अंत्यसंस्कार कसा करावा ?

दरवर्षी नेमकी किती लोकं मृत्यूमुखी पडतात याचा विचार केला आहे का ? आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा हा आकडा नेमका किती असावा असा तुमचा अंदाज आहे. साधारणं एक कोटींच्या घरात हा आकडा जातो. लेखाच्या सुरवातीलाच मरायच्या गोष्टी का करतेय अस तुम्हाला वाटलं असेल. तर विषय देखील तसाच आहे. मरायच्या गोष्टी करायच्या असतील तर त्यानंतर नेमकं काय होतं ते सांगायला नको का ?

एक माणूस मेल्यानंतर काय होतं ?  अंतिमसंस्कारासाठी ३०० किलो लाकडं लागतात !!! किती तर 300 किलो.  सध्याचा बाजारदर  पाहिला तर तीन एक हजार रुपये खर्च होतात. वरतून लाकूड वापल्याने होणारी पर्यावरणाची हानी वेगळीचं. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांवर आळा आणण्याच्या हेतूने झटपट अग्नीदाह मशिन्स देखील आणण्यात आल्या. पण प्रश्न निर्माण होतो तो भावनेचा. आपल्या जवळच्या माणसाला असं अग्नीदाह मशिन्समध्ये टाकून मोक्ष मिळेल का अस कोणत्याही धार्मिक नातेवाईकांना वाटणं साहिजिक आहे. थोडक्यात काय तर माणूस मरणं हे जसं खर्चीक आहे  तस पर्यावरणाची हानी करणारं देखील मग यावर नेमका कोणता उपाय असावा हा प्रश्न नागपुरातल्या एका NGO ला पडला. त्यांनी धार्मिक प्रथांना मान देवून एक आयडिया निर्माण केली. त्याच नाव “मोक्षकाष्ठ”.

काय आहे तो उपाय ? तर मोक्षकाष्ठ.

मोक्षकाष्ठची संकल्पना नागपूर महानगरपालिकेने स्थानिक NGO आणि Ecofriendly living  Foundation च्या मदतीने शोधली. हि संकल्पना अशी की,

शेतातून धान्य निघाल्यावर उरलेला चोथा टाकून दिला जातो किंवा जाळला जातो. तर हाच निरुपयोगी समजलेला चोथा यंत्रात टाकून त्याचे गोलाकार लहान आकाराचे ओंडके बनवले जातात. ह्या 3R मंत्र चोखपणे वापरून बनवलेल्या Biomass Brickets ना नागपूरकरांनी “मोक्षकाष्ठ” असे समर्पक नाव दिले आहे.

पैशात विचार करायचा झाला तर अंत्यसंस्कारासाठी साधारणं अडीच ते तीन हजारांच्या दरम्यान खर्च येतो. मोक्षकाष्ठ वापरायचे झाल्यास हा खर्च हजारा रुपयांने वाचतो. एक शव जळण्यासाठी साधारण ३०० किलो लाकडाची आवश्यकता असते मात्र मोक्षकाष्ठच्या विटा या २५० किलोपर्यन्तच वापरल्या जातात. आत्ता प्रश्न राहतो तो मोक्षकाष्ठच्या दर्जाचा. हिंदू परंपरेत कवटी फुटणं हे देखील पवित्र मानलं जातं. तोपर्यन्त मृतात्म्यास मुक्ती मिळाली नाही अस समजल जातं. आत्ता निरपयोगी चोथ्यापासून बनलेल्या मोक्षकाष्ठ हि कवटी फुटण्यास परिणामकारक ठरेल का असा प्रश्न पडला असेल तर सांगते, या मोक्षकाष्ठचा उष्मांक जळावू लाकडापेक्षा ५४ % अधिक असतो. परिमाणी शव पुर्णपणे जळण्यास मदत होते. जळावू लाकडांमध्ये साधारणपणे १५ ते २० टक्के ओलावा असतो पण मोक्षकाष्ठमध्ये हाच ओलावा तीन टक्के इतकाच असतो. हे झालं मोक्षकाष्ठच्या दर्जाबाबत आत्ता पुढचा प्रश्न.

खरच या मोक्षकाष्ठमुळे पर्यावरणाची होणारी हानी वाचवता येवू शकते का ?

लाकडांचा होणारा वापर टाळण्यासाठी अग्निदाह मशिन्स पुढे आणण्यात आल्या. मात्र नातेवाईकांकडून याचा वापर करण्यावर मर्यादा येत होत्या. साहजिक इतर पर्याय म्हणून शेणाच्या गोवऱ्यांचा विचार करण्यात आला. तुलना करायची झाल्यास लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्यापेक्षा खूपच कमी हानी या मोक्षकाष्ठकांमुळे होत असल्याचं दिसून येत आहे.

पहिला मुद्दा लाकडांचा. साधारणपणे शव जाळण्यासाठी भारतात तोडण्यात येणाऱ्या झाडांची संख्या दोन कोटींच्या आसपास आहे. दरवर्षी सुमारे अंदाजे एक कोटी लोक मृत्युमुखी पडतात व त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांच्या माध्यमातून जवळपास पंधरा वर्षे वयाची दोन कोटी झाडे कापली जातात. पालिकेच्या स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे पुरवली जातात. त्याकरिता पालिका कोट्यावधी खर्च करत असते.

दूसरा पर्याय आहे तो शेणाच्या गोवऱ्यांचा परंतु अंत्यसंस्कारांसाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करणं देखील प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून शक्य नसल्याचं अभ्यासक सांगतात. गोवऱ्यांपासून निर्माण होणारी राख व बाहेर पडणारे कार्बन  मोनॉक्साईड सारखे वायू देखील गंभीर समस्या निर्माण करत असल्याचं दिसून येत या दोन्ही गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून सध्यातरी मोक्षकाष्ठकडे पाहणं गरजेचं वाटतं.

आत्ता राहता राहिला मुद्दा अर्थार्जनाचा –

आत्ता तुम्ही विचार कराल याचा आणि आर्थिक फायदा कसा होवू शकतो. तर नागपुर शहरात सध्याच्या स्थितीत आठ कारखान्यांमधून मोक्षकाष्ठ निर्माण केले जाते. यातून तरुणांपुढे एका वेगळ्या व्यवसायाचं देखील मॉडेल उभा करण्यात आलं आहे. सध्या आठ कारखाने असले तरी येणाऱ्या काळात हि संख्या वाढेल हे नक्कीच सांगता येतं.