मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र : तुमच्या भागात यंदाचा मान्सून असा असेल

भयानक उकडणाऱ्या या उन्हाचे काही उरले सुरले दिवस काढायचे आहेत बॉस. तसं हे खूपच हार्ड जातंय. पण म्हणतात ना, येणारी गोष्ट जर चांगली असेल तर त्याच्या आधीचे काही दिवस काढण्याचं बळ आपोआप मिळतं. आता उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस घालवायचं बळ देखील मिळालं आहे, कारण चाहूल लागलीये ‘पावसाची’.

शिवाय तुम्हाला माहितीये, यंदाचा पावसाळा जास्त वाट बघू देणार नाहीये. कारण तो ५-६ दिवस लवकर येण्याची शक्यता आहे. हे आम्ही नाही, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हणजेच आयएमडीने सांगितलंय.

म्हणूनच कसा आहे मान्सून २०२२ चा अंदाज? आणि शेतकऱ्यांसाठी, पिकासाठी तो कसा असणार, हे सविस्तर जाणून घेऊया… 

भारतामध्ये मान्सून सगळ्यात पहिले दाखल होत असतो तो केरळमध्ये. साधारणतः १ जून पर्यंत मान्सून केरळपर्यंत पोहचत असतो. पण यावेळी तो वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीये. 

कारण काय? 

तर अंदमानच्या समुद्रात मान्सुनसाठी निर्माण झालेलं अनुकुल वातावरण. 

बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ सध्या आलंय हे आपल्याला माहित आहे. या चक्रीवादळाने  मान्सूनची वाट सोपी केली आहे. तसं चक्रीवादळाचा थेट मान्सूनशी संबंध नाही. पण हे वादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल. आणि त्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. 

त्यानुसार अंदमानात मान्सून १७ मेपर्यंत तर केरळात ७-८ दिवस आधी म्हणजेच २० मेनंतर केव्हाही दाखल होऊ शकतो, असा अंदाज देण्यात आलाय.

ठीक आहे केरळमध्ये येईल. मात्र महाराष्ट्रात कधी येईल? 

मागील वर्षी मान्सूनने दोन दिवसांच्या उशिराने केरळमध्ये हजेरी लावली होती. म्हणून महाराष्ट्रात दाखल व्हायला पण उशीर झाला होता. मात्र यंदा केरळमध्येच लवकर मान्सून येणार असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सुन महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रासोबत तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पोहोचण्याचीही शक्यता आहे.

जूनच्या सुरुवातीला दाखल झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीन पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असं सांगण्यात आलंय.

आता पुढचा महत्वाचा मुद्दा…

पाऊस दाखल होतोय, मात्र तो किती प्रमाणात पडेल, कसा असेल?

आपले शेतकरी पावसाच्या या अंदाजावर खूप अवलंबून असतात. सगळ्या पिकांची त्यानुसार प्लॅनिंग करावी लागत असते. आता यंदा लवकर पाऊस दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असल्याचं बोललं जात आहे. 

त्यातही दुसरी आनंदाची बातमी म्हणजे – 

या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आयएमडीने दिलीये. 

प्रशांत महासागरातील ‘ला निना’ स्थितीमुळे पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे. या ९९ टाक्यांमध्ये ५ टक्के कमी जास्त तफावत होऊ शकते, मात्र या अंदाजानुसार ‘देशात यंदा सलग चौथ्या वर्षी पाऊस सरासरी गाठेल,’ असं  आयएमडीने जाहीर केलंय. 

तर असाच समाधानकारक पावसाचा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. 

एक लक्षात घ्या, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण समजला जातो. गेल्यावर्षी ९८% पावसाचा अंदाज देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात सरासरीपेक्षा ९९% पाऊस पडला. यावेळी ९९ टाक्यांचाच अंदाज देण्यात आलाय. 

तर यात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता ४०% सांगण्यात अली आहे, जी सर्वाधिक आहे. तर दुष्काळाची शक्यता १४% आहे. 

महाराष्ट्राबद्दल सांगायचं तर, चांगल्या पावसाचे संकेत आहेत.

विभागनिहाय पावसाचे प्रमाण दर्शवणाऱ्या ‘प्रोबॅबलिस्टिक’ अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यात हे प्रमाण जास्त असू शकतं. म्हणजे जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त असून, राज्यात इतर ठिकाणी तीच शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे, असं हवामानशास्त्र विभागाने सांगितलंय. 

दरम्यान आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं यावर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज दिलाय. तेव्हा आता पाऊस साथ देणारा हे क्लिअर आहे म्हटल्यावर, पिकांची प्लॅनिंग करायला काही हरकत नाहीये. 

पण, यात एक महत्वाचा मुद्दा असा की, हे हवामान आहे. रोजच्या रोज बदलू शकतं. मग मान्सून आल्यानंतर किंवा तो येईपर्यंत त्याची प्रत्येक अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर कसं बघायचं. जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. शिवाय आम्ही हे आयएमडी-आयएमडी म्हणतोय, अंदाज सांगतोय, तो कसा बघितला? हा प्रश्न पडलाच असेल. 

तेव्हा तुम्ही स्वतः रोजचा हवामान, मान्सून अंदाज कसा बघू शकतात हे थोडक्यात सांगतो…

तर भारतीय हवामानशास्त्र विभागाची म्हणजे IMD ची स्वातंत्र वेबसाईट आहे. गुगलवर IMD टाकलं की, पहिलीच साईट येते – https://mausam.imd.gov.in/ अशी. 

ती ओपन केली की लाल पट्टीमध्ये nowcast असं दिसतं. त्याच्याखाली २ ऑप्शन असतात. त्यावरील District wise वर क्लिक केलं की संपूर्ण भारताचा नकाशा दिसतो. मग तिथे तुम्ही आपल्या जिच्यावर कर्सर नेलं की आजच्या दिवसाची सगळी हवामान माहिती मिळते. 

जर तुम्हाला अशीच माहिती येत्या काही दिवसांची हवी असेल तर, होम पेजवर त्याच लाल पट्टीवर वार्निंग्स म्हणून ऑप्शन आहे. त्याखालच्या district wise वर क्लिक केलं की असाच नकाशा येतो. मात्र तिथे वर दिनांकाची पट्टी असते. त्यावर क्लीक करून तुम्ही पुढचे अंदाज बघू शकता. 

हा नकाशा तुम्हाला पूर्ण रंगवलेला दिसतो. तो पण वेगवेगळ्या रंगांनी. जसं की, हिरवा, पिवळा, केशरी आणि लाल. तर हे रंग वॉर्निंगसाठी, अलर्टसाठी वापरले जातात.  

हिरवा रंग म्हणजे सगळं नॉर्मल आहे. पिवळा रंग म्हणजे काही पाऊस थोडा जास्त आहे, पुढचे काही दिवस महत्वाचे आहेत. ऑरेंज अलर्ट म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, पावसाचं प्रमाण जास्त असणार. तर रेड म्हणजे नेहमीप्रमाणे धोक्याची घंटा. मुसळधार पाऊस बरसू शकतो, असं त्यातून सांगितलं जातं.

बाकी हा मान्सून अंदाज ऐकून तुम्हाला आनंद झाला की नाही? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना, मित्रांना नक्की शेअर करा. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.