भारताला बॉडीबिल्डींग शिकवली मिस्टर युनिव्हर्सचं टायटल जिंकणाऱ्या मोनोतोष रॉय यांनी….

अशी एक म्हण आहे बघा कि गावात एकाला हार्टअटॅक आला तर महिनाभर सगळं गाव व्यायाम करायला सुरवात करतं. जस जस त्या हार्टअटॅक वाल्याचा लोकांना विसर पडतो तसे तसे सगळे पुन्हा व्यायामाच्या नादी लागत नाहीत. बॉडीबिल्डिंगची क्रेझ जगाला काय नवीन नाही. शरीरसौष्ठव स्पर्धेत या बॉडीबिल्डिंग करणाऱ्या लोकांची ताब्यात बघून सगळेच हैराण होतात. अशी काम करायला मसल पाहिजे मसल….

तर मेन मुद्द्याकडे वळूया कि बॉडी बिल्डिंगचा काय विषय चाललाय बाबा. तर बॉडीबिल्डिंगची क्रेझ अलीकडे वाढलेली आहे पण १९५० च्या काळात

जेव्हा भारतात बॉडी बिल्डिंग हा काय प्रकार असतो कोणालाच माहिती नव्हतं तेव्हा भारतातल्या एका भिडूने मिस्टर युनिव्हर्सचं बॉडीबिल्डिंगचं टायटल जिंकलेलं होतं. भारतात बॉडीबिल्डींगमध्ये आलेलं हे पहिलंच टायटल होतं आणि ते टायटल जिंकणाऱ्याचं नाव होतं बॉडीबिल्डर मोनोतोष रॉय.

२१ ऑक्टोबर १९१६ रोजी ढाकामध्ये गजरीया गावात मोनोतोष रॉयचा जन्म झाला. घरी गरिबी पाचवीला पुजलेली. नदीकिनाऱ्यावर रॉयचं बालपण गेलं. मोठं कुटुंब पण घरात खायची मारामार होती. जन्मापासूनच गरिबीशी संघर्ष चालत आला असला तरी अशा परिस्थितीतही मोनोतोष रॉयने गावाच्या इंग्लिश मिडीयम शाळेतून शिक्षण घेतलं. पण शाळेत आणि अभ्यासात रॉयचं ,मन रमल नाही.

मोनोतोष रॉयहा ज्यावेळी बारा वर्षांचा होता तेव्हा त्याला वजन उचलण्यात आणि वस्तूंची तोडफोड करण्यात आनंद मिळायचा. कुटुंबाला पोराची आवड माहितीच नव्हती. अगदी लहान वयात बॉडीबिल्डींगचा नाद रॉयला लागला होता. जिथं जड वस्तू दिसेल ती उचलणे आणि व्यायाम करणे याची त्याला गोडी लागत गेली. आपली सवय रॉयने चांगलीच जोपासली. 

त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश भारतातील उत्कृष्ट योग शिक्षकांपैकी एक असलेल्या बिष्णु चरण घोष यांना रॉयने आदर्श मानले होते. जेव्हापासून मोनोतोष रॉयने बॉडीबिल्डिंग सुरु केली होती तेव्हा तेव्हापासून त्याने बिष्णु चरण घोष यांच्या हाताखाली आपल्याला प्रशिक्षण मिळावं अशी आशा बाळगलेली होती. पण अत्यंत चमत्कारिकरीत्या मोनोतोष रॉयचं स्वप्न पूर्ण झालं.

अगदी एकलव्य जसा मूर्तीला आदर्श मानून सराव करत असायचा तसाच मोनोतोष रॉय बिष्णु चरण घोष यांच्या फोटोला समोर ठेवून प्रॅक्टिस करायचा. एके दिवशी बिष्णु चरण घोष यांनी मोनोतोष रॉयला सर्व करताना पाहिलं आणि ते जाऊन रॉयला भेटले. रॉयला तर आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटलं कारण इतके दिवस गुरूला समोर ठेवून तो आपलं शिक्षण घेत होता आज थेट गुरूच त्याच्या भेटीला आले होते. मोनोतोष रॉयच्या कष्ट करण्याच्या तयारीवर बिष्णु चरण घोष खुश झाले आणि त्यांनी रॉयला विद्यार्थी म्हणून स्वीकारलं.  

भारताचा मिस्टर युनिव्हर्स बनण्याचा मोनोतोष रॉयचा प्रवास मुळातच सोपा नव्हता. १९३९ पासून एका नव्या पर्वाला सुरवात झाली होती. बिष्णु चरण घोष यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष रॉयने सराव केला. वयाच्या २३ व्या वर्षी पहिल्यांदा बॉडीबिल्डींगमध्ये रॉयने सहभाग घेतला. पण त्याच्या हाती निराशा लागली. पण त्याच वर्षी पुन्हा एकदा भाग घेऊन त्याने ईस्ट इंडियन बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप जिंकली. पुढे आठ वर्षांनी तो ऑल इंडिया बॉडीबिल्डींगचा चॅम्पियन झाला.

भारतातले जवळपास बॉडीबिल्डींगमधले सगळेच टायटल खिशात घालून मोनोतोष रॉयइंटरनॅशनलसाठी युकेला गेले. १९५१ मधली ती युनिव्हर्स स्पर्धा. आपल्या मसलने आणि शरीरयष्टीने रॉयने सगळ्यांनाच अवाक केलं. हौशी प्रकारात बाजी मारत मोनोतोष रॉयने मिस्टर युनिव्हर्सचं बॉडीबिल्डिंगचं टायटल जिंकलं. त्याच्या विजयाचा उत्सव भारतातल्या अधिकाऱ्यांनी इंडिया हाऊसमध्ये केला होता.

या विजयानंतर जास्त संघर्ष मोनोतोष रॉयच्या वाट्याला आला नाही. नंतर अनेक योगा आणि फिटनेस केंद्रांवर प्रशिक्षक म्हणून रॉय यांनी काम केलं. १९५९ मध्ये मोनोतोष रॉय यांनी इंडियन बॉडीबिल्डिंग फाउंडेशनची स्थापना केली. अनेक लेख आणि पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिली.

भारतातले महान दिग्दर्शक सत्यजित रे सुद्धा मोनोतोष रॉययांच्या बॉडीबिल्डिंगचे फॅन होते.

पुढे त्यांचा वारसा त्यांच्या मुलाने मोलोय रॉयने चालवला. मोलोय रॉय यांनी बॉडीबिल्डींगमधला अर्जुन पुरस्कार पटकावला होता. २००५ मध्ये कार्डियाक अरेस्टने मोनोतोष रॉय यांचं निधन झालं. पण आपल्या बॉडीबिल्डिंगच्या क्रेझने त्यांनी एकेकाळी भरपूर फॅन जमवले होते. आशिया खंडातला पहिला मिस्टर युनिव्हर्स मोनोतोष रॉय अशी त्यांची ख्याती होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.