शाहरुखचं सोडा, या घड्याळ्यांच्या किंमती बघून डोळे फिरतील…

दुपारच्या पारी एक बातमी आली, शाहरुख खानला तपासणीसाठी मुंबई एअरपोर्टवर अडवलं. आधी वाटलं आता परत आर्यनसारखा राडा होणार, दिवसभर त्याच बातम्या येणार, नंतर कळलं यात आर्यनसारखा काही विषय नाही. शाहरुखला अडवलं होतं ते त्याच्या घडाळ्यांमुळं. शाहरुख खानजवळ युएईवरुन येताना काही महागडी घड्याळं आणि त्यांची कव्हर्स सापडली, ज्याची किंमत १८ लाखांपर्यंत आहे. यामुळं शाहरुखला कस्टम ड्युटी म्हणून ६.८३ लाख रुपये द्यावे लागले आणि मॅटर सॉल्व्ह झाला.

आता ६.८३ लाख ही शाहरुखच्या महिन्याच्या बजेटला धक्का पोहोचवेल एवढी किंमत नाही, म्हणायला गेलं तर १ लाखामुळंही त्याला लोड आला नसेल. (आपला शहराच्या बाहेर १ आरके तरी आला असता.)

पण जसं शाहरुखसाठी १८ लाख ही किंमत अतिसामान्य आहे, तसंच जगात इतरही काही घड्याळं आहेत ज्यांच्यापुढं शाहरुखची घड्याळं अतिसामान्य वाटतील.

अशीच टॉप १० महागडी घड्याळं बघुयात.

दहावा नंबर लागतो – फॅटेक फिलिप स्टेलनेस स्टील रेफ. १५१८

WhatsApp Image 2022 11 12 at 8.26.20 PM 1

हे घड्याळ बनवलंय स्टेलनेस स्टीलपासून.पहिल्यांदा १९४१ बनवण्यात आलेलं हे घड्याळ कॅलेंडर दाखवणारं पहिलं घड्याळ ठरलेलं, त्यामुळं त्याची तेव्हाच खतरनाक चर्चा झालेली. लिमिटेड एडिशन असल्यानं साहजिकच याची किंमतही दणक्यात राहिली. सोन्यापेक्षा स्टील स्वस्त असलं, तरी या घड्याळात हाय एन्ड स्टील वापरल्यानं आणि हे घड्याळ दुर्मिळ असल्यानं प्राईज जाते १८ मिलियन डॉलर्स. भारतीय चलनात गणित करायचं झालं, तर ९६ कोटींपेक्षा जास्त. 

नवव्या नंबरवर आहे – जेकब अँड कं. बिलियनर वॉच

WhatsApp Image 2022 11 12 at 8.26.17 PM

या घड्याळात हिरे आहेत. तेही साधे हिरे नाहीत. तर १८९ कॅरेट्सचे अकोशा डायमंड्स. या डायमंड्सचा विषय म्हणजे याच्या कटमुळं हिरे ३० टक्के मोठे दिसतात. घडाळ्याच्या डायलला कवटीसारखी डिजाईन आहे आणि १८ रत्नही. घडाळ्याची डायल आणि बेल्ट १८ कॅरेट्स व्हाईट गोल्डनी बनलीये आणि वरती  रोझ गोल्डही आहे. किंमत बघा लय नाही १८ मिलियन.

नंबर आठ, रोलेक्स पॉल न्यूमन डेटोना रेफ. ६२३९

WhatsApp Image 2022 11 12 at 8.26.12 PM

महाग घड्याळांचा विषय चाललाय आणि यात रोलेक्सचा विषय येणार नाही हे कसं  शक्य आहे. तर हॉलिवूड ऍक्टर पॉल न्यूमनसाठी हे घड्याळ खास बनवून घेण्यात आलं होतं. हा गडी जोरात गाडी चालवायचा म्हणून त्याच्या बायकोनं घड्याळात ‘Drive Carefully’ हा मेसेज कोरुन ठेवलेला. क्रीम आणि ब्लॅक कलरची डायल असलेलं हे घड्याळ ऑक्शनमध्ये विकलं गेलेलं १८.७ मिलियन डॉलर्सला. तेही ऑक्शन सुरु झाल्यावर फक्त १२ मिनिटात.

सातव्या नंबरवर आहे, फॅटेक फिलिप हेन्री ग्रेव्ह्स सुपरकॉम्प्लिकेशन

WhatsApp Image 2022 11 12 at 8.26.08 PM

सात वर्षात आपण तीन चार घड्याळं बदलतो, पण हे घड्याळ बनवायलाच ७ वर्ष लागली होती. पूर्ण सोन्याच्या या घड्याळात सूर्योदय आणि सूर्यास्ताचं टाईमिंगही कळतंय. १९३३ मध्ये हेन्री ग्रेव्ह्स नावाच्या बँकरसाठी हे घड्याळ बनवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे एवढं महाग असलं तरी हे घड्याळ हातात घालून मिरवता येणार नाही, हे आहे पॉकेट वॉच. त्यामुळं खिशात ठेवायचं आणि स्टाईलमध्ये काढून मग टायमिंग बघायचं. हा रॉयल कारभार करायला एका कार्यकर्त्यानं हे घड्याळ २६ मिलियन डॉलर्सला विकत घेतलं होतं.

