भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !

सत्ता आणि पैशाच्या जोरावर जगाला आपल्या मुठीत घेऊ पाहणाऱ्या लोकांपैकीच एक नांव म्हणजे तत्कालीन विजयनगरचे महाराज कुमार उर्फ विज्जी हे होते. विज्जी हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात विवादास्पद नांव होतं. विशेष म्हणजे क्रिकेटर म्हणून अतिशय साधारण खेळाडू असलेल्या विज्जी यांनी आपल्या सत्तेच्या जोरावर फक्त  भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद मिळवलं असं नाही, तर एककाळ त्यांनी भारतीय क्रिकेटला आपल्या तालावर नाचवलं देखील.

मिहीर बोस लिखित ‘ए हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या पुस्तकात विज्जी यांच्याविषयीचे अनेक किस्से वाचायला मिळतात.

विजयनगरच्या राजघराण्यातून येणाऱ्या विज्जी यांचं खरं नांव विजय आनंद गजपती राजू असं होतं. त्यांना  क्रिकेटची विशेष आवड होती आणि भारतीय संघाकडून खेळायचं होतं. पण क्रिकेटमधील त्यांचा खेळ अतिशय सामान्य दर्जाचा होता. असं असतानाही आपल्या राजकीय सत्तेच्या जोरावर या माणसाने फक्त भारतीय संघात स्थानच नाही मिळवलं, तर भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून खेळताना भारतीय संघात उभी फूट पाडली.

एक त्यांचा समर्थक तर दुसरा विरोधी गट. समर्थक गटात अर्थात त्यांच्या मर्जीतले खेळाडू होते, जे त्यांच्या सांगण्यावरून काहीही करायला तयार होते. याचाच पुरावा म्हणजे कॅप्टन म्हणून एक वेळा विज्जिनी एका खेळाडूला फक्त एवढ्याचसाठी संघात खेळायची संधी दिली होती कारण त्याने विज्जींचे प्रमुख विरोधक सी.के. नायडू यांचा अपमान केला होता.

आज जरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलं तरी त्यावेळी मात्र क्रिकेटमध्ये फारसा पैसा नव्हता. १९३२ सालचा भारतीय संघाचा इंग्लंड दौरा विज्जी यांनी प्रायोजित केला होता आणि त्यामुळेच त्यांना भारतीय संघाचं उप-कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण सांगून खेळण्यास नकार दिला पण भारतीय क्रिकेटमधला त्यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतच होता.

देशांतर्गत क्रिकेटला चालना देण्यासाठी १९३४ पासून रणजी ट्रॉफीची सुरुवात करण्यात आली. रणजीत सिंह यांच्या नावावरून या ट्रॉफीला रणजी ट्रॉफी असं नांव देण्यात आलं. या ट्रॉफीसाठी पटियालाच्या महाराजांनी आर्थिक मदत केली होती. साहजिकच त्यांना  भारतीय क्रिकेटच्या प्रशासकांमध्ये महत्व मिळायला लागलं होतं. ही गोष्ट लक्षात आल्याने विज्जी यांनी रणजी ट्रॉफी रद्द करण्यात येऊन त्याऐवजी ‘विलिंग्डन’ ट्रॉफी सुरु करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली  होती. पण तोपर्यंत रणजी ट्रॉफीमधले काही सामने खेळविण्यात आले होते, त्यामुळे त्यांची मागणी अमान्य करण्यात आली.

१९३६ साल येईपर्यंत भारतीय क्रिकेटमधल्या घडामोडी आपल्या मर्जीप्रमाणे होतील याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती.  त्यामुळे १९३६ साली जेव्हा भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला त्यावेळी त्यांना संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. या दौऱ्यात संघाकडून ३ सामन्यातील ६ इनिंगमध्ये खेळताना त्यांनी ३३ रन्स काढले. कर्णधार म्हणून देखील त्यांची कामगिरी अतिशय सुमार राहिली. या दौऱ्यात भारताचा मानहानीकारक पराभव  झाला.

असं देखील सांगितलं जातं की विज्जीनी कौंटी क्रिकेटमधील एका सामन्यादरम्यान  आपल्याला बाद न करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला एक महागडी घडी भेट म्हणून दिली होती. अजून एक असाच रंजक किस्सा म्हणजे भारतीय संघाचा सामना लंकाशायर संघाविरुध्द सुरु होता. या सामन्यात विज्जी खेळत नव्हते, त्यामुळे भारतीय संघाचं कर्णधारपद सी.के. नायडू यांच्याकडे  होतं.

youtube

भारत सामना जिंकण्याच्या स्थितीत होता, अशावेळी विज्जीनी मोहम्मद निसारला फक्त फुलटॉस टाकायला सांगितले होते. हे फक्त एवढ्याचसाठी की नायडूंच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकही सामना जिंकू नये अशी त्यांची इच्छा होती. निसारने देखील विज्जींच्या सांगण्याप्रमाणे बॉलिंग करायला सुरुवात केली होती. ही गोष्ट लक्षात आल्याने नायडूंनी बॉलिंग बदलली आणि पुढे संघाने सामना जिंकला.

लाला अमरनाथ आणि विज्जी यांच्यादरम्यान देखील अनेकवेळा वादविवादाचे प्रसंग ओढावले गेले. या वादातूनच विज्जींनी लाला अमरनाथ यांच्यावर व्याभिचाराचा आरोप देखील केला. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर विजय मर्चंट यांनी विज्जींना कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचा विज्जींना प्रचंड राग आला. त्याची परिणीती अशी झाली की विज्जींनी सामन्यादरम्यान विजय मर्चंट यांच्यासोबत ओपनिंग करण्यास आलेल्या मुश्ताक अलींना विजय मर्चंट यांना रन आउट करायचं सांगितलं होतं. पण ही गोष्ट मुश्ताक अलींनी विजय मर्चंट यांना सांगितली आणि दोघांनीही पुढे त्या सामन्यात शतक ठोकलं.

भारतीय संघातील वादविवाद काही थांबायला तयार नव्हते. शेवटी यावर एक चौकशी समिती स्थापन झाली. भोपाळच्या नवाबाच्या अध्यक्षतेखाली एक अहवाल आला आणि शेवटी विज्जींचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं आणि त्यांची  संघातून देखील गच्छंती झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.