इटलीच्या मुसोलिनी समर्थकाने भारतात सुरु केलेली बेकरी आता सगळ्यात मोठा ब्रँड झालीय
केक आणायला गेल्यावर नुसता तो केक द्या अस लाजत म्हणणारा आमचा गण्या आता ब्लॅक फॉरेस्ट , रेड वेलवेट अशी फाडफाड इंग्लिश नाव घेऊन ऑर्डर सोडतो. तुम्हा आम्हाला या फिरंगी फ्लेवरची ओळख करून देण्यात मॉन्जिनीज या केक शॉपचा मोठा वाटा आहे .
आता फॅसिस्ट हा शब्द आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणून उगीच जोडलेला नाहीए तर या बेकरीशी या विचारधारेचा खरच संबंध होता. आता दुसऱ्या बाजूच्या लोकांनी उगीच फॅसिस्ट आहे म्हणून बेकरीवर बहिष्कार टाकण्याच्या आधी पहिली स्टोरी वाचा.
१९०३ साली मेसर्स मॉन्जिनी या इटालियन माणसाने मुंबईमध्ये चर्चगेटला एक हॉटेल थाटलं. पास्ता ,पिझ्झा त्यांसारखे पदार्थ जगाला देणाऱ्या इटालियन लोकांची हॉटेलं बऱ्यापैकी चालत असत. मॉन्जिनी भाऊंचहि हॉटेल तसच मस्त चाललं. इंग्रज अधिकारी आणि श्रीमंत भारतीय व्यापारी या हॉटेलमध्ये गर्दी करत. लवकरच मॉन्जिनी भाऊंनी हॉटेलचा विस्तार केला आणि आता आमच्याकडे लग्न ,पार्टी यांची ऑर्डर पण घेतली जाईल अशी पाटी दुकानाबाहेर लावली.
व्यवसायाबरोबरच मॉन्जिनीच्या बेकरी उत्पादनांची लोकप्रियता पण चांगलीच वाढत होती . बेकारीच्या केक , चॉकलेट्स , वेफर्स यांना आता पूर्ण भारतातुन मागणी येत होती. ख्रिसमस, इस्टर या सणांना पूर्ण भारतभर हे पदार्थ पार्सल केले जात.
आता एवढा सगळं निवांत चालू असताना राजकारणाचा नाद लागला नाही तर तो मर्द कसला.
बेकरीच्या संस्थापकांपैकी एक असणारा एल यु मॉन्जिनी हा फॅसिस्ट विचारधारेचा पर्यायाने मुसोलिनीचा मोठा भक्त होता.
आता त्यावेळी ट्विटर तर नव्हता मग हा भिडू टाइम्स ऑफ इंडियाला पत्र लिहून कळवत असे. आता मुसलोनी कोण होता तर इटलीचा हिटलर असं ढोबळमाणाने समजा. हिटलर आणि मुसोलिनीचे विचार अगदी मिळतेजुळते. याच मुसलोनीने हुकूमशाही का गरजेची आहे याबद्दल जे विचार मांडले त्यानं फॅसिस्ट विचारधारा म्हणतात . एल यु मॉन्जिनी याच विचारधारेचा समर्थक होता . १९२५ मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे फॅसिसम सेंटरचा हा भाऊ संचालक पण होता .
भारतात जरी व्यवसाय करत असला तरी मायदेशी म्हणजे इटलीच्या राजकारणात या भाऊला भलताच रस. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये फॅसिजम वरील वादविवादात देशाला शिस्त आणि आर्थिक स्थौर्य देण्यासाठी स्वातंत्र्यवर बंधने घालावीच लागतील तसेच हे सर्व करण्यासाठी एका ‘मजबूत नेत्याची’ आपल्याला गरज आहे असे अकलेची तारे तो तोडत असे. हा मजबूत नेताच देश इटलीला देशद्रोह्यांपासून वाचवून तिचा विकास करेल अश्या वल्गना तो करत असे.
त्याच्यासाठी फॅसिजम हि नुसती पार्टी नसून एक देशच होता आणि तो होता इटली.
दुसऱ्या महायुद्धात मुसलोनीने सपाटून मार खाल्यानंतर मॉन्जिनी भाऊंचे मत बदलले का याची काय आयडिया नाही राव. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानांतर हे भाऊ आपले रेस्टॉरंट खुराणा या भारतीय फॅमिलीला विकून देश सोडून निघून गेले. खुराणानी मग ते खोरकिवाला फॅमिलीला १९५६ मध्ये विकले. त्यांनी मग या हॉटेलचे रूपांतर वस्तू भांडारात केले.
पण तरीही दुकानात केकच जास्त विकले जायचे . मग आता या नवीन मालकांनी इटालियन भाऊ मागे सोडून गेल्याला उपकरणांच्या साह्याने बेकारीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवायला सुरवात केली. मुंबईमधील चेंबूर मध्ये या भारतीय कुटुंबाने मॉन्जिनीज केक शॉपची पहिली शाखा उघडली.
आता जवळपास सर्व शहरात यांची दुकानं आहेत. हा मॉन्जिनीज ग्रुप जरवर्षी जवळपास ३० दशलक्ष पेस्ट्री आणि ४० दशलक्ष केक विकतो. पूर्णपणे भारतीय बनलेली ही बेकरी आता ब्रँड झालीय. जेव्हा कधी केक आणायला या दुकानात जाल तेव्हा त्याला हा किस्सा सांगा आणि बघा केक वर किमान मेणबत्ती तरी फ्री देतो का .
हे ही वाच भिडू:
- कधीकाळी हातात बंदुका असणाऱ्या नक्षलवादी महिलांनी स्वतःचा ब्रँड उभा केलाय
- लवंगी फटाका ते लक्ष्मी बॉम्ब..९० वर्षे भारतात घुमणारा एकच आवाज म्हणजे अनिल ब्रँड
- पूना मर्चंट्स चेंबरमुळं आजही पुण्यातल्या कष्टकऱ्यांची दिवाळी गोड होते
English summary: Monginis was started by a fasicts of Italy
Web title : Monginis was started by a fasicts of Italy