सहावा नंबर, चोपार्ड २०१-कॅरेट

WhatsApp Image 2022 11 12 at 8.23.46 PM

खरं सांगायचं तर हे घड्याळ वेळ नाही तर श्रीमंती दाखवतं. कारण याला थोडे नाहीत ८७४ हिरे लावलेत, ज्यांची टोटल बसते २०१ कॅरेट्स. यात १५ कॅरेटचा पिंक डायमंड, १२ कॅरेटचा ब्लू डायमंड आणि ११ कॅरेटचा व्हाईट डायमंड आहे. घड्याळ बघितलं, तर किती वाजलेत हे कुठं बघायचं असा प्रश्न पडू शकतो, पण क्वालिटी आणि श्रीमंतीच्या बाबतीत नाद नाही,. कारण घडाळ्याची किंमत २५ मिलियन आहे शेठ. विषय कट.

नंबर ५ : Jaeger-LeCoultre Joaillerie 101 Manchette (शप्पथ मराठीत लई अवघड जात होतं)

WhatsApp Image 2022 11 12 at 8.23.40 PM

हे घड्याळ गिफ्ट म्हणून मिळालं होतं. राजगादीवर ६० वर्ष पूर्ण केली म्हणून राणी एलिझाबेथ दुसरी हिला हे घड्याळ गिफ्ट म्हणून देण्यात आलं होतं. राणीला दिलेलं म्हणल्यावर विषय साधा असणार होय ? घड्याळ बनलंय व्हाईट गोल्ड आणि पॉलिश्ड डायमंड्सपासून. घडाळ्याचं मशीन आहे ‘मिनिएचर कॅलिबर १०१ मुव्हमेंट’ जे जगातल्या सगळ्यात छोट्या मशिन्सपैकी एक आहे. राजघराण्याच्या कार्यक्रमात हे घड्याळ वापरण्यात यावं असा अलिखित नियमही आहे. किंमत राणीच्या मानानं कमीच आहे २६ मिलियन डॉलर्स फक्त.

नंबर चार, ब्रिग्युएट ग्रँडे कॉम्प्लिकेशन मॅरी अँटोइनेट 

WhatsApp Image 2022 11 12 at 8.23.36 PM

मॅरी अँटोइनेट ही फ्रेंच राणी होती, तिला गिफ्ट देण्यासाठो तिच्या प्रियकरानं हे घड्याळ बनवायला सांगितलेलं. (आपल्याकडं सिल्क कॅडबरी दिली, तरी होतंय) हे घड्याळ बनवायला ४० वर्ष लागली आणि तेवढ्या कालावधीत त्या राणीला मृत्यूदंड देण्यात आला. साहजिकच घड्याळाची स्टोरी दर्दभरी झाली. या घड्याळाचं सगळं मेकॅनिक्स उघड्या डोळ्यांनी पाहता येतं, पण त्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे घड्याळ चोरीला गेलं होतं, पण सुदैवानं ते सापडलं आणि आता लॉस एंजेलिसच्या म्युझियममध्ये आहे. घ्यायचं झालं तर ३० मिलियन डॉलर्स घेऊन जा. पॉकेट वॉच आहे, दणका उडवून द्याल.

तिसरा क्रमांक – फॅटेक फिलिप ग्रँडमास्टर लाईम रेफ. ६३००ए-०१०

WhatsApp Image 2022 11 12 at 8.23.32 PM

जितकं नाव मोठं आहे तितकाच घडल्याचा लौकिकही. कारण घड्याळ दिसत नॉर्मल असलं तरी याला दोन डायल्स आहेत. एक पुढं, एक मागं. घडाळ्यातूनही ५ वेगवेगळे चाईम्स म्हणजेच आवाज असतात, अलार्म वेगळे. दोन्ही डायल्स वरचे नंबर्स सोन्यानं कोरलेत, वर प्लेटही १८ कॅरेट गोल्डची आहे. थांबा संपलं नाही, घड्याळाची केस व्हाईट गोल्डची आहे आणि पट्टा मगरीच्या चामड्याचा. किंमत जास्त नाही, ३१ मिलियन राऊंड फिगर.

नंबर दोन, ग्राफ डायमंड्स द फॅसिनेशन

WhatsApp Image 2022 11 12 at 8.20.59 PM

लय खोलात जायला नको, १५२.९६ कॅरेट्सचे व्हाईट डायमंड आणि ३८ कॅरेट्सच्या डायमंडची डायल असलेलं हे घड्याळ. रिंग म्हणूनही घालू शकता आणि मनगटावरही. एवढे हिरे आहेत आणि किंमत साधी नाही ४० मिलियन डॉलर्स. घड्याळ फार जुनं नाही २०१५ मध्येच बनवण्यात आलंय.

नंबर एकच बादशहा, ग्राफ डायमंड्स हॅल्युसिनेशन्स

WhatsApp Image 2022 11 12 at 8.21.04 PM

आता दोन नंबरच्या घड्याळात तुम्हाला व्हरायटी हवी असेल, तर हा एक नंबरचा पर्याय. कंपनी तीच फक्त कलर चेंज. याची किंमत ५५ मिलियन डॉलर्स आहे. याच्यात हिरे आहेत ११० कॅरेट्सचे आणि तेही वेगवेगळ्या रंगाचे. एवढी बारीक डायल बघून याच्यात वेळ कसा बघायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे घड्याळ तुमची वेळ लोकांना सांगेल, त्यामुळं वेळ बघायची गरज पडेल असं वाटत तर नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.