माकडांना हाकलून लावण्याचे घरगुती उपाय.
काय तुमच्या गच्चीवर माकडे झालेत. ? काय तुमच्या वामकुक्षीत माकडे अडथळा आणत आहेत ?
काय माकडे तुमची कपडे घेवून पळून जात आहेत ? काय माकडे खुरवड्या, सांडगे घेवून जात आहेत ?
“आत्ता काय करावं बाबा ह्या माकडांना ? मारुती म्हणलं तरी खातय हुप्या म्हणलं तरी खातय” या चिंतेत तुमची आज्जी घरातून बाहेर जात नाही…
अशा अनेक प्रश्नांनी उन्हाळ्यात गावात शिरणाऱ्या माकडांनी तुम्हाला वात आणला असेल तर जाणुन घ्या, माकडांना पळवून लावण्याचे हे घरगुती उपाय. आम्ही गॅरेंटी देतो. हे उपाय केल्यानंतर शंभर टक्के माकडं पळून जातील.
१) हुप्या हुय्या म्हणून चिडवणे –
माकडांना चिडवलेलं खूप आवडतं. एकमेकांना चिडवतच माकडे आपलं मनोरंजन करत असतात अस प्राणीशास्त्रज्ञ सांगतात. आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीतलं काम म्हणून तुम्ही माकडांना चिडवण्यास सांगू शकता. अशा वेळी आपल्या मुलांनी शिव्यांचा अथवा अश्लिल शब्दांचा वापर करु नये म्हणून तुम्ही त्यांना बडबडगीतं रचून देवू शकता. मात्र हा प्रकार करत असताना मुलांना सेफ ठिकाणी उभा राहण्यास सांगावं. जेणेकरुन माकडांच्या रागाचा कडेलोट होवून माकडं मुलांपर्यन्त पोहचणार नाहीत.
विशेष म्हणजे हा उपाय मुलांच्या मनोरंजनासोबत तुमच्या मनोरंजनासाठी महत्वाचा ठरू शकतो.
२) कुत्र्याचा आवाज काढणे –
उत्तम अभिनय क्षमता व सुरेल असा घसा असेल तरच तुम्ही हा प्रयोग अंमलात आणू शकता. माकड कुत्र्यांना भितात हे खोटं असलं तरी, कुत्रं दिसत नाही पण आवाज येतोय या कन्फ्यूजनमध्ये माकडं गोंधळून दूर जाण्याची शक्यता असते. मात्र हा खोटा आवाज आहे अस माकडांच्या लक्षात आलं तर मात्र माकडं आक्रमक होवू शकतात. म्हणूनच स्वत:वर असणारा विश्वासच तुम्हाला या गोष्टीत यशस्वी करु शकतो.
३) घराच्या गच्चीवर टेडी बेयर बांधणे –
“हा कुठला प्राणी आहे जो खावून खावून गुलाबी झाला आहे ?” अशा प्रकारचे भाव माकडांच्या चेहऱ्यावर दिसण्यासाठी तुम्ही या गोष्टीचा उत्तम वापर करु शकता. माकडांचा मोठ्ठा कळप असेल तरी देखील तो एका टेडी बेयरला भिवू शकतो. घराच्या अचूक कोपऱ्यात असा डेटीबेअर ठेवा जेणेकरून माकडं कन्फ्यूज होतील आणि रिस्क घ्यायला घाबरतील.
४) दिवाळीच्या बंदूकीच्या केपा उडवणे –
अत्यंत साधा, सुटसुटीत आणि आकर्षक उपाय म्हणजे दिवाळीच्या केपा उडवणे. मोठ्या आवाजाने माकडांचा कळप दूर जावू शकतो सोबतच मुलांना दिवाळी जवळ आल्याचा फिल तुम्ही उन्हाळ्यात देवू शकता. हा उपाय करताना मुले खरोखरच दिवाळी समजून अितरिक्त खर्चात टाकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
५) सुकसुक करणे –
सुकसुक करणे ही अंत्यत सोप्पी आणि कमी खर्चीक बाब आहे. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लिंबू सरबताचा खर्च उचलावा लागतो. सुकसुक केल्यानंतर माकड प्रतिसाद देवून आपणाला देखील सुकसुक करतात अशा वेळी त्यांना वेटवाण दाखवून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारावा. त्यानंतर माकडाला समजून जाईल की समोरील व्यक्ती हि “मोदींच्या बेरोजगार” धोरणांची बळी आहे. परिणामी याकडे आपल्याहून अधिक रिकामा वेळ आहे हे देखील माकडाच्या लक्षात येईल व माकड पळून जाईल.
६) घराला बाहेरून कुलूप लावणे –
घराला बाहेरून कुलूप लावणं हा देखील माकडं पळवून लावण्याचा उत्तम उपाय आहे. माकडे मुद्दामहून त्रास देतात. जर का कोणी त्रास देण्यासाठी नसेल तर माकडे बोअर होवून निघून जातात. तुमच्या घराला कुलूप दिसल्यास माकडे उगीच टाईमपास करणार नाहीत. ती नक्कीच निघून जातील.