मोनिकाला म्हणे शेवटपर्यंत कळलंच नाही की आपला बॉयफ्रेंड कुख्यात गँगस्टर आहे

ही कहाणी मोनिका बेदी ची. बॉलिवुड मध्ये करीयरच्या टॉप वर होती. सलमान खान, अर्जुन रामपाल सारख्या सुपरस्टार सोबत तिने स्क्रीन शेयर केली. पण एका व्यक्तीवर प्रेम करणं मात्र तिला चांगलंच महागात पडलं. तिचं सुरळीत सुरू असलेलं संपूर्ण आयुष्य त्यामुळे बदलून गेलं.

तेलगू सिनेमांमध्ये काम करून मोनिका बेदी पुढे आली. परंतु तिने केलेले सिनेमे इतके कमाई करु शकले नाहीत. त्यामुळे यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणती झाली नव्हती.

१९९५ साली मोनिका मुंबईत आली. इथे तिची प्रोडुसर मुकेश दुग्गल यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला ‘सुरक्षा’ सिनेमात काम दिले. सैफ अली खान आणि सुनील शेट्टी सारखे आघाडीचे कलाकार सिनेमात असूनही ‘सुरक्षा’ फ्लॉप झाला. मोनिका ला हळूहळू तेलगू सिनेमांमध्ये चांगल्या भूमिका मिळू लागल्या. तिच्या कामाचं तेलगू इंडस्ट्रीत कौतुक सुद्धा झालं. हवं तसं यश मिळत नव्हतं. त्यामुळे मोनिकाने मुंबईत डान्स कार्यक्रम केले.

मोनिका यशस्वी नव्हती. परंतु सिनेमात छोट्याश्या भूमिका आणि डान्स शो करून तिची बऱ्यापैकी गुजराण होत होती. आणि तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक फोन कॉल..

“हॅलो, माझं नाव अर्सलान अली. मी दुबईमध्ये एक डान्स शो आयोजीत केला असून त्यात तुम्ही नृत्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो.”,

असं पलीकडचा व्यक्ती मोनिकाला म्हणाला. मोनिका तसेही त्या काळात डान्स चे कार्यक्रम करत असल्याने तिने होकार कळवला.

काही दिवसांनी मोनिकाला कार्यक्रमाविषयी अर्सलान चा पुन्हा फोन आला. या दुसऱ्या फोनच्या वेळेस मात्र दोघेही भरभरून बोलले. आणि अशाप्रकारे मोनिका आणि अर्सलान जवळपास रोज एकमेकांशी फोनवर बोलू लागले.

दोघांचं संभाषण इतकं वाढत गेलं की जुनी मैत्री असल्यासारखे ते मनमुराद बोलायचे. सतत अर्सलान सोबत बोलल्याने मोनिकाला त्याच्याविषयी अनामिक आकर्षण वाटू लागले. कधी त्याचा फोन आला नाही तर तिची बेचैनी वाढायची.

अर्सलान प्रत्यक्ष न भेटूनही मोनिका त्याच्या प्रेमात पडली होती.

या दोघांची काही दिवसांनी दुबईला प्रत्यक्ष भेट झाली. फोनवरील बोलण्यापेक्षा जास्त आनंद यावेळी मोनिकाला झाला. दोघांनी एकमेकांसोबत सुंदर वेळ घालवला. आणि अर्सलानने मोनिकाला लग्नाची मागणी घातली. मोनिका सुखावली. तिने सुद्धा कसलाही विचार न करता त्याला होकार दिला. त्यावेळी मोनिका काहीशी एकटी राहत होती.

अर्सलान च्या निमित्ताने तिची काळजी करणारा एक व्यक्ती तिला मिळाला होता. त्यामुळे मोनिका प्रचंड खुश होती.

