सत्तेत आल्यापासून तालिबाननं पत्रकारांच्या नोकऱ्यांचा बाजार उठवलाय

१५ ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिवस. पारतंत्र्याच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला आणि देशानं प्रगतीकडे वाटचाल सुरु केली. दुसृया बाजूला यंदाच्या १५ ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये विरुद्ध चित्र पाहायला मिळालं. युद्ध, दहशतवाद, गरिबी आणि अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट लागू झाली. जिथं अफगाणी नागरिकांच्या आयुष्यात नुकतीच प्रगतीची पावलं पडत होती, तिथं त्यांना दहशतवादाच्या सावटाखाली जावं लागलं.

तेव्हापासून आतापर्यंत अफगाणिस्तानमधून चांगली बातमी आली आहे, हे चित्र अभावानंच दिसलं असेल. सध्या एका बातमीनं दुनियेला हादरा दिला आहे. ती बातमी म्हणजे तालिबान सत्तेत आल्यापासून, अफगाणिस्तानमध्ये पत्रकारांना सगळ्यात जास्त फटका बसलाय. तिथली अनेक मीडिया हाऊसेस बंद झाली आहेत, साहजिकच सहा हजारहुन अधिक लोकांना पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

रिपोर्टर्स विदआऊट बॉर्डर्स आणि अफगाण इंडिपेंडंट जर्नालिस्ट असोसिएशननं एक सर्वे केला. त्यात ही माहिती समोर आली आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर ४० टक्के अफगाणी माध्यमं बंद पडली आहेत. तालिबानी राजवटीत महिला पत्रकारांनाही मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये ५४३ माध्यम संस्थांचं काम सुरू होतं. मात्र तालिबानची राजवट आल्यानंतर ही संख्या आलीये ३१२ वर. थोडक्यात काय, तर बाकीच्या २३१ माध्यमसंस्था बंद पडल्या आहेत. म्हणजे तीन महिन्यात ४३ टक्के माध्यम संस्थांच्या दारावर टाळं लागलं आहे. या सर्वेत उल्लेख केल्याप्रमाणं अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये एकाही स्थानिक माध्यम संस्थेचं अस्तित्व उरलेलं नाही. हेरातमधल्या बहुतांश माध्यम संस्था बंद झाल्या आहेत, तर काबूलमध्येही हीच परिस्थिती आहे.

महिला पत्रकारांच्या नोकरीवर गंडांतर

महिलांना स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क देण्याबाबत तालिबान पहिल्यापासूनच विरोधात आहे. तालिबान सत्तेत आल्यावर तिथल्या परदेशी महिलांनी मायदेशी जायला प्राधान्य दिलं होतं. महिला फुटबॉलपटूला धमक्या देण्यात आल्याचीही चर्चा होती. महिलांनी नोकरी करण्याला तालिबानचा सुरुवातीपासून विरोध आहे. याआधी अफगाणिस्तानमध्ये २४९० महिला पत्रकार कार्यरत होत्या, असं सर्वेमध्ये नमूद केलं आहे. तर तालिबान राजवटीत ८४ टक्के महिला पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या ३४ पैकी १५ प्रांतांमध्ये आता एकही महिला पत्रकार काम करत नाहीये.

या सगळ्यावर तालिबानचं म्हणणं काय?

सरकारचा प्रवक्ता जबीबहुल्लाह मुजाहिदनं रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सला दिलेल्या माहितीनुसार, ‘इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान माध्यमांना विशिष्ट चौकटीतच पाठिंबा देतं. कारण देशाचं हित सुरक्षित राहील आणि शरिया व इस्लामचा आदर कायम राहील.’ दुसऱ्या बाजूला वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेक्समध्ये १८० देशांच्या यादीत अफगाणिस्तान १२२ व्या क्रमांकावर आहे.

माध्यमं बंद पडण्याची कारणं काय?

तालिबान सत्तेत आल्यानंतर माध्यम संस्थांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तालिबानच्या राजवटीच्या दहशतीमुळं त्यांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून येणारं फंडिंग बंद झालं. सोबतच, ज्या देशांचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात होतं, तिथून अफगाणी माध्यमांना सबसिडीही मिळायची. आता कोणत्याच देशाचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात नसल्यानं माध्यमांची आर्थिक कोंडी झाली आहे.

पत्रकारांच्या हत्या होणंही अफगाणिस्तानमध्ये नवीन नाही. तालिबान विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना धमक्या आणि जीवघेण्या हल्ल्यांना सामोरं जावं लागत असल्याच्या बातम्याही अनेकद समोर आल्या आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.