B प्लॅन म्हणून मित्रांनी मोमोजचा स्टॉल सुरु केला, आता देशभरात ३२० पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत

आज नाही उद्या, उद्या नाही परवा म्हणत अखेर काल राज्यात पावसाचं आगमन झालं एकदाचं. इकडे पाऊस आला आणि तिकडे हे सगळ्यांच्या सोशल मीडियावरील स्टोरीज पावसाच्या फोटोनी, व्हिडीओने भरल्या. आता पाऊस आणि काही तरी गरम हे समीकरण हमखास असतं. या गरम पदार्थांमध्ये वडापाव, चहा यांचंच अधिराज्य. पण काल अनेक मित्रांच्या स्टोरीजवर या लाईनमध्ये नवीन पदार्थाने वर्णी लावल्याचं दिसलं. 

ते म्हणजे मोमोज !

ऑनलाईन सर्च केले तर एक नाव लय ठिकाणी दिसत होते. वॉव मोमोसच. म्हणून जरा सर्च करून पाहिलं तर स्टोरी जरा इंटरेस्टिंग वाटली.  

सागर दर्यानी आणि बिनोद होमगाई या दोन वर्गमित्रांनी सोबत येत ‘वॉव मोमोस’ स्टार्टअपची स्थापना केली. २०० स्वेअर फूट जागेत या दोन मित्रांनी एक स्टॉल सुरु केल होता आणि आता हा स्टार्टअप देशभर पोहचला आहे.

सागर दर्यानी आणि बिनोद होमगाई हे दोघेही कोलकात्यातील झेव्हियर्स कॉलेजे मध्ये शिकत होते. 

२००८ मध्ये थर्ड इयरला असतांना त्यांच्या लक्षात आले की, आपला गणित विषय फार कच्चा आहे. आपण दोघेही कॅटची परीक्षा पास होणार नाही. त्यामुळे दर्यानी आणि होमगाई यांनी प्लॅन B ची तयारी सुरु केली होती. कोलकात्याच्या रस्त्यावर फिरतांना त्यांना लहान-लहान मोमोजची हॉटेल दिसायची. मात्र, मोमोजचा एकही मोठा असा ब्रँड नव्हता. 

त्यांच्याकडे स्टॉल, रेस्टोरंट सुरु करण्या एवढे पैसे नव्हते. त्यांनी आपल्या  मित्रांकडून ते जमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणीही पैसे उसने दिले नाही. शेवटी त्यांनी ३० हजारांचे कर्ज घेतले. 

त्यातून त्यांनी कलकत्त्यातील स्पेनसर रिटेलर मॉल मध्ये एक लहान स्टॉल भाड्याने घेतला. कमाईतील १८ टक्के हिस्सा मॉलला देण्याचे दर्यानी आणि बिनोद कुमारने मान्य केलं. अशा प्रकारे २८ ऑगस्ट २००८ पासून त्यांनी वॉव मोमोजची सुरुवात केली. मोमोज तयार करण्यासाठी दोन अर्धवेळ आचारी ठेवले होते.

पहिल्या काही दिवस मॉल मध्ये येणाऱ्या ग्राहकाला दर्यानी आणि बिनोद कुमार हे त्यांच्या स्टॉल वरील मोमोज टेस्ट करायची विनंती करत. 

दर्यानी हे वॉव मोमोजची मार्केटिंगच काम पाहण्याचं ठरले होते. तर मोमोस तयार करण्याचे काम बिनोद करायचे. बिनोद कुमार हे मूळचे नेपाळचे होते. त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये मोमोज बनवायला आचाऱ्याला सांगितले होते. कलकत्त्यातील लोकांना वॉव मोमोजची टेस्ट आवडत असल्याने ते स्टॉल समोर गर्दी करू लागले होते. त्यामुळे लोकांना उभे राहायला सुद्धा जागा पुरत नव्हती.

तिकडे ही गोष्ट स्पेनसर मॉलवाल्यांच्या लक्षात आली. त्यांनी दर्यानी यांना मॉल मध्ये रेस्टोरंट सुरु करण्याची ऑफर दिली. तर दुसरीकडे दर्यानी यांनी कलकत्त्यातील इतर जागेवर वॉव मोमोज स्टॉल सुरु करायची तयार सुरु केली होती. 

२०११ मध्ये दर्यानी आणि बिनोद कुमार यांनी कलकत्त्यातील सॉल्ट लेक इथं १४ लाख रुपये खर्च करून स्वतःच्या मालकीचं पाहिलं मोमोज रेस्टोरन्ट सुरु केलं. कलकत्त्यात वॉव मोमोज दिवसेंदिवस फेमस होत चालले होते. 

पुढच्या दोन वर्षात कलकत्त्यातील मॉल, मोठं मोठ्या ऑफिस, आयटी पार्क मध्ये वॉव मोमोज स्टॉल सुरु झाले होते. कलकत्यानंतर मुंबई, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, कोची, बंगलोर, या शहरात ३२० पेक्षा जास्त रेस्टोरंट आणि स्टॉल सुरु केले. 

पॅन फ्राईड मोमोज हा वॉव मोमोजचा युएसपी ठरला होता. त्यांच्या पूर्वी पॅन फ्राईड मोमोज कुठलेच रेस्टोरंट देत नव्हते. वॉव मोमोज मध्ये चॉकलेट, व्हेज, नॉनव्हेज अशा १६ प्रकारचे मोमोज मिळतात. 

वॉव मोमोजचा स्टार्टअप देशभर पोहचलं होत. मात्र त्यांनी २०१५ पर्यंत फाडींग घेतले नाही.

स्टार्टअप कंपन्यांवर एक आरोप करण्यात येतो की, या कंपन्या लवकर मोठ्या होण्यासाठी प्रयत्न करत असतात मात्र सस्टेन होण्यावर लक्ष देत नाही. यामुळे उत्पन्न मोठ्या वाढते पण त्याचा आर्थिक फायदा होत नाही. वॉव मोमोज ने उत्पन्न वाढी बरोबर अधिक आर्थिक फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले.    

२०१५ पर्यंत वॉव मोमोजने कुठल्याही कंपनीकडून फंडिंग घेतलं नाही. दुसरं रेस्टोरंट किंवा स्टॉल हे पहिल्या रेस्टोरंट मधून झालेल्या फायद्यांतून सुरु करायचे. त्यामुळे त्यांना फंडिंगची गरज पडत नव्हती. २०१५ मध्ये  इंडियन एन्जल नेटवर्क वॉव मोमोज १० कोटींची फंडिंग केली. त्यानंतर २ दर्यानी यांनी कुठलीही फंडिंग घेतली नाही. आलेल्या १० कोटी रुपयांचा पुरेपूर फायदा घेतला.  

२०१७ मध्ये दिल्लीत रेस्टोरंट सुरु करतांना टायगर ग्लोबल कंपनीकडून ४४ कोटींचे फंडिंग घेतले. या कंपनीने वॉव मोमोजचे काम पाहून परत २०१९ मध्ये १६५ कोटींची परत फंडिंग केली. हे सगळी इक्विटी फंडिंग होती. 

सागर दर्यानी हे सध्या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ग्राहक हे माझे सगळ्यात मोठे गुंतवणूकदार आहेत. तर रेस्टोरंट मध्ये काम करणारे कामगार हे माजी मालमत्ता आहे. केवळ १४ वर्षात वॉव मोमोज स्टार्टअपची कंपनीचं व्हॅल्यूवेशन १ हजार २२५ कोटींपेक्षा जास्त झाली आहे.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.