या भेटीनंतर मोनिका अनेक वेळा त्याला भेटायला दुबईला जाऊ लागली. जेव्हा ती अर्सलान ला मुंबईत यायला सांगायची, तेव्हा काही ना काही कारणं देऊन तो नकार द्यायचा. मोनिकाने अर्सलान विषयी घरी सांगितलं. तो मुसलमान होता. त्यामुळे मोनिकाने त्याचं नाव संजय आहे असं कुटुंबाला सांगितलं.

मोनिका खुश असल्याने तिच्या घरच्यांनी सुद्धा आणखी खातरजमा केली नाही.

मोनिका जसा वेळ मिळेल तसं दुबईला जाऊन अर्सलानला भेटायची. तिथे ती २ – ३ दिवस राहायची. सिनेसृष्टीत त्याच्या चांगल्या ओळखी असल्याने मोनिकाला चांगलं काम मिळवून देईल असं त्याने वचन दिलं. आश्चर्य म्हणजे, त्याने ते वचन पाळलं सुद्धा. पुढील दोन – तीन वर्षात मोनिकाला बॉलिवुड मधील चांगल्या सिनेमांमध्ये काम करता आले.

सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका जरी असली तरी तिचे सिनेमे सुपरहिट होऊ लागले.

बॉलिवुड मधलं तिचं करियर इतक्या वर्षांनी मार्गी लागलं होतं. तिच्या आयुष्यात जोडीदार म्हणून अर्सलान होता. मोनिका प्रचंड समाधानात आयुष्य जगत होती. एके दिवशी अचानक अर्सलान चा मोनिकाला फोन आला,

“तू लवकरात लवकर पहिलं विमान पकडुन दुबई गाठ. तुझ्या जिवाला धोका आहे.”

मोनिकाला काय झालं कळेना ! अर्सलान च्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तातडीने मुंबई सोडून ती दुबईला गेली. दुबईला काय वाढून ठेवलं होतं याची तिला कल्पनाच नव्हती.

ती दुबई एअरपोर्ट वर उतरली.  अर्सलान तिला घ्यायला आला होता. पण तो शांत होता. घरी जाईपर्यंत तो मोनिकाशी काहीच बोलला नाही. त्याचं हे असं शांत असणं मोनिकाला विचित्र वाटू लागलं. घरी गेल्यावर मात्र अर्सलान मोनिकाला म्हणाला,

“तुला यापुढे मुंबईला कधीच जाता येणार नाही.”

मोनिकाला प्रचंड धक्का बसला. कारण नेहमीप्रमाणे काही दिवस दुबईला राहून पुन्हा मुंबईत जायची तिने तयारी केली होती. मोनिकाने यामागचं कारण त्याला विचारलं. तेव्हा तो म्हणाला,

“माझं खरं नाव अर्सलान नसून अबू सालेम आहे. मी एक अंडरवर्ल्ड गँगस्टर आहे. पोलिसांना कळलं आहे की, तुझे माझ्याशी संबंध आहेत. पोलिस कोणत्याही क्षणी तुला अटक करू शकत होते. मोनिका, तुला अटक झाली की साहजिक काहीतरी कलम नोंदवून ते माझ्यापर्यंत पोहोचणार हे उघड होतं. त्यामुळे या भीतीपोटी मी तुला इतक्या लवकर दुबईला बोलावून घेतलं.”

मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला आपण काय ऐकतोय यावर विश्वास बसत नव्हता. यापुढे तिला आणखी एक धक्का अबू सालेमने दिला तो असा.. अबू सालेमचं लग्न झालं होतं. आणि त्याला लग्नापासून झालेलं मुल सुध्दा होतं.

आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं, डोळे झाकून विश्वास ठेवला तो एक कुख्यात गँगस्टर होता. लग्न झालं असूनही त्याने माझी फसवणूक केली. असे अनेक धक्के पचवणं मोनिकाला जड गेलं. पण हेच सत्य होतं. आणि यामुळे मोनिकाचं उर्वरित आयुष्य मात्र उध्वस्त झालं…

(संदर्भ : माफिया क्वीन्स ऑफ मुंबई )

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.