मोरबी : शहरही तेच नदीही तीच : ४३ वर्षांपूर्वी दिड हजार लोकांचा मृत्यू झाला होता..

तारिख होती 16 ऑगस्ट 1979.. 

गुजरातचं मोरबी शहर. या शहरातल्या सचिवालयात गुजरातचे मुख्यमंत्री बाबूभाई पटेल एक आकडेमोड करत होते. एका पद्धतीचं गणित ते सोडवत होते. पण ते गणित गुजरातच्या इतिहासातलं सर्वात वाईट गणित होतं. ही आकडेमोड होती माणसांची.

गणित सुटलं आकडेवारी आली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं, 

गेल्या पाच दिवसात प्रशासनाने एकूण 1137 लोकांच्या शरीराच्या अवशेषांचे अंत्यसंस्कार केलेले आहेत तर सुमारे 2919 जनावरांचे अवशेष मार्गी लावण्यात आलेले आहेत. हे ठिकाण होतं मोरबी आणि ज्या घटनेमुळे संपूर्ण देशात मोरबी शहर चर्चेत आलं होतं त्या नदीच नाव होतं मच्छू नदी… 

मच्छू नदीवर असणारं धरणं फुटल्याने मोरबी शहरात हाहाकार माजला होता. हजारो लोकं पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. एका आठवड्यात पाणी ओसरल्यानंतर ठिकठिकाणी तुटलेले होतं, लटकलेली प्रेतं दिसत होतं. या शहराला त्या काळात घोस्ट टावून म्हणून ओळखलं जावू लागलं होतं. पण काळ सरला लोकं ती घटना विसरून गेले. तोच कालचा प्रसंग तीच नदी आणि तेच गाव घटना मात्र वेगळी.. 

Screenshot 2022 10 31 at 1.24.50 PM

काल मोरबीच्या मच्छू नदीवर असणारा झुलता पुल कोसळल्याने 190 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी आली. या दुर्घटनेनंतर पुन्हा मच्छू नदी आणि मोरबी हे शहर चर्चेच्या केंद्रबिंदूवर आले. 

काय होती इतिहासातली ती घटना : 

तारिख होती 11 ऑगस्ट 1979. दूपारचे सव्वा तीन वाजले होते. गेल्या काही दिवसांपासून मोरबी शहरात पावसाने जोर धरलेला होता. या शहराच्या जवळच मच्छू नदीवर धरण होतं. हे धरण पावसाच्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाले. त्यातच धरणाला गळती लागली आणि एका क्षणात संपूर्ण धरण फुटले. पाण्याचा तो अजस्त्र प्रवाह मोरबी शहराच्या दिशेने आला आणि पाहता पाहता संपुर्ण शहर पाण्याच्या आणि पाण्यासोबत आलेल्या गाळाच्या लोंढ्यात विलूप्त झाले. 

पुणे शहरात पानशेत धरण फुटल्यानंतर आलेला पूर व मोरबीत आलेला पूर यामध्ये प्रमुख फरक असा होता की पुणे शहरापासून पानशेतच्या अंतरामुळे पुण्यापर्यन्त येणारा हा पाण्याचा प्रवाह नदी पात्रासोबतच होता. तो पात्रातून बाहेर पडला होता पण पाणी नदीपात्राच्या दिशेप्रमाणेच वाहत होते. मोरबीचा पूर याहून वेगळा होता. मोरबीत आलेला पुर हा नदीपात्रातून न वाहता चौफेर वाहत होता. 

Screenshot 2022 10 31 at 1.24.59 PM

त्यानंतरच्या आठवड्याभरात शहरात गाळ आणि सडलेल्या मांसाचा खच साठला होता. ठिकठिकाणी असणाऱ्या झाडांवर माणसांचे कुजलेले अवयव दिसून येतं. गाळामुळे व दगडधोंड्यामुळे माणसांचे तुकडे झाले होते. प्रेतं सडली होती. या प्रवाहात वाहून जाणाऱ्या माणसांचा आकडा तेव्हा दिड हजारांच्या वरती असल्याचं सांगण्यात आलं. किमान 1439 प्रेतं प्रशासनाला मिळवणं शक्य झालं होतं. या कामी लष्कर आलं होतं. लष्कराने ठिकठिकाणी खड्डे खोदून सामुहिक पद्धतीने प्रेतांची विल्हेवाट लावली होती. 

पण धरण कसं फुटलं होतं.. 

धरणं फुटण्याची गोष्ट ही इतिहासातच विलुप्त झाली. दुर्घटनाच इतकी मोठ्ठी होती की त्यानंतर आपत्ती निवारणात सर्व प्रशासन लागलं. ठरवून किंवा ओघाने दुर्घटना कशी घडली हा प्रश्न टाळण्यात आला. पण 16 तासांमध्ये झालेला 20 इंच इतका पाऊस तितकाची मोठ्ठा नव्हता की ज्यामुळे धरण फुटू शकेल. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेबद्दल मत व्यक्त करताना सांगितलं होतं की एकतर धरणं असतं किंवा नसंत पण अशी दुर्घटना टाळता आली नसती कारण पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच इतका जास्त होता. 

इंदिरा गांधींची मदत व वाद.. 

16 ऑगस्ट रोजी इंदिरा गांधींनी मोरबीला भेट दिली. त्यांच्यासोबत एकूण 21 व्हिआयपी लोक मोरबीत दाखल झाले होते. सडलेल्या प्रेतांचा खच पडला होता, ठिकठिकाणी जनावरं फुगलेली होती. वातावरणात इतकी दुर्गेधी होती की इंदिरा गांधींनी आपल्या नाकाला रुमाल लावून हा दौरा पार पाडला. तेव्हा चित्रलेखा मासिकाने इंदिरा गांधींचा तो फोटो प्रकाशित करत मानवतेची दुर्गंधी अस कॅप्शन दिलं होतं. 

Screenshot 2022 10 31 at 1.25.10 PM

मागील निवडणूकीत गुजरातमध्ये भाषण करताना देखील नरेंद्र मोदींनी या घटनेचा संदर्भ देतं, राहूल गांधींच्या आज्जी मोरबीत येवून दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरल्या होत्या तेव्हा आम्ही व आमचे संघ स्वयंसेवक आपत्ती निवारणात सडलेली प्रेत गोळा करण्याचे काम करत होतो असा दावा केला होता. 

इंदिरा गांधींच्या दौऱ्यामुळे दुसरा एक वाद देखील उत्पन्न झाला होता. या दौऱ्यामुळे प्रशासनाला आपत्ती निवारणाचं काम 8 तासांसाठी थांबवावं लागलं होतं. या गोष्टीवर देखील मोठ्या प्रमाणात टिका झाली होती.. 

आजही त्या आठवणी जपल्या जातात

दरवर्षी 11 ऑगस्ट रोजी दूपारी सव्वातीन वाजता मोरबी शहरात प्रशासनाकडून भोंगा वाजवून त्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली जाते. आत्ता याच नदीवर असणाऱ्या झुलत्या पुलाच्या दुर्घटनेमुळे मोरबीची ती ऐतिहासिक दुर्घटना पुन्हा एकदा चर्चली जात आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.