मोरारजींच्या शेंगा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या बायकोने चखणा समजून संपवल्या आणि..

संध्याकाळच्या ओल्ड मन्क टेबलवर दोस्त मंडळी गोळा होतात. पाठी मागे कुमार सानूचा पिळून टाकणारा आवाज, मंद प्रकाश आणि रंगीत ग्लास. पहिल्या दोन पेग नंतर दोस्तीला बहर  येतो. पोरगी कशी सोडून गेली याच्या दर्दभऱ्या कहाण्या रिपीट मोड वर शेअर होतात. जिंदगीतली सुखदुःख सगळी त्या टेबलावर मांडून हिशोब घातला जात असतो.

हे सगळं चालू असताना प्रत्येक टेबलवर हमखास असा एक मित्र असतो जो न पिणारा असतो. बाकीचे रंगात आल्यावर बकाणा भरून त्यांची मजा बघत चकणा संपवण्याकडे या जमातीचा जोर असतो. दोस्तीच्या हायेस्ट मोडवर असणारे पिणारी मंडळीच जेव्हा या चकणा संपवणाऱ्या जमातीकडे लक्ष जात तेव्हा त्यांच्या डोक्यावरच दोस्तीच भूत उतरत आणि शिव्यांचा वर्षाव सुरु होतो.

चकणा वरून झालेल्या मारामाऱ्या आपण इतिहासात ऐकल्या आहेत, वर्तमानात अनुभवल्या आहेत.

मात्र आज पण असा एक किस्सा बघणार आहे जो चकण्यावरून झालेला पण आयुष्यात कधीही दारू न पिलेल्या माणसासोबत.

मोरारजी देसाई. भारताच्या इतिहासातील पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान. पण मूळचे काँग्रेसचे.  स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले, जेलमध्ये जाऊन आलेले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री, नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, इंदिरा गांधींचे उपपंतप्रधान अशी अनेक मोठमोठी पदे त्यांनी सांभाळली. काँग्रेस सोडल्यावरही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. म्हणूनच आणीबाणी नंतर जेव्हा जनता सरकार आलं तेव्हा त्यांना पंतप्रधान बनवण्यात आलं.

त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे जेवणाचे आणि इतर खाण्यापिण्याचे नियम खूप कडक होते.

मोरारजींच्या जीवनावर महात्मा गांधींचा मोठा प्रभाव होता. शिवाय ते गुजरातचे, वडील शिक्षक होते. त्यामुळे घरच वातावरण एकदम धार्मिक आणि कडक. मोरारजी शुद्ध शाकाहारी होते. कधीही दारू च्या बाटलीला त्यांनी हात लावला नाही. त्यांच्यामुळेच गुजरातमध्ये दारूबंदी लावली गेली असं म्हणतात. त्यांचा त्यात शिवांबू उपचारपद्धतीवर विश्वास होता. ते रोज सकाळी स्वतःचे मूत्र प्राशन करायचे. त्याचा आरोग्यावर कसा चांगला परिणाम होतो हे सगळ्यांना पटवून द्यायचे.

असे हे मोरारजीभाई जेव्हा नुकतेच पंतप्रधान झाले होते तेव्हाची ही गोष्ट.

१९७७ साल असावे. मोरारजी देसाई कॉमनवेल्थ देशांच्या कॉन्फरन्स साठी इंग्लंडला गेले होते. हा त्यांचा पंतप्रधान म्हणून पहिलाच इंग्लंड दौरा असावा. कॉमनवेल्थ म्हणजे ज्या देशांवर एकेकाळी इंग्लडच्या राणीचे राज्य होते असे देश.  जगभरातून या कॉमनवेल्थ देशांचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान या कॉन्फरन्स साठी इंग्लंडला आले होते.

Mandatory Credit: Photo by Bill Orchard/Shutterstock (375723a)

या सगळ्या महनीय व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था स्कॉटलंडमधल्या ग्लेनिगल्स या आलिशान हॉटेल मध्ये करण्यात आली होती. दोन दिवस चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये एके रात्री या सगळ्या व्हीआयपी पाहुण्यांसाठी डिनर आयोजित करण्यात आले होते.

रात्री उशिरा पार्टी सुरु झाली. या डिनर पार्टीमध्ये सर्व प्रकारची पक्वाने, उंची दारू यांची रेलचेल होती. 

भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई हे ज्या टेबल वर बसले होते तिथे त्यांच्यासोबत न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि कॅरिबियन बेटावरील एका देशाचे राष्ट्राध्यक्ष बसले होते. त्यांच्या दोघांच्याही पत्नी मोरारजींभाईंच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसल्या होत्या.

सगळ्यांना जेवण वाढलं जात होतं. पण मोरारजी देसाईंचा डायट प्लॅन वेगळा होता. त्यांनी वेटरला हाक मारली आणि एका वाडग्यात शेंगदाणे, ड्राय फ्रुट आणि ग्लास भरून दूध मागवलं. खरं तर त्यांनी आपल्याला खाण्याच्या लागणाऱ्या गोष्टी परदेशात मिळतील कि नाही हे माहित नसल्यामुळे भारतातून येताना सोबत आणल्या होत्या.

वेटरने त्यांच्या दुधाचा ग्लास, शेंगा, काजू बदाम चे बाऊल सजवून टेबलवर आणून ठेवले. इकडे सगळ्या राष्ट्राध्यक्षांच्या गावगप्पा सुरु होत्या. एकमेकांचे गॉसिपिंग चाललं होतं. सोबत वाईनचे घोट घेतले जात होते. गप्पा चांगल्या रंगल्या पण तिकडे मोरारजी भाईंचं टेन्शन वाढलं.

बोलता बोलता न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या पत्नी मोरारजींच्या शेंगा फस्त करत होत्या.

त्यांच्या बरोबर बसलेल्या कॅरिबयन देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने देखील मोरारजींच्या ड्रायफ्रुट वर डाव हाणला. त्यांना ठाऊकच नव्हतं की भारताच्या पंतप्रधानांच हे डिनर आहे. त्यांनी समोर ठेवलेला चखना समजून सम्पूर्ण प्लेट उडवून लावली. बिचारे मोरारजी भाई सगळं दिसत असून काही बोलू शकले नाहीत. गप्प दूध पिऊन त्यांनी आपलं पोट भरलं.

परदेशी पाहुण्यांना कळत नव्हतं की इंडियन प्राईम मिनिस्टर असे उदास का दिसत आहेत.

फक्त एवढ्यावर गोष्ट थांबली नाही. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंग्लंड या वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली की न्यूझीलंड आणि कॅरिबयन देशाच्या पंतप्रधानांच्या बायकांमुळे भारतीय पंतप्रधानाला कसे उपाशी पोटी बसावं लागलं. जगभरात चर्चा झाली. भारतात काही मोरारजीभाईंच्या फॅन्सनी निषेधाची भाषणे देखील ठोकली असं जुने जाणकार सांगतात.

एकूणच आपले पंतप्रधान आणि त्याचे डाएट प्लॅन त्यानिमित्ताने सगळ्या जगाला ओळखीचे झाले. पुढे अशी घटना घडणार नाही याची दक्षता घेतली गेली.

त्यानंतर म्हणे मोरारजी देसाईंनी प्रतिज्ञा केली की आपल्या शेंगा आपल्या खिशातच ठेवायच्या.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.