.
अखेर प्रकरण कोर्टात गेले. नवाबाने केस लढायची जबाबदारी आपल्या गावातील वैद्यनाथ मिश्रा यांच्या कडे दिली होती. आपल्या न्यायव्यवस्थेच्या कामकाजानुसार वर्षानुवर्षे ही केस चालत राहिली. मोहसीनचा दावा होता की हिरेमोती बँकेत जमा केले होते तरीही बँक म्हणत होती की तुम्ही जर्मन करन्सीमध्ये पैसे जमा केले होते. सगळा घोटाळा होता.
पुढे नवाब साहेबांचा या कोर्टाच्या लढाईत इंतकाल झाला. त्यांनी जाताना आपल्या वादात अडकलेल्या संपत्तीचा वारसदार वकील वैद्यनाथ मिश्राला केलं. त्याला माहित होत हा एकच माणूस शेवटपर्यंत लढा देणार.
खरोखर वैद्यनाथ मिश्रा यांनी लढा दिला. प्रकरण अगदी इंदिरा गांधी यांच्या पर्यंत नेलं. तेव्हाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे फेऱ्या मारल्या. पण काही उपयोग झाला नाहीं.
अखेर वैद्यनाथ मिश्रा यांनी राजकीय पक्षाची मदत घ्यायचं ठरवलं. कम्युनिस्ट पक्षाचे चतुरानन मिश्रा यांनी २७ जुलै १९८९ रोजी हा प्रश्न राज्यसभेत नेला. पण राजीव गांधी यांच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. पुढच्या वर्षी त्यांचं सरकार गेलं आणि व्ही.पी.सिंग पंतप्रधान बनले. त्यावेळी मिश्रा यांनी जोर खाल्ला.
१५ ऑगस्ट १९९० रोजी चतुरानन मिश्रा यांनी १५ खासदारांचे लेटर पंतप्रधानांना पाठवले आणि धरणे आंदोलनाला बसणार म्हणून धमकी दिली. वैद्यनाथ मिश्रा यांचे म्हणणे होते की १९८९ सालापर्यंत त्या हिऱ्यांची किंमत ७७ अब्ज रुपये इतकी झाली होती.
जर हे पैसे भारतात परतले तर कायद्यानुसार ८० % रक्कम सरकार खाती जमा होणार व त्याचा सरकारला फायदाच होणार आहे. त्यामुळे भारत सरकारने डच सरकार वर दबाव टाकून हे हिरे परत आणावेत.
पण एवढ्या छोट्या रकमेसाठी परराष्ट्र हितसंबंध धोक्यात येऊ नयेत म्हणून आजवरच्या एकाही सरकारने ते हिरे परत आणण्याचे धाडस केले नाही.
आता जवळपास ९८ वर्षे झाली. नवाब मोहसीनचे हिरे काही परत आले नाहीत. नेदरलँड्सच्या त्या बँकेच्या कुठल्या अधिकाऱ्याने हे हिरे खाल्ले हे कधीही कळाले नाही.
वैद्यनाथ मिश्रा यांनी सुरेंद्र किशोर या हिंदीतल्या जेष्ठ पत्रकाराला सगळी माहिती दिली होती. त्यांनी फर्स्टपोस्ट या वेबसाईटवर एका लेखातून जगासमोर आणली. आजवर बँकेला गंडा घालणारे निरव मोदीसारखे हिरे व्यापारी पाहिले पण हिरे व्यापाऱ्याला गंडा घालणारी एकमेव बँक पहिल्यांदाच ऐकायला मिळाली.
हे ही वाच भिडू.
- इंग्लंडमधल्या नदीमध्ये देवनागरी लिपी कोरलेला गूढ खजिना सापडला आहे.
- मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.
- मुंबईमधलं गूढ बंकर वालचंद शेठजींनी बनवलं होतं..
- व्यक्तीवेध नीरव मोदी.
.